दणका! न्यायालयाचा वेळ वाया घालविल्याबद्दल 50 लाखांचा दावा खर्च

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर : सॉईल टेस्टिंग अँड फर्टिलायझर रेकमेंडेशन (एसटीएफआर) मीटरविरुद्ध निरर्थक व गुणवत्ताहीन मुद्दे मांडून न्यायालयाचा बहुमूल्य वेळ वाया घालवल्याबद्दल याचिकाकर्त्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 50 लाखांचा दावा खर्च ठोठावला. याचिकाकर्त्यांमध्ये यवतमाळ येथील शेतकरी आनंद एम्बडवार, वर्धा येथील नागार्जुन ऍग्रो केमिकल कंपनी व नागपूर येथील शेतकरी भगवान कारमेंगे यांचा समावेश आहे. 

एसटीएफआर मीटरविरुद्ध आनंद एम्बडवार यांनी जनहित याचिका व नागार्जुन कंपनीने रीट याचिका दाखल केली होती. तर, कारमेंगे यांनी या प्रकरणात मध्यस्थी अर्ज दाखल करून दोन्ही याचिकाकर्त्यांचे समर्थन केले होते. उच्च न्यायालयाने या प्रकरणावर 12 डिसेंबर रोजी अंतिम सुनावणी पूर्ण झाल्यानंतर राखून ठेवलेला निर्णय शुक्रवारी जाहीर केला. हा दावा खर्च याचिकाकर्ते व मध्यस्थाने संयुक्तरीत्या किंवा स्वतंत्रपणे नवी दिल्लीतील इंडियन कौन्सिल फॉर ऍग्रिकल्चर रिसर्च व इंडियन ऍग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थांना अदा करायचा आहे, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला. त्याकरिता त्यांना चार आठवड्यांचा वेळ दिला आहे. ही रक्कम दोन्ही संस्थांना समान (प्रत्येकी 25 लाख) विभागून देण्यास सांगण्यात आले. तसेच, दोन्ही रिसर्च संस्थांनी नियमांची पायमल्ली करणाऱ्या नागार्जुन कंपनीवर कारवाई करावी, असे निर्देश दिले. न्यायालयात केंद्र सरकारतर्फे ऍड. प्रवीण स्वरूप व ऍड. मुग्धा चांदूरकर यांनी कामकाज पाहिले. न्यायमूर्ती रवी देशपांडे आणि मिलिंद जाधव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. 

एसटीएफआर मीटरचा उपयोग कसा होतो? 
देशातील बहुसंख्य शेतकऱ्यांना मातीचा प्रकार, कोणत्या मातीत कोणते पीक घेतले पाहिजे आणि मातीची गुणवत्ता कशी वाढविता येते, या गोष्टी माहीत नसतात. त्यामुळे, ते वर्षानुवर्षे चुकीची पिके घेत राहतात. त्यातून त्यांना आवश्‍यक उत्पादन होत नाही. त्यामुळे केंद्राने मृदा चाचणी प्रकल्प आणला. त्याअंतर्गत इंडियन कौन्सिल फॉर ऍग्रिकल्चर रिसर्च व इंडियन ऍग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट यांनी माती परीक्षणाकरिता एसटीएफआर मीटर विकसित केले. हे मीटर मातीमधील 12 घटकांची तपासणी करते, असा संशोधनकर्त्यांचा दावा आहे. एसटीएफआर मीटरच्या उत्पादन व मार्केटिंगकरिता 14 कंपन्यांना लायसन्स देण्यात आले. या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना सॉईल हेल्थ कार्ड दिले जाते. त्यात मातीमधील 12 घटकांच्या प्रमाणाचा अहवाल असतो. तसेच त्या अहवालाच्या आधारावर मातीत कोणते खत टाकायचे, याची शिफारस केली जाते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com