भारतीय संविधान दिन : विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनासाठी संविधान प्रास्ताविका पार्क, ठरणार नवी ओळख

केवल जीवनतारे
Thursday, 26 November 2020

नुकतेच सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी नागपूर विभागाचे उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड यांच्याकडून संविधान पार्कचा आढावा घेतला. पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त काम झाले असून १४ एप्रिल २०२१ पर्यंत या पार्कचे सुंदर प्रारूप तयार होईल, असा विश्वास डॉ. हिरेखन यांनी व्यक्त केला.

नागपूर : भारतीय संविधानातूनच देशाची प्रगती शक्य आहे. संविधानातूनच कृतिशीलता, कल्याणकारी संकल्पनांची अंमलबजावणी होऊ शकते. संविधान संस्कारातून विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन तयार झाल्यास प्रत्यक्ष मानवतावाद जगणारा भारत निर्माण होईल. या हेतूने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या प्रांगणात संविधान प्रास्ताविका पार्क तयार होत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य जयंतीचे निमित्त साधून विद्यापीठातर्फे लॉ कॉलेज येथे ‘संविधान प्रास्ताविक पार्क’ उभारण्याची संकल्पना उपकुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांनी मांडली. संविधान दिनाचे निमित्त साधून डॉ. हिरेखन यांच्याशी संवाद साधून या पार्कच्या संकल्पनेला मूर्त रुपे देण्यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेतली.

हेही वाचा - बाबा आमटेंच्या आनंदवनमधील वादाला कुठून झाली सुरुवात, नेमके काय आहे प्रकरण?

पार्क उभारणीसाठी समन्वय समितीमध्ये डॉ. गिरीश गांधी, माजी न्यायमूर्ती किशोर रोही, निवृत्त कुलसचिव पुरण मेश्राम, माजी आमदार अनिल सोले, माजी आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, माजी आमदार प्रकाश गजभिये, डॉ. अनिल हिरेखन, डॉ. श्रीकांत कोमावार यांचा समावेश आहे. संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा बसविण्यात आला आहे.

प्रास्ताविक स्तंभ उभारण्यात येत आहे. विद्यापीठाने पार्कचे सुंदर डिझाइन तयार केले आहे. शिल्पकलेसह इतर संविधान निर्मितीच्या कार्यातील महत्त्वाचे टप्पे येथे अंकित करण्यात येतील. यासाठी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचेही सहकार्य मिळत आहे. तसेच सामाजिक न्याय विभागाने २ कोटी ६३ लाखाचा निधी मंजूर केला आहे.

क्लिक करा - अरे बापरे!  प्राचार्यांनीच केली प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी

नुकतेच सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी नागपूर विभागाचे उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड यांच्याकडून संविधान पार्कचा आढावा घेतला. पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त काम झाले असून १४ एप्रिल २०२१ पर्यंत या पार्कचे सुंदर प्रारूप तयार होईल, असा विश्वास डॉ. हिरेखन यांनी व्यक्त केला.

असा असेल संविधान पार्क

भारतीय संविधानातील उद्देशिकेच्या नजरेतला भारत या संविधान प्रास्ताविका पार्कमध्ये दिसावा यासाठी पार्कच्या मधोमध सांची येथील स्तूपाच्या धर्तीवर प्रवेशद्वार असेल. या परिसरात राष्ट्रपती भवन, सर्वोच्च न्यायालय, संसद भवन याच्या प्रतिकृती असणार आहेत. या तिन्ही संस्थांमधील काम कसे चालते याचे प्रदर्शन या पार्कमध्ये ठेवण्यात येईल. एम्पो थिऐटर उभारण्यात येणार असून येथे संविधानाची मूल्ये सांगून संविधान संस्कार रुजविण्याचे महत्त्वाचे कार्य येथे होईल.

अधिक वाचा - पाण्याच्या कॅनलमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; अवस्था बघून उपस्थितांच्या पायाखालची सरकली जमीन

नागपूरची एक नवी ओळख ठरणार
देशाचे हे संविधान प्रत्येक भारतीयाच्या हिताचे आहे. संविधान वाचन संस्कृती आता संविधान वचनबद्धतेच्या दिशेने नेणे अपेक्षित आहे. हाच उद्देश ठेवून सामाजिक न्याय विभागानेही संविधान प्रास्ताविक पार्क उभारण्यासाठी निधी दिला आहे. संविधान पार्क ही नागपूरची एक नवी ओळख ठरणार आहे. 
- डॉ. अनिल हिरेखन,
उपकुलसचिव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur will be the new identity of the Constitution Park