सायबर गुन्हेगाराच्या नायजेरियन टोळीला अटक; दिल्लीतून घेतले ताब्यात; 18 लाखांची रक्कम जप्त

Nigerian Cyber attack gang arrested by nagpur police in delhi
Nigerian Cyber attack gang arrested by nagpur police in delhi

नागपूर ः विदेशात नोकरी लावून देण्याचे तसेच महागडे गिफ्ट देण्याचे आमिष दाखवून लाखोंनी गंडा घालणारी नायजेरीयन टोळीला नागपूर पोलिसांनी अटक केली. या टोळीकडून 18 लाख रूपये जप्त केले असून त्यांनी अडीच ते तीन कोटी रूपये ट्रांजेक्‍शन केल्याची माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त सुनील फुलारी यांनी पत्रपरिषदेत दिली.

गिट्टीखदान परिसरात राहणाऱ्या रिना या भारतीय सैन्य दलात वैद्यकिय विभागात अधिकारी होत्या. त्यांना गेल्या जुलै महिण्यात सायबर गुन्हेगारांनी फोन करून लंडनमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून 41 लाखांना गंडा घातला होता. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याच आरोपींना राज्यात अनेकांना गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. 

या प्रकरणाच्या तपासात 11 ऑक्‍टोबरला सायबर क्राईमच्या पोलिस दिल्लीला रवाना झाले होते. त्यांनी दिल्ली पोलिसांच्या मदतीने द्वारका मोर परिसरात छापा घातला. या छाप्यात मिशेल कॉट्‌स कोलार्ड (23, चंदरविहार, दिल्ली), ईदू डॉलर उकेके (32), इमू सडे अझुडाईके (32), केल्वीन नेके (29) या नायजेरियन आरोपींना तर सुजीत दिलीप तिवारी (25, व्दारका मोर, दिल्ली) या भारतीय आरोपीला अटक केली. दिल्लीत ट्रान्झीस्ट वॉरंट घेऊन आरोपींना नागपुरात आणण्यात आले. आरोपींचे बनावट नावाने उघडलेले 8 बॅंक खाती पोलिसांनी गोठवल्या आहेत. पोलिसांच्या हाती जवळपास 18 लाखांची रक्कम लागली आहे.

असे होतात भारतात दाखल

कपडे विकण्याच्या बहाण्याने नायजेरीयन आरोपी भारतात येतात. त्यांच्या चार ते पाच वस्त्या नायजेरीयन लोकांनी वसविल्या आहेत. टेक्‍निकल आणि सायबरमध्ये एक्‍स्पर्ट असलेले काही आरोपी घरातूनच लोकांना गंडे घालण्याचे काम करतात. अनेक उच्चशिक्षितांना भूरळ घालतात. त्यांना विदेशात नोकरीचे आमिष दाखवतात. तसेच महागडे गिफ्ट पाठविण्याचे आमिष दाखवतात. त्यांच्या जाळ्यात अडकलेल्यांकडून ते लाखो रूपये उकळतात.

दिल्लीतील आरोपींचा घेतात मदत

नायजेरियन टोळीला भारतात बॅंक अकाउंट काढण्यासाठी दिल्लीतील आरोपी युवकांची मदत घेतात. त्यांना 15 ते 20 टक्के कमिशन देऊन त्यांच्या कागदपत्रांवर 8-10 बॅंकेत खाते काढतात. तसेच ते भारतीय महिलांशी लग्न करतात. त्यांना विदेशात नेण्याचे आमिष दाखवतात. कोट्यवधीचा गंडा घातल्यानंतर भारतातून पळून जातात.

आरोपी वाढण्याची शक्‍यता

नायजेरियन टोळीने महाराष्ट्रासह अन्य राज्यातीन शेकडोंना लाखोंनी गंडा घातला आहे. त्यांच्या टोळीतील अन्य सदस्य दिल्लीसह अन्य राज्यात असण्याची शक्‍यता आहे. कोट्‌यवधी रूपये या टोळीने हडपल्याची शक्‍यता आहे. आरोपींना 19 ऑक्‍टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश आहेत. आरोपींचा पासपोर्ट, व्हीसा याबाबत माहिती घेण्यात येत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com