नागपूर पोलिसांना कडक सॅल्यूट; कॅन्सरग्रस्त मुलाच्या मदतीला गेले धावून: गोळा केला तब्बल दीड लाखांचा निधी

Nagpur Police collected fund for cancer patient Marathi News Breaking
Nagpur Police collected fund for cancer patient Marathi News Breaking

नागपूर :  सोशल मिडियाचा अनेकदा चांगल्या कामासाठी वापर आणि गैरवापर केल्या जातो. मात्र, सोशल मिडियावरील  एका कॅन्सरग्रस्त मुलाच्या ऑपरेशनसाठी निधीची गरज असल्याची पोस्ट नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस अधिकाऱ्याने पाहिली आणि नावावरून बालमित्राची ओळख पटली. 

बालमित्राशी फोनवरून बोलणे करून पोस्टबाबत खात्री केली आणि मदतीसाठी ती पोस्ट त्यांच्या ‘पीएसआय सेन्च्युरियन’ या व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकला. मित्राच्या आवाहनाला बॅचमेट पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने सकारात्मक प्रतिसाद देत अवघ्या दोन दिवसांत जवळपास दीड लाखांची आर्थिक मदत देऊन सामाजिक बांधिलकी सोबत एका पित्यास लढण्यास बळ दिले.

सोशल मिडियावर अनेक वादग्रस्त पोस्ट व्हायरल होत असतात. त्यामुळे अनेका धार्मिक आणि सामाजिक वातावरण ढवळून निघते. मात्र अनेकदा सोशल मिडियावरून मायलेकाची भेट तर बालमित्रांच्या ओळखी होऊन चांगल्या कामातही मदत होते. असाच एक प्रत्यय नुकताच आला. २००९ -२०१० मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदाचे प्रशिक्षण पूर्ण करून शंभराव्या तुकडीतील पोलिस उपनिरीक्षक पोलीस दलात सहभागी झाले. या अधिकाऱ्यांनी एकमेकांच्या संपर्कात राहावे यासाठी व्हॉट्सॲपवर ‘पीएसआय सेन्च्युरियन’ नावाचा ग्रुप बनवला. या ग्रुपवर अधिकारी जमेल तशी स्वत:ची किंवा कामकाजासंबंधीची माहिती टाकून देवाण-घेवाण करतात. 

नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत असलेले सहायक पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांना व्हॉट्सॲपवर आर्थिक मदतीचे आवाहन करणारा संदेश मिळाला. फसवणुकीच्या उद्देशाने असे संदेश येत असतात. त्यामुळे लबडे यांनी सुरुवातीस दुर्लक्ष केले. मात्र, संदेशातील मजकूर वाचल्यानंतर त्यांना त्यांचा बालपणीचा मित्र अमोल आठवला. त्यांनी तातडीने संदेशातील संपर्क क्रमांकावर फोन करून खातरजमा केली असता तो त्यांचा बालपणीचाच मित्र अमोल होता. 

लबडे यांनी बालमित्राची ख्यालीखुशाली विचारली असता अमोलच्या ७ वर्षीय चिमुकला चिन्मयला कर्करोग असल्याचे समजले. आर्थिक अडचणीमुळे उपचारात अडचणी येत असल्याचेही लबडे यांना समजले. त्यामुळे त्यांनी अमोलला मदतीचे आश्वासन देत तो मदतीचा संदेश ‘सेन्च्युरीन पीएसआय’ ग्रुपवर टाकत मदतीचे आवाहन केले.

दोन दिवसात निधी जमा

एपीआय दिनेश लबडे यांनी वॉट्सअपच्या माध्यमातून बॅचमेट यांना आवाहन केले. जवळपास चोवीस तासांच्या आत अमोलच्या खात्यात भराभरा महाराष्ट्रातून पैसे यायला लागले. दोन दिवसांत जवळपास दीड लाखांचा निधी जमा झाला. ऑपरेशनचा खर्च खात्यात जमा झाला. अमोलने लगेच मित्र दिनेशला फोन केला आणि डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करून दिली. 

अंगावर वर्दी चढवतानाच रक्षण आणि न्याय मिळवून देण्याची भावना मनात असते. पोलिस दलात कार्यरत असताना अनेकांना मदत करण्यासाठी धडपड करीत असतो. एका व्हायरल पोस्टमुळे बालमित्राला मदत मिळवून देऊ शकलो, याचा अभिमान आहे. ‘थॅंक यू बॅच सेंच्युरियन’. 
- दिनेश लबडे (सहायक पोलिस निरीक्षक, नागपूर)

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com