भोंगळ कारभाराचा नमुना, प्रशिक्षण केंद्रात स्वच्छतागृहच नाही

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

इकडे-तिकडे भरकटलेले असलेले प्रशिक्षण केंद्र हे एकाच ठिकाणी येणार होते. परंतू जेव्हा प्रशिक्षण केंद्राचा ताबा घेण्याची वेळ आली तेव्हा इमारतीत स्वच्छता गृहच नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे प्रशिक्षण केंद्राकडे सर्व समन्वयकांनी पाठ दाखविली. परिणामी 18 महिन्यांपासून केंद्राला कुलूप लागले आहे.

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला विद्यापीठ अनुदान आयोगांच्या निधीतून तयार करण्यात येणाऱ्या मध्यवर्ती प्रशिक्षण केंद्रात स्वच्छता गृहाची व्यवस्थाच करण्यात आलेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभाराचा आणखी एक नमुना यामुळे समोर आला आहे. इमारतीच्या इतर भागाचे बांधकाम संथगतीने सुरु आहे हे विशेष.

सविस्तर वाचा - मेट्रोत प्रवासी संख्येचा आलेख उंचावला, एका दिवसात 17 हजार नागरिकांचा प्रवास

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात यूजीच्या निधीतून यूपीएससी, एमपीएससी, बॅंकिग परीक्षेसाठी तर आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून यूपीएससीचे नागरी सेवा तसेच तसेच नेट सेट परीक्षांच्या तयारीकरीता विद्यापीठात प्रशिक्षण चालविले जाते. मात्र प्रत्येक संस्थेचे वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण होत असते. याशिवाय या केंद्राचे स्वत:चे ग्रंथालय, अभ्यासिका, वर्गखोल्या नसल्याने येथे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोर जावे लागत होते. त्यामुळे सर्व प्रशिक्षण एकाच ठिकाणी असावे याकरिता अमरावती मार्गावरील विद्यापीठाच्या महात्मा ज्योतीबा फुले शैक्षणिक परिसरात म्हणजे सध्याच्या कॉमर्स विभागाजवळ आणि गृहविज्ञान विभागाच्या मागे एकाच ठिकाणी हे मध्यवर्ती प्रशिक्षण केंद्र तयार करण्यात आले आहे. आतापर्यंत 90 लाखांच्या निधीतून या मध्यवर्ती प्रशिक्षण केंद्राची इमारत तयार करण्यात आली आहे. याचे रितसर उद्घाटन 26 जून 2018 मध्ये कुलगुरु डॉ. सिद्धार्थ विनायक काणे यांच्या हस्ते तत्कालीन प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद येवले आणि कुलसचिव डॉ. पुरणचंद्र मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यामुळे इतर इकडे-तिकडे भरकटलेले असलेले प्रशिक्षण केंद्र हे एकाच ठिकाणी येणार होते. परंतू जेव्हा प्रशिक्षण केंद्राचा ताबा घेण्याची वेळ आली तेव्हा इमारतीत स्वच्छता गृहच नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे प्रशिक्षण केंद्राकडे सर्व समन्वयकांनी पाठ दाखविली. परिणामी 18 महिन्यांपासून केंद्राला कुलूप लागले आहे.

विदर्भातील विद्यार्थ्यांना होणार लाभ
सध्या या केंद्राचे अधिक बळकटीकरण करण्यासाठी युजीसीकडून दीड कोटीचा निधी देण्यात आला आहे. ह निधी एक वर्षाअगोदर शासनाच्या बांधकाम विभागाकडे देण्यात आला होता. परंतु बांधकाम विभागाने दुर्लक्ष करीत एक वर्षानंतर याचे काम सुरु केले. सध्या इथे संचालक खोली, अभ्यासिका व सभागृह तयार आहे. एका वर्षात पुढचे बांधकाम करुन ही इमारत बळकटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी प्रशिक्षण मिळणार असल्याने विदर्भातील विद्यार्थ्यांना नागरी सेवेत जाण्यासाठी चांगले प्रशिक्षण केंद्र यातून तयार होणार आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No toilet in training center of Nagpur University