स्वतःच्या मरण्याच्या भीतीपोटी डोरलेला रस्त्यात गाठून केला 'गेम'

गुरुवार, 4 जून 2020

नागपुरात दिसल्यानंतर डोरले आपला गेम करेल, अशी खात्री असल्याने त्याच्यापूर्वीच डोरलेचा गेम कर, असा सल्ला राजकीय वरदहस्त असलेल्या मास्टरमाईंडने दिला होता. त्यामुळे मुकेशची हिंमत वाढली होती. मुकेशने पाच ते सात साथिदारांसह मिळून डोरलेला रस्त्यात गाठून त्याचा खून केला.

नागपूर : भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष राज डोरले हत्याकांडातील अटकेतील दोन्ही आरोपींना न्यायालयाने शनिवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या हत्याकांडाला तपासात वेगळीच दिशा मिळण्याचे संकेत मिळाले आहेत. या हत्याकांडामागे कुणीतरी वेगळाच "मास्टरमाईंड' असल्याची चर्चा आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजयुमाचे शहर उपाध्यक्ष राज विजयराज डोरले (रा. भूतेश्‍वरनगर) याचा मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारा मुकेश नारनवरे, अंकित चतुरकर आणि त्यांच्या साथिदारांनी तिष्ण हत्यारांनी गळा चिरून खून केला होता. हा खून राजकीय वर्चस्वातून झाला असल्याची चर्चा आहे. या हत्याकांडामागे दुसराच मास्टरमाईंड असल्याचे सांगण्यात येते. 

लॉकडाउनपूर्वी मुकेश नारनवरे आणि राज डोरले यांच्यात हाणामारी झाली होती. त्यावेळी कोतवाली पोलिसांनी ठाण्यात एनसी दाखल करून प्रकरण थंडबस्त्यात ठेवले होते. प्रकरण दाखल होताच मुकेश नारनवरे हा गुजरातला गेला होता. त्याने तेथून राज डोरलेचा गेम करण्याची प्लानिंग केली. त्याने राज डोरलेच्या मागे काही पंटर लावून ठेवले होते. राज डोरलेने मुकेशला ठार मारण्याची धमकी दिली होती. तेव्हापासून मुकेश घाबरून काही दिवस भूमिगत झाला होता.

हेही वाचा - नागपूरकरांसाठी महत्त्वाची बातमी, सलून, स्पाबाबत आला हा निर्णय...

नागपुरात दिसल्यानंतर डोरले आपला गेम करेल, अशी खात्री असल्याने त्याच्यापूर्वीच डोरलेचा गेम कर, असा सल्ला राजकीय वरदहस्त असलेल्या मास्टरमाईंडने दिला होता. त्यामुळे मुकेशची हिंमत वाढली होती. मुकेशने पाच ते सात साथिदारांसह मिळून डोरलेला रस्त्यात गाठून त्याचा खून केला.

तसेच नाट्यमयरित्या पोलिसांच्या हातीसुद्धा लागले. दोन्ही आरोपींना शनिवारपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश आहेत. राज डोरले हत्याकांडानंतर भूतेश्‍वरनगरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे. आरोपींच्या कुटुंबाला आणि त्याला साथ देणाऱ्या युवकांवर हल्ला होण्याची शक्‍यता लक्षात घेता कोतवाली पोलिसांनी भूतेश्‍वरनगरात बंदोबस्त वाढवला आहे. 

मोबाईलचा सीडीआर काढला

मुख्य आरोपी मुकेश नारनवरे आणि अंकित चतुरकर यांना अटक केल्यानंतर त्यांचे मोबाईल ताब्यात घेतले आहेत. त्यांच्या मोबाईलचा सीडीआर काढण्यात येणार आहे. सीडीआरवरून खुलासा झाल्यास काहींचे बुरखे फाटण्याची शक्‍यता आहे.