Video : शाळेत खाल्ला पोषण आहार अन् थेट पोहोचले रुग्णालयात

nagpur food poison
nagpur food poison

नागपूर : हुडकेश्‍वर येथील मारोतराव मुडे हायस्कूलमध्ये पाचवी ते आठवीच्या 32 विद्यार्थ्यांना शुक्रवारी (ता.7) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास बचतगटातर्फे देण्यात आलेल्या पोषण आहारातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली. मुलांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी दोन विद्यार्थी गंभीर असल्याची माहिती आहे.

दररोज दुपारी दोन वाजताच्या सुमारास शगुण महिला बचतगटाद्वारे शाळेला पोषण आहाराचा पुरवठा केला जातो. आज दुपारी दोन वाजता नेहमीप्रमाणे बचतगटाकडून पोषण आहाराचा पुरवठा करण्यात आला. त्यानंतर आहार विद्यार्थ्यांमध्ये वितरित करण्यात आला. साडेतीनच्या सुमारास अचानक विद्यार्थ्यांना पोटात दुखणे आणि मळमळ होऊ लागली. काही विद्यार्थ्यांची डोके दुखायला लागली. यात 12 मुली आणि 20 मुलांचा समावेश होता.

32 विद्यार्थ्यांना विषबाधा
ही बाब शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग लांबट यांना कळताच, त्यांनी समोरच असलेल्या बोरकर हॉस्पीटलमध्ये मुलांना उपचारासाठी पाठविले. हॉस्पिटलमध्ये डॉक्‍टरांनी तपासणी करताच, विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रेफर केले. त्यामुळे शाळेने मुलांना तत्काळ रुग्णवाहिकेत मेडिकलला हलविले. मुलांवर आपातकालीन विभागात उपचार करण्यात आले. यापैकी 30 मुले धोक्‍याबाहेर असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. दरम्यान दोन मुलांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे डॉक्‍टरांकडून सांगण्यात आले. सध्या डॉक्‍टरांच्या देखरेखीत विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहे.

मारोतराव मुडे हायस्कूलमधील घटना, दोन गंभीर
घटनेची माहिती मिळताच, पोषण आहार अधीक्षक गौतम गेडाम यांनी मेडिकलमध्ये दाखल होऊन मुलांची पाहणी केली. बचतगटावर निश्‍चित कारवाई होणार असल्याचे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले. दरम्यान गौतम गेडाम यांनी अन्न व औषधी प्रशासन विभागाचे देशपांडे यांना माहिती दिली. त्यांनी शाळेत जाऊन पोषण आहाराचे नमूने घेतल्याचे समजते.

एका महिन्यापूर्वी आहारात सापडल्या अळ्या
शगुण महिला बचत गटाकडून शाळेत वितरित करण्यात येणाऱ्या पोषण आहारातून एका महिन्यापूर्वीच अळ्या निघल्याची तक्रार शाळेकडून देण्यात आली असल्याची माहिती आहे. याप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग लांबट यांना विचारणा केली असता, त्यांनी दुजोरा दिला. त्याचवेळी तक्रारीवर कारवाई झाली असती तर, आजची घटना टळली असती. दुसरीकडे दररोज आहार आल्यावर शाळेतील शिक्षक अगोदर खावून बघतात. आजही खाऊन बघीतल्यावर दिल्याचे ते म्हणाले. मात्र, असा कुठलाही प्रकार घडला नसल्याचा आरोप ग्राहक संरक्षण समितीचे सदस्य शाहिद शरीफ यांनी केला. यावेळी बचतगटांच्या कार्यशैलीवर शंका व्यक्त केली.

हिंगण्याच्या शाळेची पुनरावृत्ती
शहरातील मारोतराव मुडे शाळेत पोषण आहारातून विषबाधा झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. सहा महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे हिंगण्यातील एका शाळेत विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा झाली होती. त्यातही बऱ्याच मुलांचा समावेश होता. दुसरीकडे 3 महिन्यांपूर्वी प्रतापनगर शाळेतील पोषण आहारात अळ्या आढळल्या होत्या. यावेळी बचतगटावर आक्षेप नोंदविण्यात आला होता.

बचतगटांच्या कार्यशैलीवर शंका
महानगरपालिका हद्दीत नऊ महिला बचतगटांना पोषण आहार वितरित करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यापैकी काही दिवसांपूर्वीच सुसंस्कार, प्रियदर्शिनी आणि वैष्णवी या तीन बचतगटांचे बोगस कागदपत्र सादर केल्याप्रकरणी कंत्राट रद्द करण्यात आले. आता शहरात सौरभ, शगुण आणि वैभव यांचेसह आणखी तीन बचतगटांकडे पोषण आहाराची जबाबदारी आहे.

सौरभ, शगुण आणि वैभव हे तिन्ही बचतगट एकाच किचनमधून पोषण आहाराचा पुरवठा करीत असल्याचे यापूर्वी निदर्शनास आले होते. याकडे महापालिका शिक्षणाधिकाऱ्यासह, महिला व बालकल्याण विभागाने दुर्लक्ष केले. बचतगटांकडे एकच किचनशेड आणि चाळीस लाखापर्यंत उलाढालीचे प्रमाणपत्र नसल्याचे स्पष्ट असताना, या बचतगटांना कंत्राट दिल्याचे सकाळने प्रकाशित केले होते हे विशेष.

आईचे अश्रू अनावर...
जेवणात अळी दिसण्याची बाब नेहमीचीच होती. मुलांनी याबाबत घरीसुद्धा सांगितले होते. शाळेतील जेवण खाण्सारखे नसते, यामुळे घरूनच डबा देत जा, असा आग्रह मुलांचा आईकडे असायचा. त्यानुसार अनेकांनी घरून डबे नेणे सुरू केले होते. तरीही मित्रांच्या सोबतीने मुलांनी खिचडी खाल्ली आणि अघटीत घडल्याचे सांगत एका विद्यार्थ्याच्या आईला अश्रृ अनावर झाले.

मुलगी भावना इयत्ता 6 वीची विद्यार्थिनी आहे. ती दररोज घरूनच डबा नेत होती. आजही तिने सोबत डबा नेला होता. परंतु, मैत्रिणींसोबत खिचडी खाल्ली आणि उलट्या, पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर सायंकाळी शाळेतून फोन आला आणि घटनेबाबत माहिती मिळाली.
- कविता मालखेडे, विद्यार्थिनीची आई

मुलगा किसन इयत्ता 7 वीचा विद्यार्थी आहे. सायंकाळी 5.30 वाजुनही तो घरी न आल्याने शाळेत जाऊन बघितले असता, घटनेबाबत माहिती मिळाली. मेडिकलमध्ये येऊन मुलाची भेट घेतली. तो सुरक्षित असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.
- लाजवंती जांबरे, विद्यार्थ्याची आई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com