पेपर सुरू होत नसेल तर चहा पी आणि आराम कर

मंगेश गोमासे
Saturday, 10 October 2020

नागपूर विद्यापीठाचा ऑनलाईन परीक्षेचा दुसरा दिवसही गोंधळाने गाजला.  अॅप बंद पडल्याने अंतिम सत्राच्या शुक्रवारच्या सतरा परीक्षा रद्द कराव्या लागल्या. शुक्रवारी रद्द झालेला पेपर आता रविवार आणि इतर दिवशी होणार आहे.

नागपूर : निर्धोक परीक्षेचा मोठा गाजावाजा करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या गुरुवारपासून सुरू झालेल्या ऑनलाईन परीक्षेचा गोंधळ शुक्रवारी कायम होता. सर्व्हरच्या तांत्रिक अडचणीमुळे शुक्रवारची परीक्षाच स्थगित करण्याची वेळ विद्यापीठावर आली. या प्रकाराने एकीकडे विद्यापीठाची बरीच नाचक्की झाली तर सोशल मीडीयावरही विद्यापीठ बरेच ट्रोल झाल्याचे दिसून आले. मात्र, काहींनी तर ‘पेपर सुरू होत नसेल तर चहा पी आणि आराम कर' या आवाजाचा रेकॉर्ड फिरवित, विद्यापीठाची चांगलीच फिरकी घेतल्याचे दिसून आले.

नागपूर विद्यापीठाचा ऑनलाईन परीक्षेचा दुसरा दिवसही गोंधळाने गाजला.  अॅप बंद पडल्याने अंतिम सत्राच्या शुक्रवारच्या सतरा परीक्षा रद्द कराव्या लागल्या. शुक्रवारी रद्द झालेला पेपर आता रविवार आणि इतर दिवशी होणार आहे. त्याबाबातचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे. 

ठळक बातमी - जेवताना पोळी कधी आणि किती खावी? जाणून घ्या आहारतज्ज्ञ डॉ. कविता गुप्ता यांच सल्ला
 

विद्यापीठाच्या परीक्षा अ‍ॅपमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे तसेच सर्व्हर अचानक बंद पडल्याने शुक्रवारी तीन टप्प्यातील परीक्षा रद्द करण्यात आल्या. दरम्यान परीक्षेच्या हेल्पलाईनवर कुणी कॉल केल्याचे सांगून ‘पेपर सुरू होत नाही तर चहा पी आणि आराम कर. आज पेपर नाही झाला तर तीन दिवसांनी होईल. चिंता नसावी,‘ अशा प्रकारचा सल्ला देणारा ऑडिओ कॉल तयार करीत, सर्वत्र फिरविल्याचे दिसून आले. मात्र, विद्यापीठाच्या क्रमांकाशिवाय कुणी बाहेरील व्यक्ती अशाप्रकारे विद्यार्थ्यांची दिशाभूल करीत असल्याचे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विद्यापीठाची बरीच बदनामी झाल्याचे दिसून आले.
 

कडक कारवाई करणार
गेल्या काही दिवसांपासून विद्यापीठाची बदनामी करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहेत.  अशाप्रकारे विद्यापीठाच्या हेल्पलाईनच्या नावाने अशाप्रकारचा व्हाईस कॉल फिरविण्यात आला असून, त्याने विद्यापीठाची बरीच बदनामी होत, असल्याने याची दखल घेत, विद्यापीठ याविरोधात तक्रार करणार आहे.
डॉ. प्रफुल्ल साबळे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, 

संपादन  : अतुल मांगे  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur University troll over postponement of exams