महिलांच्या पुढाकाराने ओबीसींसाठी आशावादी चित्र ः बघेल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 डिसेंबर 2019

संमेलनाध्यक्ष विजया मारोतकर यांनी समारोपीय भाषणात सर्वमताने ठराव पारित केल्याचे जाहीर करीत, सर्व ठरावांचा वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगितले.

नागपूर ः पारंपरिक रूढी-परंपरांचा पिढीजात वारसा चालविण्याचे काम स्त्रियांकडून अधिक प्रमाणात होत असते. त्यामुळे घरातील स्त्रियांनी या गोष्टी नाकारल्या तरच त्या संपुष्टात येतील. राष्ट्रीय ओबीसी महिला साहित्य संमेलनाच्या निमित्ताने नागपूरमध्ये या गोष्टीला सुरुवात झाली आहे. या संमेलनाच्या निमित्ताने देशभरात ओबीसींसाठी आशावादी चित्र निर्माण झाले आहे, असे प्रतिपादन रायपूर-छत्तीसगड येथील ज्येष्ठ समाजसेवक नंदकुमार बघेल यांनी संमेलनाच्या समारोपप्रसंगी गुरुवारी केले.

बजाजनगर येथील कस्तुरबा भवन येथे आयोजित राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ आयोजित फुले-शाहू-आंबेडकर पहिले ओबीसी महिला साहित्य संमेलनाचा आज समारोप झाला. छत्तीसगड येथील राजदा संपत्ती मंडळाचे अध्यक्ष विवेक वासनिक, ज्येष्ठ पत्रकार सुनील खोब्रागडे, ओबीसी लेखिका रेखा ठाकूर, डॉ. शरयू तायवाडे, ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. बघेल म्हणाले की, आपल्या देशात ब्राह्मणी विचारधारा वाढली आहे. त्यामुळेच अजूनही देशातील अनेक मंदिरांत महिलांना प्रवेशबंदी आहे.

महिलाच ब्राह्मणवादाच्या मुळाशी असल्याने सुरुवातीला त्यांचीच मानसिकता बदलविणे गरजेचे आहे. वाल्मीकी रामायणाचा दाखला देत ते म्हणाले की, जगात रामासारखी दुष्ट व्यक्ती दुसरी नसल्याचे मी मानतो. कारण, त्यांनी सीतेला सन्मानपूर्वक वागणूक दिली नाही. ओबीसी महिलांनी आपले संघटन अधिक मजबूत बनवावे. युद्ध नको बुद्ध हवा, अशी घोषणा राष्ट्रात घुमायला हवी. तेव्हाच खरी क्रांतीची ज्योत पेटेल.
विवेककुमार वासनिक म्हणाले की, दलित असूनही छत्तीसगडमध्ये आम्हाला राजाचा मान दिला जातो. हे फक्त डॉ. बाबासाहेबांच्या संविधानामुळेच शक्‍य झाले आहे. डॉ. बाबासाहेब या विद्वान व्यक्तीने लिहिलेल्या संविधानाचे विवेचन करण्याची पात्रता राज्यकर्त्यांमध्ये नाही. महिलांचा पुढाकार समाजाला पुढे नेणार आहे. नागपुरातून ओबीसी महिलांच्या संमेलनात उठलेला हुंकार भारतभर पसरविण्यास मदत होणार आहे.
रेखा ठाकूर म्हणाल्या की, बुद्धांचा धर्म हाच खरा धर्म आहे. संविधानातही आपल्या देशात शांती आणावी, असाच संदेश देण्यात आला आहे. आर्थिक, नैतिक, राजकीय आणि सामाजिक या सर्व क्षेत्रांत ओबीसींमध्ये समानता येणे गरजेचे आहे. डॉ. शरयू तायवाडे यांनी आपल्या मनोगतात संत साहित्यासह आधुनिक साहित्यातही महिलांची संख्या मोठी आहे. साहित्यातून वास्तव लेखन कसे करता येईल ते पाहावे. प्रस्थापितांच्या व्यासपीठावर बहुजन महिलांना व्यक्त होण्याची संधी दिली जात नसल्याने, ओबीसी महिलांनी स्वतःचे व्यासपीठ निर्माण केले आहे. संमेलनाध्यक्ष विजया मारोतकर यांनी समारोपीय भाषणात सर्वमताने ठराव पारित केल्याचे जाहीर करीत, सर्व ठरावांचा वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगितले.

ऍड. समीक्षा गणेशे आणि ऍड. रेखा बाराहाते यांनी ठरावांचे वाचन केले. प्रा. माधुरी गायधनी यांनी सूत्रसंचालन केले. आयोजन समितीतील सुषमा भड, अरुणा भेंडे, प्रज्वला तट्टे, नंदा देशमुख, ऍड. अंजली साळवे, कल्पना मानकर, अवंतिका लेकुरवाळे, प्रा. संध्या राजूरकर, प्रा. माधुरी गायधनी, निर्मला मानमोडे, उषा देशमुख, मीना भागवतकर, अर्चना बरडे, अरुणा भोंडे, अनिता ढेंगरे, साधना बोरकर, प्रा. डॉ. वीणा राऊत, प्रांजल ताल्हन, लक्ष्मी सावरकर, कुमुद वर्षे, उषा माहुरे, उज्ज्वला महाले, शुभांगी घाटोळे, प्रांजल वाघ आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहकार्य केले.

संमेलनातील प्रमुख ठराव
ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करून आकडेवारी घोषित करावी.
महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार बहाल करावा.
ओबीसी प्रवर्गासाठी वसतिगृह सुरू करावे.
ओबीसी विद्यार्थ्यांना स्वाधार योजना लागू करावी.
इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना लागू करावी.
महात्मा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था कार्यरत करावी.
ओबीसी फ्री शिपकरिता लावण्यात आलेली उत्पन्नाची अट रद्द करावी.
ओबीसी आर्थिक विकास महामंडळास निधी वळता करावा.
ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळावे.
लोकभाषा विद्यापीठाची महाराष्ट्र राज्यात स्थापना करावी.
शैक्षणिक समारंभात सरस्वतीच्या फोटोऐवजी सावित्रीबाई फुले यांचा फोटो ठेवण्यात यावा.
ओबीसींना लावण्यात आलेली क्रिमिलेअरची घटनाबाह्य अट त्वरित रद्द करावी.
मंडल आयोग नच्चीपन समिती आणि स्वामिनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू कराव्यात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur sakal obc women sammelan