एम्फीथिएटर'चा प्रस्ताव थंडबस्त्यात 

file photo
file photo

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 23 एकर जमिनीवर भव्य "एम्फीथिएटर' तयार करण्याचा प्रस्ताव वर्षभरापासून थंडबस्त्यात आहे. विशेष म्हणजे यासाठी विद्यापीठाने अमरावती मार्गावरील 20 एकर जमिनही दिली होती. मात्र, अद्याप प्रशासकीय स्तरावर थिएटर तयार करण्याचे काम सुरू झालेले नाही.
 
शहरातील कस्तुरचंद पार्क, रेशीमबाग आणि मानकापूर क्रीडा संकुल येथे होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांवर न्यायालयाने प्रतिबंध लावल्याने शहरातील सांस्कृतिक वारसा जपण्याच्या दृष्टीने दोन ते तीन हजार आसनक्षमतेचे एम्फीथिएटर नागपुरात व्हावे यासाठी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात घोषणा केली होती.

 हे भव्य "एम्फीथिएटर' विद्यापीठाच्या जागेवर व्हावे यासाठी विद्यापीठ केवळ जमीन देत, त्यावरील सभागृहाचा खर्च सरकारला उचलायचा होता. तसा करारही राज्य सरकार आणि विद्यापीठ यांच्यामध्ये झाला होता. त्यातूनच विद्यापीठाने 23 एकर जागा देण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यापैकी 20 एकर जागा राज्य सरकारला देण्यात आली. 

1500 आसन क्षमतेचे असलेल्या एम्फीथिएटरमध्ये खालच्या बाजूला दोन हजार आसनक्षमतेचे भव्य सभागृहही तयार करण्याचा प्रस्ताव त्यात होता. यासाठी सरकारकडून वीस कोटींचा निधी देण्याचे ठरले. मात्र, नेमके घोडे अडले कुठे हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे एम्फीथिएटर आणि सभागृह असे दोन्ही प्रस्ताव थंडबस्त्यात गेल्याचे दिसून येते. 
 

प्रकल्पाची किंमतही वाढली

 2015 पासून विद्यापीठ परिसरातील जागेवर भव्य सभागृह बांधण्याची घोषणा करण्यात आली होती. विद्यापीठाकडून त्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. मात्र, राज्य सरकारच्या उदासीन धोरणामुळे विद्यापीठात अद्याप सभागृहाच्या बांधकामास सुरुवात झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे आता वीस कोटींच्या सभागृहाचा बांधकामाचा खर्च जवळपास दुप्पट झाल्याचे दिसून येते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com