कोरोनामुळे इतर आजारांचे प्रमाण कमी, मेडिकलच्या रुग्णसंख्येत ५० टक्के घट

केवल जीवनतारे
Monday, 2 November 2020

मेडिकलमध्ये नागपूर जिल्ह्यासह विदर्भ, मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश आदी राज्यांतून विविध आजारांचे रुग्ण उपचारासाठी येतात. गरिबांच्या आजारांसाठी मेडिकल वरदान आहे. १ जानेवारी ते ३१ ऑगस्ट या आठ महिन्यांच्या काळात मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागातील (ओपीडी) रुग्णसंख्या ५० टक्क्यांपेक्षा खाली आली.

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (ता.१) गेल्या आठ महिन्यांत कोरोनाने बाराशेपेक्षा अधिक मृत्यू झाले. १० हजारांपेक्षा जास्त रग्णांवर उपचार करण्यात आले. कोरोनाच्या रुग्णांवरील उपचारासाठी मेडिकलला २२ कोटी ६० लाखांचा निधी मिळाला. मार्च ते जुलै २०२० या काळात २२ कोटी मेडिकल प्रशासनाने खर्च केले. मात्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालया(मेडिकल )च्या बाह्यरुग्ण विभागात इतर आजारांवर उपचार घेण्यासाठी रुग्ण आले नाहीत. या रुग्णसंख्येत ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट झालेली पाहायला मिळतेय. 

हेही वाचा - चिमुकलीचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, 'माझे बाबा झिंगून घरात यावेत हे आदित्य...

मेडिकलमध्ये नागपूर जिल्ह्यासह विदर्भ, मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश आदी राज्यांतून विविध आजारांचे रुग्ण उपचारासाठी येतात. गरिबांच्या आजारांसाठी मेडिकल वरदान आहे. १ जानेवारी ते ३१ ऑगस्ट या आठ महिन्यांच्या काळात मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागातील (ओपीडी) रुग्णसंख्या ५० टक्क्यांपेक्षा खाली आली. २०१९ मध्ये ९ लाख ४१ हजार ३२६ रुग्णांची नोंद झाली, तर जानेवारी ते ऑगस्ट २०२० या काळात ३ लाख ७२ हजार १८० रुग्णांनी बाह्यरुग्ण विभागात उपचार घेतले. आंतर रुग्णसंख्येतही प्रचंड घट झाली. २०१९ मध्ये ८९ हजार ७८२ रुग्ण दाखल झाले, तर २०२० मध्ये आठ महिन्यांत ४२ हजार रुग्णांवर उपचार झाले, अशी माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहिती अधिकारातून मिळविली. 

आठ महिन्यांत ४८४ बालकांचा मृत्यू -
गेल्या वर्षभरात मेडिकलमध्ये कोरोनाच्या काळात ९६२ लहान मुलांचा मृत्यू झाला. जानेवारीत ते ऑगस्ट २०२० (आठ महिन्यांत) ४८४ बालके दगावली. विशेष असे की, कोरोना प्रादुर्भावामुळे मेडिकलमध्ये २५३६ कोरोनाबाधित उपचारार्थ दाखल झाले. यापैकी २०६९ जण बरे होऊन घरी गेले तर ४६७ जणांचा मृत्यू झाला. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात बाधितांवर उपचारासाठी २३२ वरिष्ठ डॉक्टर, ३६६ निवासी डॉक्टर, १०७ परिसेविका, ८३७ अधिपरिचारिका याशिवाय वर्ग १ व २ चे ३१ अधिकाऱ्यांनी सेवा दिली. सध्या हेच लोक सेवा देत आहेत. २० महिन्यांच्या काळात कॅन्सरच्या ३५८३ रुग्णांनी उपचार घेतले. यापैकी ४.१४ टक्के म्हणजेच १४८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती कोलारकर यांना देण्यात आली आहे. डेंगीचे १७० रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. स्वाईन फ्ल्यूचे वर्ष २०१९ मध्ये १७ रुग्ण दाखल झाले होते.

हेही वाचा - आता जबड्याची शस्त्रक्रिया होणार सोपी, डॉ. जैन यांनी लावला नवीन तंत्रज्ञानाचा शोध

वर्षनिहाय रुग्णांची आकडेवारी -

  • २०१९ मध्ये वर्षभरात ९ लाख ४१ हजार ३२६ रुग्णांवर ओपीडीत उपचार 
  • २०२० मध्ये आठ महिन्यांत ३ लाख ७२ हजार १८० रुग्णांची नोंद 
  • २०१९ मध्ये वर्षभरात ५ हजार ९९५ मृत्यू 
  • २०२० मध्ये आठ महिन्यांत ३ हजार २८३ मृत्यू 
  • २०१९ मध्ये वर्षभरात ९६२ बालके दगावली 
  • २०२० मध्ये आठ महिन्यांत ४८२ बालकांचा मृत्यू 
  • २०१९ मध्ये वर्षभरात ८९ हजार ५९२ रुग्ण भरती झाले 
  • २०२० मध्ये आठ महिन्यांत ४२ हजार ७८२ रुग्ण भरती झाले 
     

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: other disease patients decreases due to corona in nagpur