हाती कुंचला अन् डोक्यातील कल्पनांमध्ये रंग भरून नागपूरकर पंकजने राष्ट्रीय स्पर्धेत उमटवला ‘ठसा'

NagpurKar Pankaj's success in the national competition
NagpurKar Pankaj's success in the national competition

नागपूर : कोरोनाकाळातील लॉकडाउनचा सदउपयोग नागपुरातील हरहुन्नरी कलावंत पंकज कावळे याने केला. हाती कुंचला धरला. डोक्यातील कल्पनांमध्ये रंग भरून बोलकी चित्रे कॅनव्हासवर रेखाटली. रसिकांनीही त्याच्या कल्पकतेला दाद दिली. त्यातून मिळालेल्या आत्मविश्वासाच्या बळावर राष्ट्रीय ऑनलाईन स्पर्धेत सहभाग घेतला. पुण्याच्या प्रतिष्ठित संस्थेतर्फे आयोजित ऑनलाइन नॅशनल आर्ट एक्झिबिशनमध्येही पंकजच्या चित्रांनी सोनेरी मोहोर उमटविली आहे.

बालपणापासून कलाप्रेमी असणाऱ्‍या पंकज कावळे यांनी लॉकडाऊनच्या काळात संधी शोधली. घरी रिकामे बसून राहण्याऐवजी रंगसाधना सुरू केली. पेपरवर्क, कॅन्व्हास पेंटिंग, ऑईल पेंटिंग, ग्राफिक्सचे स्केच रेखाटत जीवनाला सकारत्मकतेचा रंग दिला. जवळपास ३०० कलाकृती त्यांनी साकारल्या. या कलाकृती सहज म्हणून फेसबूक आणि अन्य सोशल मीडियावर अपलोड केल्या. रसिकांनी त्याला पसंती दिली. अल्पावधीतच पेंटिंग्जना मागणी सुरू झाली.

पंकजचे वडील लिलाधर आर्ट टिचर होते. यांच्याकडूनच पंकजला चित्रकलेचे बाळकडू मिळाले. १९९३ मध्ये इयत्ता पाचवीत असतानाच चित्रकलेचे पहिले बक्षीस मिळाले. नंतर पुरस्कारांची मालिकाच सुरू झाली. सध्या ते एमएफएचे शिक्षण घेत आहेत. चित्रकलेसोबतच पंकजला कविता आणि लेखनाचीही आवड आहे. नाटकात कामाचाही अनुभव आहे. सध्या चित्रपट लिहायला घेतला आहे. लवकरच तो देखील चंदेरी पडद्यावर आणण्याचा पंकजचा मानस आहे.

मिळणारे उत्पन्न सैनिक कुटुंबासाठी

यशाचा एक एक टप्पा ओलांडत असताना पंकज यांनी पुण्याच्या आर्टबिट्‍स फाउंडेशनतर्फे आयोजित चौथ्या ऑनलाइन आर्ट एक्झीबीशनसाठी अर्ज केला. त्यांनी एकून ५ कलाकृती पाठविल्या होत्या. त्यातील तीन कलाकृतींची निवड प्रदर्शनासाठी झाली असून त्यांनी सुवर्ण पदकही पटकावले आहे. ‘जाणीव' नावाने सुरू असणारे हे प्रदर्शन १५ ऑगस्टपर्यंतच राहणार असून त्यातून मिळणारे उत्पन्न सैनिक कुटुंबांसाठी खर्च केले जाणार आहे. नागपूरकरांनी या ऑनलाइन प्रदर्शनाला भेट देण्याची विनंती पंकजने केली आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com