पहाटे मंदिराजवळ आला रडण्याचा आवाज, जावून बघताच उपस्थितांचेही पाणावले डोळे

अनिल कांबळे
Wednesday, 27 January 2021

नागरिक आवाजाच्या दिशेने गेले असता कापडात गुंडाळलेले नवजात बाळ त्याठिकाणी आढळून आले. ते बाळ थंडीत कुडकुडत होते.

नागपूर : तहसील हद्दीतील टीमकी येथील रंभाजी रोडवरील चांदेकर मंदिरासमोर पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बाळाच्या रडण्याचा आवाज आला. नागरिक आवाजाच्या दिशेने गेले असता कापडात गुंडाळलेले नवजात बाळ त्याठिकाणी आढळून आले. ते बाळ थंडीत कुडकुडत होते. हे दृश्य पाहून बघणाऱ्यांचेही डोळे पाणावले. 

दरम्यान, पोलिसांनी बाळाला ताब्यात घेऊन मेयो रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी अज्ञात मातेविरोधात गुन्हा दाखल केला असून त्या महिलेचा शोध सुरू आहे. 

हेही वाचा - मुलीची काळजी असणाऱ्या कुटुंबात तुझा पुनर्जन्म व्हावा, गौतम यांचा आमटे कुटुंबीयांवर अप्रत्यक्ष...

गेल्या वर्षी सापडली होती १७ नवजात बालके -

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमसंबंध, अनैतिक संबंध किंवा नको असलेल्या गर्भधारणेतून जन्म झालेल्या बाळांना अनाथालय, मंदिर किंवा कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर तसेच चक्क नाल्यात फेकून दिल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सध्या ही मोठी सामाजिक समस्या निर्माण झाली असून पोलिसांसमोर अशा अज्ञात मातेविरूद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर शोध घेण्याचे मोठे आव्हान आहे. गेल्या वर्षी १७ नवजात बालके सापडली होती, तर यंदा पहिल्याच महिन्यात हे बाळ आढळून आले आहे.

अशी आहेत कारणे -
अनैतिक संबंध, अल्पवयीन मुलींना राहिलेली गर्भधारणा आणि नको असलेल्या मुलीची जन्म झाल्यामुळे कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर नवजात बाळ सापडल्याच्या घटना समोर येतात. असुरक्षित शारीरिक संबंध, वंशाला दिवा हवाच, अशा धारणेमुळे असे प्रकार समोर येत आहेत.  

हेही वाचा - वाढदिवसाला नातेवाईक बसले जेवायला; बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन

शिक्षा आणि दंड -
चार महिन्यांची गर्भधारणा झाल्यानंतर गर्भपात करण्यास कायद्याने बंदी आहे. जर कुणी अपत्याची लपवणूक करण्यासाठी बाळाचा त्याग करीत असल्यास आयपीसीच्या कलमांनुसार गुन्हा दाखल होतो. हा गुन्हा दखलपात्र, अजामीनपात्र असून ७ वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंड असे कायद्यात प्रावधान आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new born baby found in timaki of nagpur crime news