नागपूर महापालिकेचा पाय आणखी खोलात, एका प्रकल्पाचा पैसा नागरिकांकडे थकीत

nagpur municipal corporation tax arrears reached to 572 crore
nagpur municipal corporation tax arrears reached to 572 crore

नागपूर : शहरात निधीअभावी अनेक प्रकल्प रखडले आहेत. दुसरीकडे एक प्रकल्प पूर्ण होईल, एवढा मालमत्ता कर गेल्या पाच वर्षांपासून नागरिकांकडे थकीत आहे. दरवर्षी, सरासरी ७० ते ८० टक्के थकीत रकमेची भर पडत आहे. त्यामुळे थकबाकी ५७२.७८ कोटींवर गेली आहे. 

कर वसुलीसाठी मालमत्तेची जप्ती, लिलाव आदी कठोर पावले उचलूनही नागरिक थकीत कर अदा करीत नसल्याने पाणी कुठे मुरते? असा प्रश्न निर्माण झाला आहे. थकबाकीत घट होण्याऐवजी ती वाढतच असल्याने हा पैसा महापालिकेच्या तिजोरीत येईल की नाही? याबाबतही शंका निर्माण झाली असून शहरातील पायाभूत सुविधांवर याचा परिणाम होताना दिसून येत आहे. एलबीटी बंद झाल्यानंतर मालमत्ता कर पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. परंतु, मालमत्ता कर विभागाने आजपर्यंत स्थायी समितीने दिलेले लक्ष्य कधीही गाठले नाही. त्यामुळे दरवर्षी थकबाकी वाढत आहे. पाच वर्षांपूर्वी नागरिकांकडे १३० रुपये थकीत होते. आज थकबाकीचा आकडा ५७२ कोटींवर पोहोचला आहे. चालू वित्त वर्षातील अजूनही १७५ कोटी रुपये नागरिकांवर थकीत आहे. या थकबाकीसह विचार केल्यास थकीत रकमेचा आकडा ७४७ कोटींवर पोहोचला आहे. चालू वित्त वर्षात पालिकेने २५० कोटींच्या सहा लाख डिमांड तयार केल्या. आतापर्यंत दीड लाख नागरिकांनी ७८ कोटींचा मालमत्ता कर तर ५५ हजार ८३९ नागरिकांनी ३२ कोटींची थकीत रक्कम, असे एकूण ११० कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत भरले.

अजूनही साडेचार लाख नागरिकांकडे यंदाचा पावणेदोनशे कोटींचा मालमत्ता कर थकीत आहे. ३१ मार्चपर्यंत, अर्थात पुढील चार महिन्यात पावणेदोनशे कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसुलीसोबतच थकीत ५७२.७८ कोटी रुपये वसूल करण्याचे आव्हान महापालिकेपुढे आहे. २०१५-१६ या वर्षात १३०.६९ कोटी रुपयांची थकबाकी होती. २०१९-२० या वर्षात ही थकबाकी ५१४.७५ कोटींपर्यंत पोहोचली. २०२०-२१ या वर्षात ही थकबाकी ५७२ कोटींपर्यंत पोहोचली आहे. एकीकडे निधी नसल्याच्या कारणावरून विकास कामे रखडली असताना ३ लाख ८२ हजार नागरिकांकडे एका प्रकल्पाचा निधी रखडला आहे. अधिकाऱ्यांकडून दरवर्षीप्रमाणे नियमित वसुलीचा प्रयत्नच केला जात आहे. थकीत ५७२ कोटींच्या वसुलीसाठी ना अधिकारी, ना पदाधिकाऱ्यांचे कुठलेही नियोजन नसल्याने पुढील वर्षापर्यंत थकबाकी साडेसहाशे कोटींपर्यंत जाण्याची शक्यता बळावली आहे. 

मालमत्ता कर थकबाकीदारांची संख्या थकीत रक्कम 
५ लाख ५०९ २२० कोटी
१ ते ५ लाख २,११७ ४१ कोटी 
५० हजार ते १ लाख ४,४३५ ३० कोटी 
२५ हजार ते ५० हजार १६,७९७ ५६ कोटी 
५ हजार ते २५ हजार १,६६,६६७ १८१ कोटी 
५ हजारांपेक्षा कमी १,९२,११८ ४५ कोटी 

स्थायी समितीच्या मागील वर्षीच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत ४०० कोटींनी यंदा अर्थसंकल्पात घट केली. त्यानंतरही अधिकारी वसुली करीत नसेल तर ते योग्य नाही. महापालिका केवळ अधिकाऱ्यांना वेतन देण्यासाठी नाही. त्यांनी वसुलीवरही भर देण्याची गरज आहे. पुढील चार महिन्यांत अधिकाऱ्यांनी दिलेले लक्ष्य गाठावे. वसुलीसाठी पदाधिकारीही मदतीसाठी तयार आहे. 
- पिंटू झलके, अध्यक्ष, स्थायी समिती. 

५७२ कोटींची थकबाकी ही मोठी संख्या आहे. त्यामुळे वसुलीवरही भर देण्यात येत आहे. यासाठी काही कठोर निर्णय घेतले आहेत. ज्यांच्याकडे पाच लाखांपेक्षा अधिक रकमेची थकबाकी आहे, त्यांची मालमत्ता जप्त करून लिलावाची प्रक्रियाही सुरू केली. चालू वर्षाचा मालमत्ता करासह थकबाकी वसूल करण्याचे निर्देश सर्व झोनच्या सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले असून पाठपुरावा केला जात आहे. 
- राधाकृष्णन बी. आयुक्त, महापालिका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com