नागपूर पोलिसांच्या कार्याला सलाम! रात्रीचा दिवस करून आत्महत्या करणाऱ्या व्यावसायिकाचे वाचवले प्राण 

अनिल कांबळे  | Sunday, 20 September 2020

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर. प्रविण (बदललेले नाव) हे ४२ वर्षांचे युवा उद्योजक असून त्यांचे मुंबईत टिळकनगरात मोठे इंजिनिअरींग वर्कशॉप आहे. त्याला पत्नी माधुरी आणि दोन मुली आहेत.

नागपूर: लॉकडाऊनमुळे वाढता कर्जाचा डोंगर आणि व्यवसाय बुडाल्यामुळे आलेल्या नैराश्‍यातून आत्महत्या करण्याचा मार्ग मुंबईच्या व्यावसायिकाने स्विकारला. त्याने थेट नागपूर गाठले आणि सीताबर्डीतील लॉजमध्ये मुक्काम ठोकला. सुसाईड नोट लिहून पत्नीला पाठवली. महिलेने मुंबई पोलिसांकडे धाव घेतली. मुंबई पोलिसांनी नागपूर गुन्हे शाखेशी संपर्क साधला. गुन्हे शाखेने सुतावरून स्वर्ग गाठत आत्महत्येच्या तयारीत असलेल्या व्यावसायिकाचा शोध घेऊन त्याचा जीव वाचवला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर. प्रविण (बदललेले नाव) हे ४२ वर्षांचे युवा उद्योजक असून त्यांचे मुंबईत टिळकनगरात मोठे इंजिनिअरींग वर्कशॉप आहे. त्याला पत्नी माधुरी आणि दोन मुली आहेत. फेब्रूवारी महिन्यापर्यंत त्यांचा व्यवसाय व्यवस्थित सुरू होता. मात्र देशात लॉकडाऊन लागल्यानंतर त्यांचे वर्कशॉप बंद पडले. सुरू असलेली सर्वच कामे बंद पडली. कामाचे घेतलेला ॲडव्हान्स आणि कामे पूर्ण करण्यासाठी घेतलेल्या कर्जाचा डोंगर वाढला. प्रवीण यांनी कर्जदारांना वेळ मागितली. परिवाराचा भारही डोक्यावर आला. बंद पडलेली कामे आणि कर्जाचा डोंगर पाहून प्रवीण नैराश्‍यात गेले. त्यांनी आत्महत्या करून जीवन संपविण्याचा निर्णय घेतला.

सविस्तर वाचा - ते लांब बसून रडत होते; काही नागरिक बघून निघून गेले, पडाटे आले सत्य समोर

अन् लगेच सोडले घर

१० सप्टेबरला त्यांनी घर सोडले. रेल्वेत बसले आणि थेट नागपूर गाठले. नागपुरात तासभर रेल्वे रूळावर फिरल्यानंतर त्यांना दोन पोलिसांनी हटकले. त्यामुळे ते पायी सीताबर्डीत आले. त्यांनी मोदी क्र.३ मधील एका लॉजमध्ये मुक्‍काम केला. त्यानंतर पत्नीची माफी मागत आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख करीत १४ सप्टेबरला सुसाईड नोट लिहिली आणि पत्नीला पाठवली. कुरीअरने आलेली पतीची सुसाईट नोट वाचताच पत्नीच्या मनाची घालमेल झाली आणि सुखी संसाराचे स्वप्नाचा चुराडा झाल्याचे चित्र समोर आले. तिने लगेच मुंबई पोलिसांकडे धाव घेतली. मुंबई पोलिसांनी नागपूर गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांच्याकडे मदत मागितली. फक्त नागपुरातील कुरीअर कंपनीतून पत्र पाठवल्याचा धागा गुन्हे शाखेकडे होता.

रात्रीचा केला दिवस

व्यापाऱ्याचा जीव आपण वाचवू शकतो, हे ध्येय मनात ठेवून स्वःता डीसीपी राजमाने यांनी रात्रीचा दिवस केला. पीआय संतोष खांडेकर, संकेत चौधरी, वसंता चवरे, हवालदार नरेश सहारे, आशिष ठाकरे, शत्रृघ्न कडू, राजेश सेंगर यांनी रात्रीतून सीताबर्डीतील लॉज पिंजून काढले. कुरीअरवाल्याला झोपेतून उठवले. तसेच एका मोबाईल नंबरचा पाठलाग केला. महतप्रयासाने पोलिसांनी लॉजमधून प्रवीण यांना ताब्यात घेतले. तेव्हा कुठे सुटकेचा निःश्‍वास सोडला.

साहेब माझी चुक लक्षात आली.. मी तासाभरात आत्महत्या करणार होतो. मात्र तुम्ही मला देवासारखे भेटला. आता संकटांचा सामना करून जीवन जगेल. माझ्या दोन्ही मुलींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता दुप्पट मेहनत करेल. परंतु, आत्महत्येसारखी पळवाट शोधणार नाही.
- प्रवीण

अधिक वाचा - रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी औषधे विकत घेऊ नका; आहारतज्ज्ञ डॉ. जयश्री पेंढारकर यांचा सल्ला

एका व्यक्तीची जीव वाचविण्यासाठी माझ्या टीमने जी धडपड केली ती उर भरून येणारी आहे. त्या व्यक्तीला कुटुंबियांच्या ताब्यात दिले आहे. त्याला जगण्याची नवी दिशा दिली आहे. माझ्या क्राईम ब्रॅंच टीमचा सार्थ अभिमान आहे.
- गजानन राजनाने 
(डीसीपी, क्राईम ब्रॅंच) 

संपादन - अथर्व महांकाळ