किती ही श्रीमंती... कोरोनाच्या धास्तीने अनेकांनी बेड्स केले आरक्षित, वाचा काय म्हणतात महापौर जोशी

अतुल मेहेरे
Tuesday, 15 September 2020

महाभाग गरज नसताना शहरातल्या सिताबर्डीसारख्या बाजारांत रोज गर्दी करीत आहेत. चहाच्या टपऱ्यांवरती, गुपचुपच्या गाडीवरही गर्दी होते आहे. मग हेच लोकं लॉकडाऊन करणे कसे गरजेचे आहेत, हे पटवून सांगताना दिसतात, असे महापौर संदीप जोशी म्हणाले.

नागपूर : नागपुरात कोरोनाने विक्राल रूप धारण केले आहे. कोरोना रुग्णांचा आकडा ५३ हजारांवर गेला आहे. तसेच आजवर सतराशे जणांना आपला जीवही गमवावा लागला आहे. रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने सरकारी आणि खाजगी रुग्णालयात बेड्स उपलब्ध नाहीत. उपचाराअभावी रुग्णांचा जीव जात आहे. याचीही नागरिकांना भीती वाटत आहे. याचा सर्वाधिक धसका श्रीमंतांनी घेतल्याचे या निर्णयावरून दिसून येत आहे.

मला कोरोना होईल का?, झाला तर मी वेळेवर कुठे धावाधाव करू?, मला आणि माझ्या कुटुंबीयांना काही व्हायला नको?, अशी धास्ती शहरातील सर्वांनीच घेतली आहे. परंतु, श्रीमंतांनी कोरोनाची अधिक धास्ती घेतली आहे. यामुळेच त्यांनी खासगी रुग्णालयांत बेड्स आरक्षित करून ठेवले आहेत. वेळेवर बेड्स न मिळाल्यास आपल्या किंवा नातेवाईकाचा मृत्यू होऊ नये म्हणून त्यांनी ही सोय करून ठेवली आहे. परिणामी गरजू रुग्णांना बेड्स मिळत नाही आहे.

सविस्तर वाचा - सासऱ्याने जावयाची केली दहा लाखांची मदत; मात्र, सासरच्या त्रासाला कंटाळून मुलीने घेतला कठोर निर्णय

आमच्यातीलच काही लोकं असे आहेत की, तब्येतीला काहीही झालेलं नाही. प्रकृती उत्तम आहे. इम्युनिटी पॉवरही चांगली आहे. परंतु, मला काहीतरी होईल, या धास्तीने बेड्स अडवून ठेवले आहेत. काही जण या भ्रमात आहेत की, मला थोडीच कोविड होणार आहे.

त्यामुळे असे महाभाग गरज नसताना शहरातल्या सिताबर्डीसारख्या बाजारांत रोज गर्दी करीत आहेत. चहाच्या टपऱ्यांवरती, गुपचुपच्या गाडीवरही गर्दी होते आहे. मग हेच लोकं लॉकडाऊन करणे कसे गरजेचे आहेत, हे पटवून सांगताना दिसतात, असे महापौर संदीप जोशी म्हणाले.

महत्त्वाची बातमी - अत्यंत दुर्दैवी! रिमझिम पावसात खेळण्याचा तिला आवरला नाही मोह आणि घडली हृदयद्रावक घटना

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात सहाशे बेड्स आहेत. परंतु, तेथील स्टाफपैकी २५० जण कोरोनाबाधित झालेले आहेत. मेयो रुग्णालयातही सहाशे बेड्सच्या मागे स्टाफमधील शंभर जण पॉझिटिव्ह झालेले आहेत. सर्वत्र हीच स्थिती आहे. महापालिकेतही दोनशे अधिकारी, कर्मचारी पॉझिटिव्ह झालेले आहेत. इतर सर्व कार्यालयांमध्येही थोड्याफार फरकाने हीच स्थिती आहे. शहरातील आरोग्य यंत्रणा कोलमडण्याच्या मार्गावर आलेली असल्याचे महापौर जोशी म्हणाले.

खबरदारी घ्या, पण धास्ती घेऊ नका

लॉकडाऊन लागेल किंवा नाही हे आता सांगता येणार नाही. परंतु, प्रत्येक जण स्वतःला शिस्त लावू शकतो. त्यामुळे अति आवश्‍यक काम असल्याशिवाय कुणीही बाहेर पडू नये. बाहेर जायचे झाल्यास आपल्या आजूबाजूचा प्रत्येक जण कोरोनाबाधित आहे, असे समजूनच वागावे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, पण धास्ती घेऊ नये, असेही महापौर म्हणाले.

जाणून घ्या - प्रसूती शस्त्रक्रियेनंतरही मातेला होत होत्या असह्य वेदना; रुग्णालयात भरती करताच पोटात आढळले..

डॉक्टरांची यादी मोबाईल नंबरसह प्रसिद्ध

महापालिकेच्या वेबसाईटवर आम्ही डॉक्टरांची यादी मोबाईल नंबरसह प्रसिद्ध केली आहे. अनेकजण त्याचा लाभ घेत आहेत. ज्यांनी घेतला नसेल, त्यांनी ताबडतोब डॉक्टरांशी बोलावे. जेणेकरून कोरोनाबाबतची धास्ती कमी होईल. प्रत्येकाने खबरदारी घ्यावी, असे आवाहनही महापौर जोशी यांनी केले आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Nagpur, the rich made beds reserved