गर्भात बाळ अन्‌ एमपीएससीचा पेपर, वाचा ही कहाणी...

केवल जीवनतारे
Saturday, 4 January 2020

'शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहाणार नाही', हा बाबासाहेबांचा शिक्षणाचा मंत्र वडील दिनेश विघ्ने यांनी लेकरांना दिला होता. लेकींना शिक्षणासाठी काहीच कमी पडू दिले नाही. बॅग विकणाऱ्या वडिलांची ही दीक्षा न्यायाधीश बनली. 

नागपूर : नऊ महिन्यांचा काळ पूर्ण झाला होता. कोणत्याही क्षणी प्रसूती होईल, असे डॉक्‍टरांनी सांगितले. मनात बाळाच्या जन्माचा आनंद तर तब्बल तीन तास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेचा पेपर लिहिताना होणाऱ्या वेदना सहन केल्या. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावरवर त्या माऊलीने "न्यायाधीशा'च्या परीक्षेत यश संपादन केले. लवकरच ती न्यायाधीशाच्या खूर्चीवर दिसेल. त्या माऊलीचे नाव दीक्षा दिनेश विघ्ने. विशेष असे की, पेपर दिल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत तिने गोंडस मुलीला जन्म दिला. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानून दीक्षाने अभ्यास केला. उराशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कष्ट उपसले. वडील दिनेश, आई प्रमिला, पती निखिल चतुर यांच्यासह सासू-सासऱ्यांच्या मिळालेल्या साथीचे दीक्षाने सोनं केले. ती न्यायाधीश झाली. दीक्षा मूळची चंद्रपूरची. भवनजीभाई शाळेतून दहावी उत्तीर्ण झाली. बारावीनंतर शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयात पाच वर्षीय एलएलबी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. 2017 मध्ये एलएलबी झाली.

हेही वाचा - रंगेल पतीचा पाडला मुडदा

घरातील आर्थिक परिस्थिती बघता दीक्षाचे लवकरच लग्न झाले. मात्र, वडील दिनेश यांनी दीक्षाच्या मनात पेरलेली शिक्षणाची जिद्द तिने कमी होऊ दिली नाही. एसआरपीत शिपाई असलेले पती निखिल यांनी तिला लग्ननंतर "एलएलएम'मध्ये प्रवेश घेऊन दिला. एलएलम सुरू असतानाच न्यायाधीश पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात आली. "दीक्षा'ने अर्ज केला. त्यावेळी गर्भात बाळाची चाहूल लागली होती. पूर्व परीक्षा एप्रिलमध्ये पास केली. यानंतर मुख्य परीक्षेची तारीख एक सप्टेंबर होती. बाळाचा जन्माची अंदाजे तारीख सप्टेंबरच्या पहिलाच आठवड्याची होती. मनात विचारांचं काहूर असतानाच बाळ जन्माला घालायचं यावर या दाम्पत्याने शिक्कामोर्तब केले. गर्भात बाळाच्या साक्षीने दीक्षाने अभ्यास करीत न्यायाधीश पद कवेत घेतले. 

बाळाला घेत मौखिक परीक्षा

ऑक्‍टोबरमध्ये मुख्य परीक्षेचा निकाल आला. 18 नोव्हेंबरला मौखिक परीक्षा होती. तयारी करताना पुण्याला काही दिवसांच्या तयारीसाठी गेल्यानंतर बाळाला सोबत घेऊन अभ्यास केला. सासूबाई इंदिरा यांनी आईची माया दाखवत आणि सासरे दिलीप चतुर यांनी वडिलांप्रमाणे धीर दिला. मौखिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर चिमुकल्या लेकीला छातीशी कवटाळले, त्यावेळी दीक्षाचे डोळे भरून आले. पती निखिलने केलेला त्यागाचे हे फळ असल्याचे दीक्षा नकळत बोलून गेली.

अधिक वाचा - ...अन्‌ त्याने जिल्हाधिकाऱ्यांसमोरच काढली फिनाइल बॉटल

Image may contain: 1 person, closeup
दीक्षाचे वडील दिनेश विघ्ने

दीक्षाचे वडील विकतात 'बॅग'

दीक्षाचे वडील दिनेश विघ्ने यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. चंद्रपूर येथील बसस्थानकावर बॅग, पर्स विकून ते उदरनिर्वाह करतात. ज्या दिवशी बॅग विकले नाहीत तो दिवस आड्याकडे बघून काढायचा, मात्र "शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहाणार नाही', हा बाबासाहेबांचा शिक्षणाचा मंत्र लेकरांना दिला होता. लेकींना शिक्षणासाठी काहीच कमी पडू दिले नाही. बॅग विकणाऱ्या वडिलांची ही दीक्षा न्यायाधीश बनली. दिवाणी न्यायाधीश (क) स्तर व प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी म्हणून त्यांची निवड झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur's girl diksha will become Judge