सातवा वेतन आयोग लागू करा, अन्यथा ७ डिसेंबरपासून महापालिका बेमुदत ठप्प; कर्मचारी संघटनेचा इशारा

nagpur municipal corporation employees demand to give seventh pay commission
nagpur municipal corporation employees demand to give seventh pay commission

नागपूर : सभागृहात ठराव मंजूर केल्यानंतरही महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्यात आला नाही. त्यामुळे कर्मचारी संघटनेने प्रशासन व सत्ताधाऱ्यांवर संताप व्यक्त करत आयुक्तांना बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.

६ डिसेंबरपर्यंत सातवा वेतन आयोग लागू न केल्यास पुढच्याच दिवसापासून कर्मचारी संपावर जाणार असल्याचे आयुक्तांना दिलेल्या पत्रात संघटनेने नमूद केले आहे. त्यामुळे ७ डिसेंबरपासून महापालिका बेमुदत ठप्प होण्याची शक्यता आहे. कोरोना काळात कर्मचाऱ्यांनी संप केल्यास प्रशासनापुढे मोठे संकट निर्माण होणार आहे. नुकताच नागपूर महापालिकेच्या तुलनेत अगदी नवखी व लहान असलेल्या चंद्रपूर महापालिकेने कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला. परंतु, मागील वर्षी सातव्या वेतन आयोगाचा ठराव मंजूर झाल्यानंतरही महापालिकेची कर्मचारी प्रतीक्षा करीत आहे. महापालिकेच्या सभागृहात मागील वर्षी कर्मचाऱ्यांना वेतनात सातवा वेतन लागू करणार, असा ठराव मंजूर करण्यात आला होता. हा ठराव तत्कालीन युती सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. महापालिकेने सातव्या वेतन आयोगानुसार वेतनतक्ताही तयार केला होता. परंतु, तत्कालीन सरकारने आर्थिक स्थितीचा विचार करून निर्णय घ्यावा, असे आदेश महापालिकेला दिले अन् हातातोंडाशी आलेला सातव्या वेतन आयोगाचा कर्मचाऱ्यांचा घास हिरावला. तेव्हापासून महापालिकेतील कर्मचारी संतप्त आहेत. 

सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी महापालिकेतील कर्मचारी संघटना राष्ट्रीय नागपूर कार्पोरेशन एम्प्लॉईज असोसिएशनने यापूर्वी सामूहिक रजा आंदोलनाचे हत्यार उपसले. आज राष्ट्रीय नागपूर कार्पोरेशन एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र टिंगणे व इतर पदाधिकाऱ्यांना आयुक्त राधाकृष्णन बी. यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली. सातवा वेतन आयोग लागू न केल्यास बेमुदत संपाचा इशारा असोसिएशनने दिला असून निर्माण होणाऱ्या स्थितीसाठी प्रशासन जबाबदार राहील, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. कोविड काळ बघता अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी कामावर राहणार असून ते काळ्या फिती लावून काम करणार आहेत. 

शिक्षकही होणार सहभागी -
महापालिकेतील ४ हजार १८७ कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होण्याची तयारी असोसिएशनकडे दाखवली. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पालिकेतील कामकाज ठप्प पडण्याची शक्यता आहे. या संपात शिक्षकही सहभागी होणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com