शिक्षकांच्या बदलीत कोणत्याही प्रकारची फिक्सिंग नाही, सर्व निकष पाळले; सीईओंवर का आली असे म्हणण्याची वेळ

नीलेश डोये
Saturday, 17 October 2020

आंतर जिल्हा बदलीने आलेल्या ४० शिक्षकांना पदस्थापना देण्यात आली. तर सरळ सेवा भरतीने ४६ शिक्षकांना पदस्थापना देण्यात आली. पदस्थापना देताना महिला शिक्षकांना व सेवाज्येष्ठ शिक्षकांना प्राधान्य देण्यात आले. १० ते १२ शिक्षक अनुपस्थित असल्याने सर्वांसमक्ष त्यांच्याबाबतही निश्चिती करण्यात आली.

नागपूर : शिक्षकांच्या बदली प्रक्रियेवरून गेला आठवडाभर वादंग सुरू होता. शुक्रवारी हा वाद निवळला. १५५ शिक्षकांना पदस्थापना देण्यात आली. शिक्षक संघटनांनी समाधान व्यक्त केले तर प्रक्रिया शांततेत पार पडल्याने प्रशासनानेही सुटकेचा निःश्वास सोडला.

आंतर जिल्हा बदलीने आलेल्या ४० शिक्षकांना पदस्थापना देण्यात आली. तर सरळ सेवा भरतीने ४६ शिक्षकांना पदस्थापना देण्यात आली. पदस्थापना देताना महिला शिक्षकांना व सेवाज्येष्ठ शिक्षकांना प्राधान्य देण्यात आले. १० ते १२ शिक्षक अनुपस्थित असल्याने सर्वांसमक्ष त्यांच्याबाबतही निश्चिती करण्यात आली.

ठळक बातमी - पुन्हा पाऊस येणार, सर्तकतेचा इशारा; कर्मचाऱ्यांनो मुख्यालयीच रहा

बदलीच्या प्रक्रियेत सीईओ योगेश कुंभेजकर पूर्णवेळ उपस्थित होते. त्याचप्रमाणे अध्यक्ष रश्मी बर्वे, उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, अति. सीईओ डॉ. कमलकिशोर फुटाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर, सभापती भारती पाटील, शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारीही उपस्थित होते.

रिक्त जागा भरल्या

२०१८ मध्ये झालेल्या बदल्यांमध्ये विस्थापित व रॅण्डमच्या शिक्षकांना अवघड, अतिअवघड क्षेत्रात पाठविण्यात आले होते. तेव्हापासून या शिक्षकांचा बदल्यांसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू होता. सरळ सेवा भरतीच्या प्रक्रियेमध्ये यांनाही संधी देण्यात आले. या शिक्षकांनी जवळच्या शाळांना प्राधान्य दिले. त्यामुळे सरळ सेवा भरतीने आलेल्या शिक्षकांना अवघड, अतिअवघड क्षेत्रात पदस्थापना दिल्याने तेथील बॅकलॉग संपल्याचे सांगण्यात येथे. विशेष म्हणजे सीईओ कुंभेजकरही या भागातील पदभरतीसाठी आग्रही होते.

क्लिक करा - अख्ख्या गावात पेटली नाही एकही चूल, कारण गावातला प्रत्येकच झाला होता शोकाकूल

कोणत्याही प्रकारची फिक्सिंग नाही
बदलीची प्रक्रिया इनकॅमेरा पार पडली. प्रक्रिया शांततेत पार पडली असून सर्वांनीच समाधान व्यक्त केले. यात कोणत्याही प्रकारची फिक्सिंग झाले नाही. सर्व निकष पाळून प्रक्रिया पार पडली.
- योगेश कुंभेजकर, सीईओ

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One hundred and fifty five teachers' in-camera transfer