ही आहे बाहुबली मांजर... जाणून घ्या हिची खासियत

अनंत कोळमकर
शुक्रवार, 27 डिसेंबर 2019

आदित्याला एके दिवशी पुण्यावरून फोन आला. त्यांना शुटिंगसाठी एक काळी मांजर हवी आहे. त्यांच्या निकषात आदित्यची "ब्लॅकी' बसत होती. तो तिला घेऊन पुण्याला गेला. तेथून त्याला पुण्यापासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या भोर येथे नेण्यात आले.

नागपूर : बाहुबली हा दक्षिणेतून हिंदीत आलेला चित्रपट कुणाला माहीत नाही. पण, आता चित्रपटात दिसलेल्या बाहुबलीचा पूर्वेतिहास एका वेब सिरीजद्वारे त्याच नावाने येत आहे. या सिरीजमधील शिवगामीची भूमिका नागपूरची कलावंत करीत आहे. पण, या सिरीजमध्ये नागपूरची आणखी एक कलावंत काम करीत आहे व ती कलावंत एक मांजर आहे. 

ती मांजर आहे, नागपुरातील अयोध्यानगरात राहणाऱ्या आदित्य राऊत याची. मांजरी पाळण्याचा आदित्यचा छंद आहे. तो जोपासतानाच त्याने मांजरींचे संगोपन सुरू केले. इतकेच नाही तर मांजर पाळणाऱ्यांना बाहेरगावी जायचे असेल तर त्यांच्या मांजरींना ठेवण्यासाठी त्याने होस्टेल उघडून एक छोटा व्यवसायच सुरू केला. आदित्यच्या पाळीव मांजरीत बहुतांश मांजरी पर्शियन जातीच्या आहेत. 

हेही वाचा - तो पंचावन वर्षांचा ती नऊ वर्षांची अन्‌...

त्यातील एक काळीशार मांजर बाहुबलीच्या वेबसिरीजमध्ये झळकणार आहे. आदित्य अगोदर या मांजरीला "ब्लॅकी' या नावाने हाक मारायचा. मात्र, तिची वेबसिरीजमध्ये निवड झाल्यापासून तिचे नाव त्याने "हिरोईन असेच ठेवले. वेबसिरीजसाठी या "हिरोईन'ची निवड होण्याचा किस्साही खास आहे. आदित्याला एके दिवशी पुण्यावरून फोन आला. त्यांना शुटिंगसाठी एक काळी मांजर हवी आहे. त्यांच्या निकषात आदित्यची "ब्लॅकी' बसत होती. तो तिला घेऊन पुण्याला गेला. तेथून त्याला पुण्यापासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या भोर येथे नेण्यात आले. 

सविस्तर वाचा - Video : या देशातही आहे ब्रुसली, वय वर्ष अवघे पाच

भोर येथील 350 वर्षे जुन्या ऐतिहासिक पेशवे वाड्यात वेबसिरीजचे शूटिंग सुरू होते. तेथे "ब्लॅकी'सोबत आणखी 22 मांजरी होत्या. त्यातून आदित्यच्या "ब्लॅकी'ची निवड झाली. "ब्लॅकी'च्या निवडीनंतर आदित्याला माहीत झाले की, ही वेबसिरीज बाहुबलीवर आहे व त्याचेच शूटिंग तेथे सुरू आहे. 27 जानेवारी ते 5 फेब्रुवारी या काळात वेबसिरीजचे चित्रीकरण करण्यात आले. त्यात महाराणीच्या शेजारी बसलेली मांजर हीच आदित्यची "ब्लॅकी' आहे. आदित्यच्या पाळीव मांजरींची संख्या 16 आहेत. त्यासोबत होस्टेलमध्ये येणाऱ्या मांजरीही त्याच्या "कॅट होम'मध्ये आहेत. 

Image may contain: cat and text

दोन रंगांचे दोन डोळे

आदित्यच्या मांजर कुटुंबात एक मांजर तर अनोखी आहे. शक्‍यतोवर कुणाही प्राण्याच्या दोन्ही डोळ्यांचा रंग सारखा असतो. पण आदित्यच्या या मांजरीचे दोन्ही डोळ्यांचा रंग वेगवेगळा, एका डोळ्याचा निळा तर दुसऱ्याचा घारा आहे. 

गंमतच आहे!- जाहिरात ठरली 'नाकापेक्षा मोती जड'

एकाच वेळी नऊ पिल्ले

सामान्यतः मांजरीला तीन-चार पिल्ले होतात. पण काही वेळा पाच ते सात पिल्लेही झाल्याचे दिसून आले. पण ही संख्याही अतिशय अपवादात्मक स्थितीत आहे. सातपेक्षा अधिक पिल्ले झाल्याची नोंद नाही. परंतु, आदित्यकडील एका मांजरीला चक्क नऊ पिल्ले झाली होती. 

प्राण्यांचे संगोपन करता आले पाहिजे 
कुत्रे-मांजर तसेच पोपटासारखे पक्षी हौशीने पाळणारे अनेकजण असतात. त्यांना असे चांगले प्राणी हवे असतात. त्यांना असे चांगले जातिवंत प्राणी पुरविण्याचा चांगला व्यवसाय अनेकांना करता येऊ शकतो. केवळ 10 हजार गुंतवणूक करूनही हा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. मात्र, प्राण्यांचे चांगले संगोपन करता आले पाहिजे. 
- आदित्य राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur : Black cat becomes a heroine