नागपुरात विवाहासाठी आता फक्त 27 हजारांचे पॅकेज...खर्च कमी, सुरक्षेची हमी

शुक्रवार, 5 जून 2020

भारतात विवाह धडाक्‍यात लावण्याची परंपरा आहे. मात्र, कोरोनाच्या आगमनानंतर अनावश्‍यक खर्चाला कात्री लागल्यामुळे लॉनमालकांनीही आता साधे आणि स्वस्त पॅकेज देण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूरमधील एका लॉन, सभागृह मालकाने केवळ 26 हजार 999 रुपयांत संपूर्ण विवाह सोहळा आयोजित करण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे.

नागपूर : वधू-वराची स्वतंत्र व्यवस्था, मोजके पाहुणे, रुचकर जेवण आणि कोरोना प्रतिबंधात्मक सुरक्षेचे उपाय या चतुःसूत्रीवर भर देत आखीव रेखीव विवाह सोहळा कमी खर्चात आयोजित करण्याचा नवीन व्यावसायिक दृष्टिकोन सभागृह, लॉन मालकांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर स्वीकारला आहे. कोरोनाच्या आधी लाखांच्या घरात असलेला विवाहांवरील खर्च चक्क काही हजारात आला आहे.

भारतात विवाह धडाक्‍यात लावण्याची परंपरा आहे. अलीकडच्या काळात हे सोहळे डेस्टिनेशन मॅरेज, मंगल कार्यालये, सभागृह आणि लॉन तसेच हॉटेलमध्ये साजरा करण्याचा धडाका सुरू झाला होता. लाखोंच्या खर्चामुळे असे सोहळे सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेरचे होते. मात्र, कोरोनाच्या आगमनानंतर अनावश्‍यक खर्चाला कात्री लागल्यामुळे लॉनमालकांनीही आता साधे आणि स्वस्त पॅकेज देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या क्षेत्रातील थांबलेले अर्थचक्र काही प्रमाणावर का होईना पुन्हा गतिमान होईल, अशी मालकांना आशा आहे.

नागपूर शहरात दीड हजारांवर मंगल कार्यालये आहेत. तसेच छोटी-मोठी सभागृहे आणि लॉनदेखील पाचशेवर आहेत. ही सर्व ठिकाणे विवाहांसाठी वर्षभर "बुक' असतात. कार्यालयाचे कमीतकमी भाडे सरासरी 40 हजार रुपये असते. अधिक सुविधा असणाऱ्या कार्यालयांचे भाडे लाखांत असते. लॉन आणि सभागृहांचीही स्थिती जवळपास सारखीच आहे. भाड्याव्यतिरिक्त विद्युत शुल्क, सफाई (स्वच्छता) शुल्क, खुर्च्यांचे भाडे, कूलर, सजावटीचे शुल्क ऍडव्हांस म्हणून घेतले जाते.

कोरोनामुळे लॉकडाउन लागू होताच मंगल कार्यालये आणि लॉन मालकांचा अक्षरशः कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय बुडाला. अनेक विवाह रद्द झाल्यामुळे घेतलेला ऍडव्हान्स परत करण्याची वेळ त्यांच्यावर आली. लॉकडाउनच्या आधीच बहुतेक कार्यालयांचे बुकिंग झाले होते. मात्र, मागील दोन महिन्यांत अनेकांनी घरच्या घरीच विवाह सोहळा उरकला. जून महिन्यातील विवाहांसाठी सभागृह आणि लॉनचालकांनी कोरोना बचावाच्या सुरक्षेसह इतर व्यवस्थाही कमी खर्चात उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवत व्यवसाय वाचविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

संपूर्ण विवाह 26 हजार 999 रुपयांत

नागपूरमधील एका लॉन, सभागृह मालकाने केवळ 26 हजार 999 रुपयांत संपूर्ण विवाह सोहळा आयोजित करण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर संदेश पसरवला आहे. यामुळे दिवसभरात सुमारे 30 बुकिंग मिळाल्याचे त्यांनी सांगितले. पारडी परिसरात असलेल्या या लॉन व सभागृहात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून विवाह होणार आहेत.

काय आहे "पॅकेज'मध्ये?

  • 50 लोकांसाठी मास्क, सॅनिटायझरची व्यवस्था.
  • थर्मल स्कॅनरने तपासणी.
  • सोबत डायनिंग हॉल, स्टेज डेकोरेशन, रूम व्यवस्था, जेवणाची व्यवस्था.
  • जेवणात ः चपाती, जिरा राईस, पनीर मसाला, दालफ्राय, गुलाबजाम, दही कढा, दही वडा, सॅलड, पापड, लोणचे, वांगे-बटाटे मिक्‍स असा रुचकर मेन्यू.

जाणून घ्या : सलून व्यावसायिक करणार माझे दुकान, माझी मागणी आंदोलन

सामाजिक भान जपत आहे
कोरोनामुळे अनेकांचे विवाह लांबणीवर पडले आहेत. लोकांना सुरक्षेची हमी वाटत नसल्याने, जीव धोक्‍यात टाकून विवाह कसा करावा हा प्रश्‍न आहे. दरवर्षी याच सिझनमध्ये लाखोंची उलाढाल होते. मात्र, बदललेल्या स्थितीत सामाजिक भान जपावे, या विचारातून "ना नफा ना तोटा' या तत्त्वावर केवळ 26 हजार 999 रुपयांत लग्न सोहळा आयोजित करून देत आहोत. आमच्या आवाहनाला समाजातून चांगला प्रतिसाद मिळत असून, दिवसभरात 30 बुकिंग झाले आहे.
- गणेश हुमणे, सभागृह व लॉन मालक, नागपूर.