फेसबुकवरून मैत्री करताय सावधान, घडला अनुचित प्रकार 

need to be careful when making friends on Facebook
need to be careful when making friends on Facebook

नागपूर :  फेसबुकवरून मैत्री करून एखाद्याच्या प्रेमात पडत असाल तर आजच सावध व्हा. कारण काही युवक फेसबुक फ्रेंडशीप करून महिला-मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढतात. लग्नाचे आमिष दाखवतात. त्यानंतर सर्वस्व लुटल्यानंतर ब्लॅकमेल करतात किंवा लग्न करण्यास नकार देतात. नुकताच असाच एक प्रकार उघडकीस आला. फेसबुक फ्रेंडने महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक युवक फेसबुकवरील तरुणी किंवा महिलांचे फोटो बघून त्यावर वारंवार कमेंट आणि लाइक्स करीत असतात. त्यानंतर ते फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. त्यानंतर मोबाईल क्रमांक मिळवून वारंवार प्रेमळ मॅसेज पाठवतात. भूलथापा देऊन आपलेसे करण्याचा प्रयत्न करतात. अशाच प्रकारच्या एका घटनेत गिट्टीखदानमध्ये राहणारी ३२ वर्षीय महिलेची फेसबुकवरून हरियाणा राज्य सरकारमध्ये नोकरीवर असलेल्या विनोदसिंग लक्ष्मणसिंग राठी (३०, सोनीपत- हरियाणा) या अधिकाऱ्याशी ओळख झाली.

त्याने महिलेबाबत सर्व विचारपूस केली. ती महिला विधवा होती आणि तिला सहा वर्षांचा मुलगा आहे. विनोदने गेल्या दोन वर्षांपासून विधवा महिलेशी फेसबुकवर झालेल्या मैत्रीचा फायदा घेतला. त्याने नागपुरात येऊन तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिच्या घरी जाऊन आई-वडील, नातेवाईकांची भेट घेऊन लग्न करण्याची तयारी दर्शवली. १९ जानेवारी २०२० रोजी ती हरियाणामध्ये भेटीला गेली. तिने घरी नेऊन आई-वडीलांशी भेट करून देण्याची विनंती केली. मात्र, त्याने टाळाटाळ करीत तिला हॉटेलमध्ये ठेवले.

काही दिवसांनी तिने परत लग्नासाठी विचारणा केली असता त्याने चक्क नकार दिला. महिलेच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा सर्व प्रकार केवळ फेसबुकवर झालेल्या मैत्रीमुळे घडला. कौटुंबिक अडचणीमुळे आलेली एकटेपणाची भावना वाढलेल्या मुली आणि महिला यांची संख्या मोठी आहे.  या भावनिक आधाराकरिता बऱ्याचदा मुली अशा भूलथापांना बळी पडत असल्याचे समोर आले आहे.
 
ही घ्या काळजी

  • स्वतःचे फेसबुक अकाउंट लॉक करून ठेवा
  • अनोळखी व्यक्तीची फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये
  • व्यक्तीच्या प्रोफाइलची खात्री करावी
  • म्युच्युअल फ्रेंड्सकडे संबंधित व्यक्तीची चौकशी करा
  • आमिष व भूलथापांना बळी पडू नका
  • कुठल्याही स्वरूपातील वैयक्तिक माहिती शेअर करू नका

 
बनावट अकाउंट ठरतेय डोकेदुखी

फेसबुकवर सायबर क्रिमिनल्स मुलींच्या नावाने बनावट अकाउंट उघडतात. मुलींना फ्रेंड्स रिक्वेस्ट पाठवून चॅटिंग करतात. खासगी बाबी शेअर करतात. खासगी फोटो, बॉयफ्रेंडबाबतच्या खासगी रिलेशनची माहिती किंवा फोटो पाठवतात. त्याचा गैरफायदा घेऊन फोटो व्हायरल करण्याची धमकी देतात. शारीरिक संबंध किंवा खंडणीची मागणी करीत असल्याचे प्रकार समोर आले आहेत.
 

न घाबरता सायबर पोलिसांकडे करा तक्रार 
ऑनलाईन प्रेमाच्या जाळ्यात अडकू नये, अनोळखी व्यक्तीच्या अनेक भूलथापा आणि आमिषाला बळी पडू नये. फेसबुकवर प्रोफाईल लॉक ठेवावे. फ्रेड्स रिक्वेस्ट स्वीकारण्यापूर्वीच त्या व्यक्तीची माहिती घ्यावी. वारंवार मॅसेज करीत असल्यास त्याला थेट ब्लॉक करा. सोशल मीडियाचा वापर करून कुणी ब्लॅकमेल किंवा खंडणीचा मागणी करीत असल्यास न घाबरता सायबर पोलिसांकडे तक्रार करा. तक्रारीला गांभीर्याने घेऊन तक्रारदार मुलींचे नाव गुपीत ठेवून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल.
- केशव वाघ (सहायक पोलिस निरीक्षक, सायबर क्राईम) 

संपादन : अतुल मांगे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com