
अनेक युवक आपापल्या वाहनांना प्रेशर हॉर्न लावतात. स्टाइल मारण्यासाठी तो हॉर्न मोठमोठ्याने वाजवून रस्त्यावरून बाइक दामटतात. त्यामुळे अन्य वाहनचालक बुचकळ्यात पडतात तर पायी चालणाऱ्यांचा गोंधळ उडतो. वृद्धांना तर एकदम दचकवल्याचा भास होतो.
नागपूर : एकेकाळी पुढे जायचे असेल तर "हॉर्न वाजवा' असे सांगितले जात होते. आता मात्र विविध प्रकारच्या कर्णकर्कश आवाजांमुळे सर्वच त्रस्त झाल्याने
"हॉर्न वाजवू नका' अशी विनंती करण्याची वेळ आली आहे. वाहनांमधून निघणारा विषारी धूर आणि वाहनांच्या हॉर्नमुळे प्रदूषणात वाढ झाली आहे. शहरात गर्दीच्या ठिकाणी होणारी वाहनांची कोंडी आणि ट्रॅफिक जाममुळे हॉर्न वाजविण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामतः शहरात मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण झाल्याची नोंद आहे. मात्र, वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षित धोरणामुळे वर्षभरात फक्त 160 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली, हे विशेष.
अधिक माहितीसाठी - आता चिअर्सला नों लिमिट, या अल्कोहलचा लागला शोध
शहरात रस्ते बांधकाम आणि मेट्रो पुलाचे बांधकाम सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडी नेहमीचीच झाली आहे. वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांची नेमणूक शहरातील मुख्य चौकात केली आहे. तरीही शहरातील वाहतुकीची कोंडी, ट्रॅफिक जामचा प्रश्न सुटत नाही. वाहतूक खोळंबल्यामुळे रस्त्यावर अडकलेले वाहनचालक मोठमोठ्यांनी हॉर्न वाजवितात. ट्रॅफिक जाम असलेल्या रस्त्यावर आवाजाची क्षमता मोजल्यास मर्यादेपेक्षा चौपट आवाज असल्याची नोंद पर्यावरण अभ्यासक संघटनेकडे आहे.
शहरात आजघडीला 16 लाखांपेक्षा जास्त वाहने आहेत. सर्वाधिक वाहनांची संख्या धंतोली, सदर आणि सीताबर्डी झोनमध्ये असते. याच परिसरात हॉस्पिटलची संख्याही मोठी आहे. वाहनांच्या कर्णकर्कश आवाजांमुळे रुग्णांना नेहमीचाच त्रास आहे. या प्रकारची तक्रार वाहतूक शाखेकडे केल्यास कोणताही पर्याय आतापर्यंत शोधण्यात आला नाही. त्यामुळे रुग्णांसाठी कर्णबधिर ठरणारा वाहनांच्या हॉर्नचा आवाज सहन करावा लागत आहे.
अनेक युवक आपापल्या वाहनांना प्रेशर हॉर्न लावतात. स्टाइल मारण्यासाठी तो हॉर्न मोठमोठ्याने वाजवून रस्त्यावरून बाइक दामटतात. त्यामुळे अन्य वाहनचालक बुचकळ्यात पडतात तर पायी चालणाऱ्यांचा गोंधळ उडतो. वृद्धांना तर एकदम दचकवल्याचा भास होतो. वर्षभरात वाहतूक पोलिसांनी केवळ 160 जणांवर कारवाई केली आहे. हा आकडा पाहता वाहतूक पोलिसांचा अजिबात वचक नसल्याचे दिसते किंवा अशा वाहनांकडे दुर्लक्ष केल्याचे लक्षात येते.
अनेकदा मुले विनाकारण हॉर्न वाजवित वाहनांनी धूम ठोकतात. वाहनांना बसविलेल्या प्रेशर हॉर्नमुळे ध्वनी प्रदूषणात वाढ झाली आहे. "नो हॉर्न प्लिझ' हे अभियान पोलिस आयुक्त आणि वाहतूक शाखेने अनेकदा राबविले आहे. मात्र, अशा अभियानांचा कोणताही उपयोग झाला नाही. शहरातील ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आता शहरवासीयांनाच सामूहिक प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.
क्लिक करा - आला 'हिवसाळा', स्वेटर जॅकेटसह रेनकोटा घाला
जवळपास दीड ते दोन लाखांची बुलेट चालविणारे युवक रस्त्यावरील अन्य वाहनचालकांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी मोठ्याने फटाके फोडत बुलेट चालवित असतात. फटाक्याचा मोठा आवाज अचानक आल्यास वाहनचालक दचकतात. त्यामुळे वाहन अनियंत्रित होण्याची भीती असते. परंतु, फटाके फोडणाऱ्या बुलेट चालकांवर कारवाई करण्याची अनेकदा वाहतूक पोलिस हिंमतही करीत नाहीत.
नव्या वर्षात विशेष अभियान
वाहनांना प्रेशर हॉर्न लावणे कायद्याने गुन्हा आहे. अशा वाहनचालकांवर मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. ध्वनी प्रदूषण कमी व्हावे तसेच प्रेशर हॉर्नचा वापर होऊ नये, यासाठी नवीन वर्षात वाहतूक शाखेकडून विशेष अभियान राबविण्यात येईल. नागपूरकरांनी या अभियानाला यशस्वी करण्यासाठी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे.
- डॉ. भूषणकुमार उपाध्याय,
पोलिस आयुक्त.
पूर्णतः बंदी घाला
मर्यादेपेक्षा जास्त आवाज कानावर पडल्यास ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम पडू शकतो. कानाचा पडदा फाटण्याची शक्यता असते. बहिरेपणासुद्धा येऊ शकतो. तसेच रुग्णालय परिसरात प्रेशर हॉर्नचा वापर झाल्यास रुग्णांना त्रास होऊ शकतो तसेच त्यांच्या ट्रीटमेंटवरही फरक जाणवू शकतो. त्यामुळे प्रेशर हॉर्नवर पूर्णतः बंदी घालण्यात यावी
- डॉ. अमर मोंढे