थंडी व पावसाचे कॉकटेल..! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जानेवारी 2020

नववर्षाच्या स्वागतासाठी नागपूर सज्ज असतानाच मंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यामुळे वातावरणातील गारठाही चांगलाच जाणवत होता. दुपारी अचानक पावसाने दमदार हजेरी लावली आणि तापमानात कमालीची घट झाली.

नागपूर : मावळत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी दुपारी पावसाने हजेरी लावली. यामुळे वातावरणात कमालीचा गारठा निर्माण झाला होता. नववर्षाची सुरुवातही पावसानेच झाली. पहाटेच्या वेळी पावसाने हजेरी लावल्याने पहिल्या दिवशी सूर्यनारायणाचे दर्शन झाले नाही. त्यानंतरही सरी कोसळण्याचा क्रम अधूनमधून सुरूच होता. वातावरणाचा हा कॉकटेल काहींसाठी आनंदाचा "फिल' देणारा ठरला. पावसापासून बचावासाठी रेनकोट घालावा की स्वेटर हा प्रश्‍न पहिल्या घराबाहेर पडलेल्या नागपूरकरांना पडला होता. 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: 1 व्‍यक्ती, बाहेरील
थंडी आणि पावसाचे कॉम्बिनेशन असल्याने काहीजण रेनकोट आणि गरम वस्त्र एकत्र घालून बाहेर पडलेले दिसून आले.

नववर्षाच्या स्वागतासाठी नागपूर सज्ज असतानाच मंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यामुळे वातावरणातील गारठाही चांगलाच जाणवत होता. दुपारी अचानक पावसाने दमदार हजेरी लावली आणि तापमानात कमालीची घट झाली. अनेक भागात दुपारीच शेकोट्या पेटलेल्या दिसून आल्या. शेकोटीजवळ बसून रात्रीच्या "सेलिब्रेशन'चे बेत ठरविले गेले. सायंकाळच्या सुमारास पुन्हा सरींनी हजेरी लावली. त्यानंतर मात्र घराच्या गच्चीवर पार्ट्या करणाऱ्यांना पावसाचा अंदाज घेऊन ऐनवेळी स्थळ बदलण्याचा निर्णय घ्यावा लागला. 

*भान तर ठेवा राव... ही पाण्याची कॅन नाही, वाचा काय झाले*
 

थंडी आणि पावसाचे कॉम्बिनेशन असल्याने काहीजण रेनकोट आणि गरम वस्त्र एकत्र घालून बाहेर पडलेले दिसून आले. एकाच गाडीवरून जाणाऱ्यापैकी चालकाने रेनकोट घातलेले आणि मागे बसणाऱ्याने जॅकेट घातल्याने अगदीच विरळ आणि विसंगत चित्र आज नागपुरात दिसून आले. हवामान विभागाने 1 व 2 जानेवारीला पुन्हा वादळी गारपिटीचा इशारा दिला आहे. 

युवकांचे डेस्टिनेशन असणारी फुटाळा चौपाटी एरवी हाउसफुल्ल असते. थर्टीफर्स्टचा दिवस असूनही आज मात्र फारशी गर्दी दिसून आली नाही. रात्री आठपर्यंत तलाव परिसर ओसाड पडल्याचे दिसून आले. थंडीमुळे तरुणाई फुटाळ्यापासून लांबच राहिल्याची प्रतिक्रिया येथे येणाऱ्यांनी व्यक्त केली. अपेक्षित गर्दी नसल्याने विक्रेत्यांचा हिरमोड झाला. न्यू इअर सेलिब्रेशनसाठी शहराबाहेरील धाब्यांनी विशेष तयारी केली होती. परंतु, थंडीमुळे खवय्ये आणि रसिकही धाब्यांपासून लांबच राहिल्याचे चित्र होते. त्या तुलनेत अधिक खर्च करून बंद हॉटेलमध्ये "एन्जॉय' करण्यावर नागपूरकरांनी भर दिला. 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: 1 व्‍यक्ती, बाहेरील
दुपारी अचानक पावसाने दमदार हजेरी लावली आणि तापमानात कमालीची घट झाली.

डझनभर रेल्वे गाड्या विलंबाने

 उत्तर भारतात थंडीने कहर केला आहे. यामुळे अनेक भागांत धुक्‍याची चादर निर्माण झाली आहे. याचा परिणाम रेल्वेगाड्यांच्या गतीवर झाला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या अनेक गाड्या नियोजित वेळेपेक्षा तासंतास उशिरा धावत आहेत. नागपूरमार्गे धावणाऱ्या डझनभराहून अधिक रेल्वेगाड्या विलंबाने धावत आहेत. गोरखपूर - त्रिवेंद्रम राप्तीसागर एक्‍स्प्रेस सर्वाधिक 10 तास उशिरा धावत होती. त्यापाठोपाठ तामिलनाडू एक्‍सप्रेस ही गाडी 7 तास विलंबाने धावत होती. हजरत निजामुद्दीन बेंगरूळु राजधानी एक्‍सप्रेस 6 तास, चेन्नई-दिल्ली दुरंतो एक्‍सप्रेस 6 तास, दक्षिण सुपरफास्ट एक्‍सप्रेस 5.30 तास विलंबाने धावत होती.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about Cold and rainy season