आठ वर्षांत गणेश विसर्जनानंतर पहिल्यांदाच चारही तलाव शुद्ध, ऑक्सिजनचा स्तरही पूर्वीप्रमाणेच

राजेश प्रायकर
Sunday, 4 October 2020

गेल्या आठ वर्षांपासून पर्यावरणप्रेमी संस्था ग्रीन व्हिजिल फाउंडेशन विसर्जनापूर्वी तसेच विसर्जनानंतर शहरातील तलावांतील ऑक्सिजन व इतर तत्त्वांची तपासणी करीत आहे. यंदाही विसर्जनापूर्वी शहरातील सोनेगाव, फुटाळा, गांधीसागर, सक्करदरा तलावाची चाचणी करण्यात आली.

नागपूर : दरवर्षी विसर्जनानंतर शहरातील फुटाळा, गांधीसागर, सोनेगाव तलावातील पाणी दूषित होण्याची परंपरा यंदा खंडित झाल्याचे ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनने केलेल्या चाचणीतून स्पष्ट झाले. यंदा कोरोनामुळे अनेकांनी घरीच विसर्जनाला पसंती दिली, तर काहींनी कृत्रिम टँकचा वापर केला. त्यामुळे यंदा तलावातील ऑक्सिजनचा स्तर पूर्वीप्रमाणेच कायम असल्याचे दिसून आले. 

गेल्या आठ वर्षांपासून पर्यावरणप्रेमी संस्था ग्रीन व्हिजिल फाउंडेशन विसर्जनापूर्वी तसेच विसर्जनानंतर शहरातील तलावांतील ऑक्सिजन व इतर तत्त्वांची तपासणी करीत आहे. यंदाही विसर्जनापूर्वी शहरातील सोनेगाव, फुटाळा, गांधीसागर, सक्करदरा तलावाची चाचणी करण्यात आली. विसर्जनापूर्वी तलावातील ऑक्सिजनचा स्तर गणपती विसर्जनानंतरही कायम असल्याचे नुकत्याच  केलेल्या चाचणीतून अधोरेखित झाले. गेल्या आठ वर्षांत प्रथमच असे घडल्याचे टीम लिडर सुरभी जैस्वाल यांनी सांगितले. फुटाळा तलावात विसर्जनापूर्वीप्रमाणेच ४.५ एमजी ऑक्सिजन प्रति लीटर आढळून आला. गांधीसागर तलावातही विसर्जनापूर्वी ऑक्सिजन ४.५ एमजी प्रती लीटर होता. आजही ऑक्सिजनचा हा स्तर कायम आहे. सोनेगाव तलावातील ऑक्सिजनचा स्तरही पूर्वीप्रमाणेच कायम असल्याचे चाचणीत आढळून आले. 

हेही वाचा - संतापजनक! फेसबुक फ्रेंडने केला युवतीवर बलात्कार

विसर्जनानंतर फुटाळा तलावाची दरवर्षी दुर्दशा होते. यंदा कोरोनामुळे अल्प नागरिक मूर्ती घेऊन यंदा बाहेर पडले. परिणामी विसर्जनानंतरही हा तलाव आधीसारखाच शुद्ध आहे. मागील दोन महिन्यांत शहरात चांगला पाऊस झाल्याने फुटाळा, सोनेगाव आणि गांधीसागर तलाव चांगलेच भरले आहेत. परिणामी या तलावात गढूळ पाण्याचे प्रमाणही कमी झाले. सक्करदरा तलावाची स्थिती मात्र वाईट असल्याचे डेप्युटी टीम लिडर मेहूल कोसूरकर याने नमूद केले. सक्करदरा तलावात पाण्याची पातळी कमी असून संपूर्ण तलावावर जलवनस्पती आहे. त्यामुळे येथील ऑक्सिजनचा स्तर कमी असल्याचेही त्यांनी सांगितले. 

हेही वाचा - मुख्यमंत्री ठाकरेंकडे ‘दिशा कायदा’ लागू करण्याची मागणी; डॉ. देशमुखांच्‍या मते नागपूरही महिलांसाठी...

महापालिकेने यंदा तलावांना टिनाचे पत्रे लावून संरक्षक भिंत उभी केली. त्यामुळे गेल्या आठ वर्षात प्रथमच चांगला परिणाम दिसून आला. सोनेगाव, फुटाळा, गांधीसागर तलावातील ऑक्सिजनचा स्तर पूर्वीप्रमाणेच कायम आहे, असे ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनच्या टीम लिडर सुरभी जैस्वाल यांनी सांगितले. 

सक्करदरा तलावातील ऑक्सिजनचा स्तर विसर्जनापूर्वी तसेच विसर्जनानंतरही ३ एमजी प्रति लीटर आहे. या तलावाची स्थिती वाईट आहे. येथे पाणी कमी असून जलवनस्पतीने वेढा टाकला आहे. या तलावाला स्वच्छ करण्याची गरज असल्याचे फाउंडेशनचे डेप्यूटी टीम लीडर मेहुल कोसुरकर म्हणाले. 

संपादन - भाग्यश्री राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: oxygen level of lake is same after ganash immersion in nagpur