नागपूर ब्रेकिंग : वाठोडा ठाणेच कोरोना संशयित, वाचा काय झाला प्रकार 

शुक्रवार, 19 जून 2020

वाठोड्यातील पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या 10 कुख्यात गुंडांना 6 जून रोजी अटक करण्यात आली होती. यात कुख्यात डॉन संतोष आंबेकरच्या भाच्यासह अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असणाऱ्या आरोपींचा समावेश होता.

नागपूर : आरोपीला कोरोना झाला अन्‌ हुडकेश्‍वर पोलिसांना क्वारंटाईन व्हावे लागल्याची घटना ताजीच असताना वाठोडा ठाण्याच्या बाबतीतही असाच काहीसा प्रकार पुढे आला आहे. दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या आरोपीला कोरोनाची बाधा असल्याचे निष्पन्न झाले. या आरोपीच्या संपर्कात आलेल्या तब्बल 32 कर्मचाऱ्यांना तपासणी करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रारंभी या कर्मचाऱ्यांना स्वत:च्या खिशातून तपासणीचे शुल्क देण्यास सांगण्यात आले होते. त्यावरून चांगलाच वादंग झाला. 

वाठोड्यातील पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या 10 कुख्यात गुंडांना 6 जून रोजी अटक करण्यात आली होती. यात कुख्यात डॉन संतोष आंबेकरच्या भाच्यासह अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असणाऱ्या आरोपींचा समावेश होता. पीसीआरनंतर न्यायालयाने गुन्हेगारांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. कायदेशीर प्रक्रियेनुसार आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. एका आरोपीला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. 

असे का घडले? - प्रेमविवाहाचा करुण अंत; गर्भपात झाल्याने विवाहितेने केले असे...
 

दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 30 कर्मचारी या आरोपीच्या थेट संपर्कात आले होते. या सर्वांना कोरोनाची चाचणी करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. शासकीय रुग्णालयातून तपासणी केल्यास या कर्मचाऱ्यांना अहवाल येईपर्यंत रुग्णालयातच रहावे लागणार होते. त्याला कर्मचाऱ्यांनीच विरोध दर्शविला. त्यानुसार त्यांना खासगी लॅबमधून तपासणी करून घेण्याचे व त्यासाठी स्वत: 2 हजार 200 रुपये खर्च करण्याचे मौखिक आदेश देण्यात आले होते. हे शुल्क नंतर परत करण्याची तयारीही दर्शविण्यात आली होती. पण, खिशातील पैसे खर्च करावे लागणार असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता. 
 

गृहमंत्र्यांची पोलिस आयुक्तांशी चर्चा 

या प्रकरणाची माहिती व्हायरल होताच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली. तोवर दहा कर्मचाऱ्यांनी तपासणी करून घेतली होती. त्यांना तातडीने शुल्क परत करण्यासोबतच उर्वरित कर्मचाऱ्यांचे शासकीय खर्चातून तपासणी करून घेण्याचे आदेश देशमुख यांनी दिल्याची माहिती आहे.