radio
radio

मन का रेडिओ बजने दे जरा...



नागपूर : विदर्भातील नागपूर, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम आणि गोंदिया या अकराही जिल्ह्यांमधील दोन कोटी 30 लाखांच्या वर लोकांची सकाळ आकाशवाणीच्या 5 वाजून 48 मिनिटांनी वाजणाऱ्या संकेतधुनने होते. 1 लाख 96 हजार स्क्‍वेअर किलोमीटरचा प्रदेश व्यापलेल्या नागपूर आकाशवाणीने काळाची पावले आणि श्रोत्यांची नाडी ओळखत नव्या काळाशी सुसंगत हॅलो डॉक्‍टर, सायबर क्राईम, आवो इन्वेस्ट करे, आओ वास्तु सॅंवारे असे आणि अनेक लाईव्ह फोन इन कार्यक्रम सुरू केले आणि अनेक खाजगी एफ एम वाहिन्यांच्या भडिमारात 72 वर्षानंतरही अस्तित्व टिकवून ठेवले असतानाच कृषीवाणी, माझं घर माझं वावर, ओटीवर, अशा कार्यक्रमांचे प्रसारण करीत ग्रामीण लोकजीवनाशीही नाळ टिकवून ठेवली आहे.

महिलांसाठी वनिताविश्‍व, युवकांसाठी युववाणी, बालकांसाठी बालविहार, शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम, आरोग्यम धनसंपदा हा आरोग्यविषयक कार्यक्रम, विज्ञानजगत, कामगार वर्गासाठी कामगारविश्‍व, ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम, उर्दू भाषिकांसाठी आबशार असे विविध समुदायांसाठीचे कार्यक्रम आकाशवाणीवरून प्रसारित होत असतात. मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू आणि संस्कृत अशा जवळपास पाच भाषांमधून आकाशवाणीचे प्रसारण होत असते. बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्‍य असलेली आकाशवाणी लोकाभिमुख आहे. शास्त्रीय संगीतापासून लोकगीतांपर्यंत अनेक नवोदित कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य आकाशवाणी गेल्या 72 वर्षांपासून करते आहे. अ श्रेणी किंवा ब श्रेणी प्राप्त रेडिओ आर्टिस्ट हा आजही अभिमानाने सांगण्याचा विषय आहे. 2016 च्या सर्वेक्षणानुसार विदर्भातील 30.6 टक्‍के नागरिक आकाशवाणीचे श्रोते आहेत. बातम्या हा आकाशवाणीच्या प्रसारणाचा प्राण आहे. सकाळी 6 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारीत होणाऱ्या हिंदी बातम्या, 7 वाजताच्या हिंदी बातम्या, 7 वाजून 10 मिनिटांनी प्रसारीत होणाऱ्या प्रादेशिक मराठी बातम्या, 8 वाजताचा समाचार प्रभात, 8 वाजून 15 मिनिटांच्या न्यूज इन इंग्लिश, 8 वाजून 30 मिनिटांच्या मराठी बातम्यांचा समावेश 2016 च्या सर्वेक्षणानुसार आकाशवाणी नागपूरच्या टॉप टेन कार्यक्रमात झाला आहे. याशिवाय सकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी प्रसारीत होणारे सुगम संगीत, दुपारी अडीच वाजताचे हिंदी चित्रपट संगीत आणि दररोज प्रसारीत होणारा आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमांनीही पहिल्या दहा लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये स्थान पटकावले आहे.

तज्ज्ञ मंडळींना आकाशवाणीच्या स्टुडिओत बोलवून त्यांचे विचार श्रोत्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या आकाशवाणीचा अधिकारी आणि कर्मचारी गावोगावी प्रत्यक्ष जाऊनही कार्यक्रम ध्वनिमुद्रीत करीत असतात. आकाशवाणी वार्षिक पुरस्कार या अत्यंत सन्मानाच्या समजल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी अनेक अर्ज येत असतात. नागपुर आकाशवाणीने आजपावेतो परीवार कल्याण, कृषी कार्यक्रम आणि रेडिओ माहितीपटांसाठी अनेकवेळा हे पुरस्कार प्राप्त केले आहेत. आकाशवाणीवरून प्रसारीत होणारी भाषा आजही प्रमाण भाषा मानली जाते आणि आकाशवाणीवरून सांगितली जाणारी वेळ ऐकून आजही लोक आपल्या घड्याळी जुळवतात.

 

डॉ. कुळकर्णींकडे जुन्या 26 रेडिओंचे संकलन

सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सारेच मोबाईलवर तासन्‌तास रमलेले दिसतात. परंतु, रेडिओ ऐकण्याची मजा काही औरच आहे, हे ऐकल्याशिवाय कळणार नाही. अशाच एका हौशीने विविध प्रकारच्या तब्बल 26 रेडिओंचे संकलन केले आहे. डॉ. अजय कुळकर्णी यांच्याकडे व्हॉल्व्हच्या रेडिओपासून ते तीन इंचाचा रेडिओ आहे. विशेष म्हणजे हे सर्व रेडिओ चालू स्थितीत आहेत. आगामी पिढीला रेडिओ होते असे सांगण्याची वेळ येऊ नये किंबहुना ऐककाळी मनोरंजन माहितीचे एकमेव साधन असलेल्या रेडिओची जपणूक व्हावी, एवढीच अपेक्षा कुळकर्णी यांची आहे.

डॉ. कुळकर्णी यांच्याकडे विविध प्रकारचे आणि विविध कंपन्यांचे 27 रेडिओ आहेत. डेक कम रेडिओ, पॉकेट रेडिओ, तीन सेलचा, दोन सेलचा असे रेडिओ त्यात आहेत. गेल्या 8 वर्षांपासूनचे त्यांचे हे संकलन आहे. मल्हार, फिलिप्स, तोशिबा, सोनी, शार्प, पॅनासॉनिक या कंपन्यांचे नवे जुने रेडिओ त्यांच्याकडे आहेत. रेडिओच्या आगळ्यावेगळ्या छंदाबाबत डॉ. कुळकर्णी सांगतात की, बुलढाणा जिल्ह्यातील जानेफळ गावात वडील स्व. दिनकरराव कुळकर्णी यांनी गावात पहिला रेडिओ आणला. तेव्हा रेडिओला सोनेरी दिवस होते. गावातील शे-दीडशे माणसं रोज रेडिओ ऐकायला यायची. तेव्हा बाबांच्या कानाला सतत रेडिओ असायचा. बालपणापासून आपण रेडिओचे संकलन करावे अशी इच्छा होती. मग मित्र आणि नातेवाईकाकडून बंद रेडिओ आणून ते दुरुस्त करून घेतले. काही जुने रेडिओ खरेदी केले. पूर्वी रेडिओवरील कार्यक्रमांचे लोकांवर गारुड होते. बिनाका गीतमालासारखे कार्यक्रम असो की बीबीसी लंडन, क्रिकेट सामन्याचे मराठीतून समालोचन असो. घरोघरी रेडिओ ज्ञानप्रसाराचे आणि मनोरंजनाच साधन होते. रेडिओला पूर्वीचे वैभव प्राप्त व्हावे यासाठी कुळकर्णी यांची धडपड सुरू आहे.

लोकचळवळ व्हायला हवी
रेडिओ ऐकणं ही लोकचळवळ व्हायला हवी. आजच्या काळात दुभंगलेल्या माणुसकीला जोडण्याचे काम रेडिओ निश्‍चितच करू शकतो. पुढच्या पिढीला आनंद आणि मानसिक स्थैर्य देणारा रेडिओच असणार आहे. कारण हे आपलेपणाचं, जिव्हाळ्याचं माध्यम आहे. विविध प्रकारचे 100 रेडिओ संकलित करण्याचा मानस आहे.
- डॉ. अजय कुळकर्णी, प्राध्यापक सी. पी. ऍन्ड बेरार महाविद्यालय

जगभरात 44 हजार केंद्र
रेडिओ जगभरात अहर्निश सेवा देत आहे. आज जगभरात 44 हजार रेडिओ केंद्रे आहेत. भारतात आकाशवाणीची 420 केंद्रे आहेत. रेडिओवर माहिती, मनोरंजन, ज्ञान-विज्ञानासह साहित्य, कला, संगीतालाही प्राधान्य दिले जाते. कारण आकाशवाणीचे ब्रीदच "बहुजन हिताय बहुजन सुखाय.' आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com