इनडोअर हॉल सुरू करा हो ! यांनी केले  मुख्यमंत्री, पंतप्रधानांना आर्जव 

नरेंद्र चोरे
Sunday, 13 September 2020

राज्य सरकारने सोशल डिस्टन्सिंगच्या अटींवर काही खेळांना परवानगी दिली. मात्र, इनडोअर खेळांना अजूनही हिरवा कंदील दाखविण्यात आला नाही. त्यामुळे नाइलाजाने याविरोधात प्रशिक्षकांना पुढाकार घ्यावा लागला आहे.

नागपूर : नागपूरसह राज्यातील सुमारे दोनशे बॅडमिंटन प्रशिक्षकांनी कोरोनामुळे बंद असलेले इनडोअर हॉल सुरू करण्याची विनंती मुख्यमंत्री व पंतप्रधानांना केली आहे. 

कोरोनामुळे सहा महिन्यांपासून बॅडमिंटनसह राज्यातील सर्व इनडोअर स्पोर्टस् ॲक्टिव्हिटीज पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे यावर उदरनिर्वाह असलेल्या शेकडो प्रशिक्षकांना जबर फटका बसला आहे. बहुतेकांची रोजीरोटी प्रशिक्षणावरच अवलंबून असून, हाताला कामे नसल्यामुळे त्यांच्यावर सध्या उपासमारीची वेळ आहे. राज्य सरकारने सोशल डिस्टन्सिंगच्या अटींवर काही खेळांना परवानगी दिली. मात्र, इनडोअर खेळांना अजूनही हिरवा कंदील दाखविण्यात आला नाही. त्यामुळे नाइलाजाने याविरोधात प्रशिक्षकांना पुढाकार घ्यावा लागला आहे. विविध जिल्ह्यांतील दोनशे प्रशिक्षकांची स्वाक्षरी असलेले पत्र सरकारला देण्यात आले आहे.

 

हेही वाचा : नागपूर जिल्ह्यात तयार होणार ऑलिंपिक दर्जाचे खेळाडू

 

या पत्रात प्रशिक्षकांनी लवकरात लवकर इनडोअर हॉल सुरू करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांसह संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे. नागपूर जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे सचिव मंगेश काशीकर यांनी शनिवारी महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष अरुण लखानी यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सोपविले. सरकारच्या नियमावलींचे काटेकोरपणे पालन करण्याचेही त्यांनी आश्वासन दिले. यासाठी प्रशिक्षक जयेंद्र ढोले व निखिल रोकडे यांनी प्रयत्न केले. 

शहरातील काही प्रशिक्षकांनी स्वाक्षऱ्यांचे पत्र मला दिल्यानंतर, मी लगेच राज्य संघटनेचे अध्यक्ष अरुण लखानी यांची वेळ घेऊन हे पत्र त्यांच्याकडे सोपविले. अध्यक्षांनी प्रशिक्षकांच्या भावना सरकारच्या कानावर घालण्याचे आश्वासन दिले. 
-मंगेश काशीकर, सचिव, नागपूर जिल्हा बॅडमिंटन संघटना

संपादन : मेघराज मेश्राम
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Open Indoor Halls ! Coaches Request to CM and PM