लय भारी, लॉकडाउन टाळण्यासाठी नागपूरकर घरांमध्येच !

Nagpurkar to avoid lockdown, stay at home
Nagpurkar to avoid lockdown, stay at home

नागपूर : आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरात लॉकडाउनचा इशारा दिल्यामुळे नागपूरकरांनी आज स्वयंस्फूर्तीने घरांमध्येच राहणे पसंत करीत "जनता कर्फ्यू'ला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एकप्रकारे नागपूरकरांनी "लॉकडाउन नकोच, आम्ही नियम पाळू', असाच संदेश आयुक्तांना दिला.

विशेष म्हणजे दुकानदारांनीही शटर "डाऊन' करून महापौर संदीप जोशी, आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. "जनता कर्फ्यू'मुळे शहरातील प्रमुख बाजारपेठा बंद होत्या तर अत्यावश्‍यक सेवेतील नागरिकांचीच वाहने धावल्याने रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. उद्या रविवार असून नागरिकांनी घरांमध्येच राहावे, असे आवाहन महापौर व आयुक्तांनी केले आहे. 

कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता शहरात लॉकडाउनची स्थिती निर्माण झाली. पालिकेत शुक्रवारी झालेल्या लोकप्रतिनिधी आणि आयुक्तांच्या बैठकीत लॉकडाउन टाळण्याचेच मत मांडण्यात आले. त्यामुळे दोन दिवसांच्या जनता कर्फ्यूची संकल्पना पुढे आली. आज सकाळपासूनच जनता कर्फ्यूच्या कडेकोट अंमलबजावणीसाठी पोलिसांनी वाहनावरील भोंग्याद्वारे जनजागृती केली.

त्यामुळे पोलिसांच्या भीतीनेही काही नागरिक, विशेषतः तरुण वर्ग घराबाहेर पडला नाही. दुकानदारांनीही दुकाने बंद ठेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कर्फ्यूच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक चौकांमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. सकाळपासून पोलिस बाहेर पडणाऱ्यांची विचारपूस करीत होते. दिवसभर पोलिसांनी किल्ला लढविला.

परिणामी घरातून बाहेर पडण्याचा सर्वांनीच मोह आवरला. शहरातील सर्व मेडिकल स्टोर्स, रुग्णालये सुरू होती. त्यामुळे औषधी आदी खरेदीसाठीच एक किंवा दोघे बाहेर पडले. परंतु हे प्रमाण अत्यल्प होते. जनता कर्फ्यूमुळे बडकस चौक, महाल, कोतवाली, इतवारी, सिताबर्डी, सदर, इंदोरा, सक्करदरा, गिट्टीखदान, धरमपेठ, गोकुळपेठ येथील बाजारपेठा बंद होत्या. शहरातील सर्वच भाजीबाजारही बंद होते.

एकूणच नागपूरकर नागरिक व दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यूचे पालन करीत लॉकडाऊन टाळण्यासाठी पुढाकार घेतला. मात्र, नागपूरकरांची खरी कसोटी पुढील काही दिवसांत लागणार आहे. पुढील काही दिवसांतील नागरिकांच्या वागणुकीवर लॉकडाऊनचे भवितव्य ठरणार आहे. 

नागपंचमीची पूजा घरीच 
दरवर्षी प्रत्येक शिवमंदिर तसेच नागोबा मंदिरात जल्लोषात नागपंचमी साजरी केली जाते. यानिमित्त शहरातील अनेक चौकांना जत्रेचेच स्वरुप येत होते. मात्र, आज नागपूरकरांनी मंदिरात जाण्याऐवजी घरीच नागपंचमीचा सण कुटुंबीयांसोबत साजरा केला. त्यामुळे प्रथमच आज मंदिरांमध्ये गर्दी दिसून आली नाही. काही नागरिकांनी मात्र नागोबा मंदिर गाठून पूजा केली. 

महापौर, आयुक्तांनी केली पाहणी 
नागरिकांकडून "जनता कर्फ्यू' स्वयंस्फूर्तीने पाळला जात आहे की नाही, याबाबत तपासणी करण्यासाठी महापौर संदीप जोशी, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहराच्या विविध भागात पाहणी केली. बडकस चौक, जरीपटका, शंकरनगर, बजाजनगर, झाशी राणी चौक, व्हेरायटी चौक, सदर, जरीपटका, इंदोरा, इतवारी, पाचपावली, गांधीबाग, महाल, यशवंत स्टेडियम परिसरात महापौर फिरले. आयुक्त मुंढे यांनी गोकुळपेठ, सीताबर्डी, मस्कासाथ, सेंट्रल एव्हेन्यू परिसरात दौरा केला. 

  
नागपूरकरांनी "जनता कर्फ्यू'ला भरभरून प्रतिसाद दिला. उद्याही नागपूरकरांनी असाच प्रतिसाद कायम ठेवावा. स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी नागरिकांनी दाखवलेल्या सामंजस्याची तुलना नाही. कोव्हिड संदर्भातील दिशानिर्देशांचे सर्व मिळून पालन केल्यास लॉकडाउनची गरजच पडणार नाही. नागरिकांनी आपल्या सवयी बदलून घरीच राहावे.                      संदीप जोशी, महापौर. 

अत्यावश्‍यक गरज वगळता आज कुणीही घराबाहेर पडलेले नाही. सर्व आस्थापनाही बंद आहेत. उद्याही हेच चित्र कायम असेल, अशी अपेक्षा आहे. परंतु दोन दिवस कर्फ्यू पाळायचा आणि तिसऱ्या दिवशी गर्दी, असे घडले तर 15 दिवसांचा कर्फ्यू लावण्यात येईल. जनता कर्फ्यूचे आवाहन नागपूरकरांनी मनावर घेतले. नागरिकांनी कोरोना हद्दपार होईपर्यंत असेच वागावे. 
तुकाराम मुंढे, आयुक्त. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com