पोलिस हवालदार करीत होता हे अवैध काम...पोलिस विभागाची प्रतिमा मलिन

crime
crime

नागपूर : शहर पोलिस दलातील कॉटन मार्केट वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या पोलिस हवालदाराने चार साथिदारांच्या मदतीने चक्‍क गावठी दारू तस्करी करण्याचा प्रयत्न केला. दारू तस्करी करीत असताना त्यांना पोलिसांनी पकडले आणि नंदनवन पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी हवालदारासह तिघांना अटक केली तर कारचालक पळून गेला. प्रकाश बावनगडे असे दारूतस्कर हवालदाराचे नाव आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक पोलिस आयुक्‍त धोपावडकर हे ईश्‍वरनगर चौक परिसरात मॉर्निंग वॉक करतात. त्यांना गेल्या चार ते पाच दिवसांपासून एक कार सुसाट जाताना दिसत होती. त्या कारमध्ये नक्‍कीच काहीतरी अवैध काम होत असल्याचा संशय एसीपी यांना आला. त्यांनी आज मॉर्निंग वॉक करताना त्या कारला थांबण्याचा इशारा केला. मात्र, सुसाट निघून गेली. त्यामुळे त्यांना संशय आला. त्यांनी लगेच पोलिस कर्मचाऱ्यांना कारचा पाठलाग करण्यास सांगितले तसेच नाकाबंदीतील पोलिसांना सतर्क केले.

काही अंतरावर पोलिस कर्मचाऱ्यांनी कारला घेरले. त्यामुळे कारचालक वाहन सोडून पळून गेला. पोलिसांनी कारमधील चौघांना ताब्यात घेतले. त्या कारमध्ये कॉटन मार्केट वाहतूक चेम्बरमध्ये कार्यरत असलेला पोलिस हवालदार प्रकाश बावनगडे हा होता. कारची झडती घेतली असता त्यामध्ये जवळपास 60 लिटर मोहफुलाची दारूआढळली. गेल्या अनेक दिवसांपासून पोलिस कर्मचारी दारू तस्करी करीत होता. विशाल कापसे, सचिन फुलबांधे आणि बंटी अशी अन्य आरोपींची नावे आहेत.

पोलिस विभागाची प्रतिमा मलिन 
पोलिस आयुक्‍त डॉ. भूषणकुमार उपाध्याय हे पोलिस विभागाची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करीत आहेत. परंतु, पोलिस दलातील काही कर्मचारी आणि अधिकारी अवैध धंदेवाल्यांशी साटेलोटे करीत आहेत. तर काही दारूतस्करी करीत आहेत. तर काहींनी सट्‌टेबाज, जुगार अड्‌डे संचालक आणि ड्रग्स माफियांशी संबंध ठेवले आहेत. त्यामुळे पोलिस विभागाची प्रतिमा मलिन होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com