कोंढाळीतील चिमुकली नागपुरात आली अन्‌ झाली बाधित; आता आली ही बातमी...

मंगळवार, 9 जून 2020

पावसाळा तोंडावर आला असल्याने कोरोना या संसर्गजन्य रोगाचा उद्रेक, फैलाव होण्याची शक्‍यता नाकारता येत नसल्याने या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कामठी शहराचे सतत सहा महिने नगर परिषदेच्या पथकाद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

कोंढाळी (जि. नागपूर) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा कोंढाळीला लागूनच असलेल्या दुधाळा येथील नऊ वर्षीय बालिकेने कोरोनावर मात केली. त्यामुळे बालिकेसह आईवडील व भाऊ सर्वांना दुधाळा निवासी पोहोचविण्यात आले, अशी माहिती कोंढाळीचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनील येरमल यांनी दिली.

काटोल तालुक्‍यातील पहिला रुग्ण कोंढाळी नजीकच्या दुधाळा येथे आढळला होता. नागपूरच्या शांतीनगर येथून कुटुंबासह परतलेल्या बालिकेला सुमारे 20 दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांना नागपूर येथील आमदार निवासातील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान बालिकेसोबत क्‍वारंटाइन करण्यात आलेल्या संपर्कातील 32 लोकांची चाचणी "निगेटिव्ह' आली होती.

बालिकेचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर 14 दिवस उपचार केल्यांनतर नऊ वर्षीय बालिकेचा दुसरा चाचणी अहवाल "निगेटिव्ह' आला. या चाचणीनंतर ती बालिका कोरोनामुक्त झाल्याचा अहवाल मिळाला असल्याने बालिकेसह तिच्या कुटुंबीयांना रविवारी (ता. 7) सायंकाळी आरोग्य विभागाच्या वाहनाने दुधाळा येथे पोहोचविले.

जाणून घ्या - बाधितांचा आकडा पोहोचला सव्वासातशेवर तर मृतांची संख्या पंधरा

याप्रसंगी येथील आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी दातीर तसेच त्यांचे सहकारी, सरपंच नलिनी सरोदे, उपसरपंच प्रेमराज परतेती, ग्रा. पं. सदस्य प्रकाश गुजर कोविडचे संक्रमण रोखण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत बालिकेवर पुष्पवृष्टी केली. टाळ्यात गजरात गावकऱ्यांनी तिचे स्वागत केले. कोविडची नियमावली पालन करण्याचा सल्ला तिला देण्यात आला.

परिसर सध्या कोरोनामुक्त असल्याबद्दल कोंढाळी व दुधाळावासींनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, डॉ. शशांक व्यवहारे, डॉ. सुनील येरमल, डॉ. बिलाल पठाण, पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्‍याम गव्हाणे, बीडीओ सुनील साने तसेच राजस्व, ग्रा. पं. प्रशासनाच्या आरोग्य विभागाचे आभार व्यक्त केले.

बघा : नागपूरकरांनो, दुकाने उघडली म्हणून कसेही वागणार का?

कामठीत घरोघरी जाऊन सर्वेक्षण
कोरोना विषाणूचा संसर्ग शहरातून हद्दपार करण्याच्या दृष्टीने शहरात मंगळवारपासून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी नगर परिषद कर्मचारी, अंगणवाडी सेविका व मदतनीस व आरोग्य विभागाच्या कर्मचारी, नगरसेवकांना तहसील कार्यालयात सोमवारी प्रशिक्षण देण्यात आले. पावसाळा तोंडावर आला असल्याने कोरोना या संसर्गजन्य रोगाचा उद्रेक, फैलाव होण्याची शक्‍यता नाकारता येत नसल्याने या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कामठी शहराचे सतत सहा महिने नगर परिषदेच्या पथकाद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. हे पथक तीन दिवसांतून किमान एकदा शहरातील प्रत्येक घरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत.