दुषित पाण्यातून घोंघावतेय पुन्हा नवे संकट, नरखेड तालुक्‍यात एका वृद्‌धाचा मृत्यू...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 जून 2020


कोरोना व्हायरस, टोळधाड आणि आता नवीनच संकट पुन्हा घोंघावतेय. नरखेड तालुक्‍यात या संकटाने सुरूवात झाली आहे. बानोर पिठोरी या गावातील एक वृद्‌ध यामुळे बळी ठरला. अनेक जण हगवण, उल्टीच्या त्रासाने आजारी पडून रूग्णालयात 21 जण उपचार घेत आहेत. हे मानवनिर्मित संकट स्थानीक ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षितपणामुळे फोफावत आहे.

जलालखेडा/सावरगाव (जि.नागपूर) : नरखेड तालुक्‍यातील सावरगाव सर्कलमधील बानोर येथे अस्वच्छता व दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची साथ आली आहे. गॅस्ट्रोची लागण झाल्यामुळे पांडुरंग सहारे (86) यांचा मृत्यू झाला.21 रुग्णांवर सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील नाल्यासफाई व वापराच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण न केल्यामुळे ही साथ आली असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विद्यानंद गायकवाड यांनी सांगितले.

हेही वाचा: धीक्‍कार...धीक्‍कार, हसण्याखेळण्याच्या वयात विद्यार्थिनी झाली माता, कोण तो नराधम?

जलवाहिनीत "लिकेज'
सातशे छत्तीस लोकसंख्या असलेल्या बानोर (पिठोरी) या गावाला दोन विहिरींवरून पाणीपुरवठा होतो. विहिरीचे पाणी टाकीत जमा करून त्याचा गावकऱ्यांना पुरवठा करण्यात येतो. शुक्रवारी गावकऱ्यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला. शनिवारी काहींना हगवणीचा त्रास सुरू झाला. पीडित नागरिकांना सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता नेले असता, गॅस्ट्रोची लागण झाल्याचे निदान करण्यात आले. रुग्णांची परिस्थिती आता सुधारत असून, रुग्णावर प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक उपचार करीत आहे.

हे नक्‍कीच वाचा : जीवलग दोस्ताने केले दुश्‍मनापेक्षाही भयंकर कृत्य

स्वच्छता, पाणी निर्जंतुकीकरणाकडे दुर्लक्ष
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विद्यानंद गायकवाड व त्यांच्या पथकाने गावात पाहणी केली असता, पाणीपुरवठा करणाऱ्या दोन विहिरींपैकी तलावाजवळील पाणीपुरवठा विहिरीचे "क्‍लोरिनेशन' करण्यात आलेले नसल्याचे आढळले. विहिरीच्या पाण्याचे मोजमाप करण्यात आलेले नसल्यामुळे नियमित शास्त्रोक्त पद्धतीने "क्‍लोरिनेशन' होत नसावे, असा संशय आहे. विहिरीपासून पाण्याच्या टाकीपर्यंतची जलवाहिनी "लिकेज' आहे. ग्रामपंचायतीकडे क्‍लोरोस्कोप उपलब्ध नसल्यामुळे नियमित "ओटी टेस्ट' करण्यात येत नाही. ग्रामपंचायतीकडे तीन महिने पुरेल एवढे ब्लिचिंग पावडर उपलब्ध नाही. गावातील घरगुती नळजोडणी जमिनीलगत आहे. त्यामुळे पाणी दूषित होण्याची जास्त शक्‍यता आहे. रुग्ण निघालेल्या परिसरातील सांडपाण्याच्या नाल्या तुडुंब भरलेल्या आहेत. पाणीपुरवठा कर्मचाऱ्याचे पाणी निर्जंतुकीकरणाकडे दुर्लक्ष केल्याचे आढळले.

हेही वाचा : चला, उठा, गडयांनो, पुन्हा पेरूया हिरवी स्वप्ने !

सलील देशमुखांपुढे समस्यांचा पाढा वाचला
जिल्हा परिषद आरोग्य समितीचे सदस्य सलील देशमुख यांनी आज बानोर येथे भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी गावकऱ्यांनी ग्रामपंचायतच्या ढसाळ प्रशासनाचा पाढा वाचला. मृत पांडुरंग सहारे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांची त्यांनी भेट घेतली.

दुरूस्ती करण्यात आली
विहिरीमध्ये नियमित पाण्याचे "क्‍लोरोनेशन' करण्यात येते. एका जागी पाण्याचा व्हॉल्व सिमेंट कॉंक्रिट न केल्यामुळे "लिकेज' होता. आता ते "लिकेज' पूर्णतः काढण्यात आले आहे.
सचिन वरभे
ग्रामसेवक,
बानोर पिठोरी ग्रामपंचायत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An old man dies in Narkhed taluka due to new crisis.