बापरे! १२२२ कोटींचा सिवेज झोनचा प्रकल्प फक्त ३१ कोटींवर, नव्या सिवेज लाइनचे सोडले नाव

nagpur municipal corporation sewage zone project only of 31 crore
nagpur municipal corporation sewage zone project only of 31 crore

नागपूर : दहा वर्षांपूर्वी शहराची वाढती व्याप्ती लक्षात घेता महापालिकेने शहरातील दीड हजार किमीच्या सिवेज लाईन बदलण्यासंदर्भात तीन सिवेज झोनचा प्रकल्प आराखडा तयार केला होता. १२२२ कोटींचा हा प्रकल्प शहराची व्याप्ती वाढल्यानंतरही केवळ ३१ कोटींवर आला आहे. विशेष म्हणजे यात शहरातील सिवेज लाईनच्या डागडुजीवरच भर देण्यात आला आहे. त्यामुळे २२२ वर्ग किमीच्या शहरातील सव्वा पाचशे एमएलडी सांडपाण्याचा भार जुन्या जीर्ण सिवेज लाईन कधीपर्यंत सोसणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

महापालिकेने शहरातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या सिवेज लाईनसाठी दहा वर्षापूर्वी उत्तर, मध्य व दक्षिण सिवेज झोनचा प्रकल्प आराखडा तयार केला होता. शहरातील सांडपाणी गोसेखुर्द धरणात जात असल्याने या तिन्ही झोनमध्ये सात सांडपाणी प्रक्रिया केंद्र प्रस्तावित होते. तिन्ही झोनमधील सिवेज लाईन, भूमिगत सांडपाणी नाली सर्वच बदलण्याचेही प्रस्तावित होते. तिन्ही सिवेज झोनची एकूण किंमत १२२२ कोटी होती. उत्तर सिवेज झोनच्या ५५२ कोटींच्या आराखड्याला केंद्र सरकारने मंजुरीही दिली होती. परंतु २०१४ मध्ये केंद्रात भाजप सत्तेवर येताच हा प्रकल्प गुंडाळण्यात आला. त्याऐवजी नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचा आराखडा तयार करून केंद्राकडे पाठविण्यात आला. अजूनही या आराखड्याला मंजुरीची व निधीची प्रतीक्षा आहे. आता तीन सिवेज झोनचा मृत प्रकल्प महापालिकेने पुन्हा जिवंत केला. परंतु आता शहरातील केवळ प्रमुख सिवेज लाइनची डागडुजी करण्यात येणार आहे. इंग्रजांच्या काळापासून तयार या सिवेज लाईन जीर्ण झाल्या असून नव्याने बदलण्याची गरज असताना महापालिकेने त्याची डागडुजी करण्यासंदर्भातील प्रस्ताव तयार केला आहे. या तिन्ही झोनमधील डागडुजी, दुरुस्तीसाठी ३१ कोटी ३० लाख रुपये खर्च येणार आहे. दहा वर्षांपूर्वीचा १२२२ कोटींचा प्रकल्प आता ३१ कोटींवर आल्याचे दिसून येत आहे. उत्तर सिवेज झोनमध्ये सतरंजीपुरा, आशीनगर व मंगळवारी झोनमधील सिवेज लाइनचा समावेश आहे. मध्य सिवेज झोनमध्ये धरमपेठ, गांधीबाग व लकडगंज झोनचा तर दक्षिण सिवेज झोनमध्ये लक्ष्मीनगर, हनुमाननगर, धंतोली व नेहरूनगर झोनचा समावेश आहे. 

केवळ ६० किमीची दुरुस्ती -
जुन्या सिवेज झोनमध्ये शहरातील प्रमुख सिवेज लाईन, भूमिगत सिवेज लाईन, अशा १६७० किमीच्या सिवेज लाईन बदलणे, दुरुस्ती करण्याचे प्रस्तावित होते. आता मात्र केवळ ६० किमीच्या सिवेज लाइनची दुरुस्ती करण्यात येणार आहे. यात उत्तर सिवेज झोनमधील २२.१५४, मध्य सिवेज झोनमधील ८.७७८, दक्षिण सिवेज झोनमधील २८.६५१ किमी सिवेज लाइनचा समावेश आहे. 

जुना व नवीन प्रकल्पातील फरक -

प्रकल्प जुना प्रकल्प किंमत नवीन प्रकल्प किंमत
उत्तर सिवेज झोन ५५२ कोटी १०.३५ कोटी 
मध्य सिवेज झोन ३३३ कोटी ४.९८ कोटी 
दक्षिण सिवेज झोन ३३६ कोटी १५.९५ कोटी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com