VIDEO : एकच नंबर! नागपूरच्या रस्त्यावर दिसले 'छपरी' अन् 'भैताड'ही, शहरभरात रंगली एकच चर्चा

nagpuri local language word on NHAI flyover pillar at mankapur nagpur
nagpuri local language word on NHAI flyover pillar at mankapur nagpur

नागपूर : शीर्षक वाचून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण ही सत्य परिस्थिती आहे. नागपूरच्या रस्त्यांवर खरोखरच छपरी अन भैताड हे शब्द रेखाटलेले आहेत. नागपूरकरांच्या रोजच्या जीवनातील व बोलीभाषेतील छपरी, भैताड, क्या बे, सही बे, कायकू, काय करून रायला, एक नंबर यासारखे अनेक शब्द उड्डाणपूलाच्या पिलरवर रेखाटण्यात आले असून, सध्या ते सर्वसामान्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. 

शहराच्या सौंदर्यीकरणासोबतच स्थानिक भाषा व नागपूरची संस्कृती झळकावी, या उद्देशातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरातील एका डिझायनिंग फर्मला सौंदर्यीकरणाचे काम दिले आहे. याअंतर्गत 'एनएचआय' ने उभारलेल्या सदर येथील लिबर्टी चौक ते मानकापूर पर्यंतच्या उड्डाणपूलाचे पिलर रंगविण्याचे काम या संस्थेने हाती घेतले आहे. सदर परिसरातील विविध भागांतील पिलरवर विविध थीम्स रेखाटण्यात आल्या आहे. विभागीय क्रीडा संकुल परिसरात खेळाडूंना आकर्षित करण्यासाठी पुतळे व खेळांशी संबंधित चित्रे असून, काटोल मार्गावर ऍक्वा थीमच्या माध्यमातून मासे व पक्षी चितारण्यात आले आहेत. तर छावणी परिसरात अवकाश विश्वाशी संबंधित चित्रे आहेत. 

मात्र नागरिकांचे सर्वाधिक लक्ष कोराडी रोडवरील खास 'वऱ्हाडी टच' असलेले अस्सल नागपूरी शब्द वेधून घेत आहेत. येथील पिलरवर नागपूरकरांच्या रोजच्या जीवनात वापरले व जागोजागी बोलले जाणारे छपरी, भैताड, क्या बे, सही बे, कायकू, काय करून रायला, एक नंबर, तर्री पोहा, समोसा खायेगा, चमन, बावा, काऊन, शायनिंग मार्रा क्या, पैदल हैं क्या, झामल झामल, चहा पाजतं काय, खर्रा देणं बे यासारखे लोकप्रिय असलेले शब्द रेखाटण्यात आले आहेत. 

नागपूरकरांना भावला प्रयोग - 
हा अनोखा प्रयोग नागपूरकरांनाही खूप भावला आहे. या रस्त्याने ये-जा करणारे अनेक वाहनधारक दोन मिनिटे वाहन थांबवून हे शब्द बारकाईने न्याहाळतात. या अनोख्या प्रयोगाची स्तुती करतात. या निमित्ताने शहराच्या सौंदर्यात तर भर पडलीच, शिवाय देशभर असलेली नागपूरची ओळख व संस्कृतीही टिकून राहण्याला मोठी मदत होणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, उपराजधानीत बोलल्या जाणाऱ्या या भाषेचा न्यूनगंड दूर होऊन नागपूरकरांना त्याचा अभिमान वाटणार आहे. 

संपादन - भाग्यश्री राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com