26 जूनपासून भरणार शिक्षकांचीच शाळा 

गुरुवार, 25 जून 2020

प्रत्येकी तीन तालुक्‍यानिहाय बैठका घेऊन त्यामध्ये 26 जूनपासून शिक्षकांना शाळांमध्ये येणे आवश्‍यक असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय 15 दिवस शाळा सॅनिटाईज करणे आणि इतर आवश्‍यक गोष्टींची व्यवस्था करण्यासही सांगण्यात आले.

नागपूर : शालेय शिक्षण विभागाने 26 जूनपासून शिक्षणाला सुरुवात करण्याचे आदेश दिले आहे. यामुळे 26 जूनला पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्वच शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. विशेष म्हणजे बुधवारी (ता.24) शिक्षणाधिकाऱ्यांसोबत जिल्ह्यातील तेराही तालुक्‍यांतील मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

राज्य सरकारच्या आदेशानंतर काढण्यात आलेल्या निर्णयात वर्गनिहाय शाळा सुरू करण्याबाबत सांगण्यात आले. यामुळे नेमके शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केव्हा जायचे? असा संभ्रम शिक्षकांमध्ये होता. याबाबत काही संघटनांनी निवेदन सादर करीत, हा संभ्रम दूर करण्याबाबतची मागणी केली होती. दरम्यान, आज झूम ऍपवर प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी तालुकानिहाय मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांच्या समावेश करण्यात आला होता. प्रत्येकी तीन तालुक्‍यानिहाय बैठका घेऊन त्यामध्ये 26 जूनपासून शिक्षकांना शाळांमध्ये येणे आवश्‍यक असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय 15 दिवस शाळा सॅनिटाईज करणे आणि इतर आवश्‍यक गोष्टींची व्यवस्था करण्यासही सांगण्यात आले.

हेही वाचा : घुग्घुस येथे त्यांनी केले चक्‍क वाहनावर अंत्यसंस्कार

\विशेष म्हणजे शाळांमधील विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप जवळपास पूर्ण झालेले आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भावामुळे केव्हा शाळा सुरू होतील. याबाबत अद्याप तारखा निश्‍चित नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत बोलवायचे की नाही, यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसह इतर विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याच्या अनुषंगानेच शाळांमध्ये आता शिक्षकांना बोलाविण्यात येणार आहे. आजच्या बैठकीनंतर उद्या पुन्हा उर्वरित तालुक्‍यांमधील शाळासंदर्भात बैठक घेण्यात येणार आहे. 
 

 

शाळा सुरू करायच्या किंवा नाही, याबाबत संभ्रम नसून 26 जूनपासून शिक्षकांना शाळेत जावेच लागणार आहे. परिस्थितीनुसार विद्यार्थ्यांना बोलावण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापन समिती घेईल. 
-चिंतामण वंजारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी.