मनपा थकबाकीदारांना आता तुरुंगाची वारी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

गेल्या अनेक वर्षांपासूनचा पाचशे कोटींचा मालमत्ता कर नागरिकांकडे थकीत आहेत. महापालिकेकडून या थकबाकीदारांना वारंवार नोटीस देण्यात आले. महापालिकेने सर्व प्रयत्न केल्यानंतरही थकबाकीदारांकडून कुठलाही प्रतिसाद नाही. त्यामुळे कडक शिस्तीचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता कठोर पाऊल उचलले आहे.

नागपूर : मालमत्ता कर महापालिकेच्या आर्थिक स्थितीचा मुख्य कणा असून नागरिकांकडे जवळपास पाचशे कोटींचा कर थकबाकी आहे. अनेक वर्षांपासून नोटीस देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या थकबाकीदारांना तुरुंगात पाठविण्याचे कठोर पाऊल आयुक्तांनी उचलले आहे. थकीत कर त्वरीत भरा, अन्यथा तुरुंगात जा, असा इशारा देत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कर विभागाच्या आयुक्तांना कार्यवाहीचे निर्देश दिले.

गेल्या अनेक वर्षांपासूनचा पाचशे कोटींचा मालमत्ता कर नागरिकांकडे थकीत आहेत. महापालिकेकडून या थकबाकीदारांना वारंवार नोटीस देण्यात आले. महापालिकेने सर्व प्रयत्न केल्यानंतरही थकबाकीदारांकडून कुठलाही प्रतिसाद नाही. त्यामुळे कडक शिस्तीचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता कठोर पाऊल उचलले आहे. थकीत कर न भरणाऱ्यांना नोटीस देउन त्यांची संपत्ती जप्त करण्यात यावी. यानंतरही संबंधित संपत्ती मालकाकडून प्रतिसाद न मिळाल्यास यासंदर्भात फौजदारी गुन्हा दाखल करून तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्याचे निर्देश त्यांनी कर विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

सविस्तर वाचा - मेट्रोत प्रवासी संख्येचा आलेख उंचावला, एका दिवसात 17 हजार नागरिकांचा प्रवास

 

आर्थिक वर्षातील शेवटचे दोन महिने शिल्लक असून अधिकाऱ्यांवर शंभर टक्के वसुलीचा दबाव आहे. त्यामुळे उद्यापासून मालमत्ता कर विभागाकडून कार्यवाही केली जाण्याची शक्‍यता आहे. थकीत करासंदर्भात महापालिकेने आतापर्यंत 9745 लोकांना वारंट बजावले आहेत. यातून 2595 मालमत्ता जप्त करण्यात आले. महापालिकेने आतापर्यंत 495 मालमत्तांचे लिलाव करण्यात आले. यातील 12 मालमत्ता खरेदीदारांना मालमत्ता हस्तांतरीत करण्यात आली तर 138 मालमत्ता महापालिकेने स्वतःच्या नावावर केल्या आहेत.

कारवाईतून कुणीही सुटणार नाही
थकीत संपत्ती कर वसुलीच्या या कठोर कारवाईमधून कोणतीही व्यक्ती सुटू शकणार नाही. कर वसुलीची कठोर कारवाई टाळण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वेळोवेळी संपत्ती कर भरणा करावा, असे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NMC send their defaulters to jail