शुल्क न भरल्यामुळे उपमहापौरांच्या मुलीला ऑनलाइन शिक्षणापासून केले वंचित, पालकांसह उपमहापौरांचे शाळेसमोर आंदोलन

parents agitation against swami narayan school in nagpur
parents agitation against swami narayan school in nagpur

नागपूर : शहरातील वर्धमान नगर येथील स्वामी नारायण शाळेने शुल्काचे कारण देत ५०० विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या ग्रूपमधून काढण्यात आले. त्यामुळे पालक संतप्त झाले असून शाळा प्रशासनाविरोधात आज आंदोलन करण्यात आले. तसेच शाळा व्यवस्थापनावर कारवाई करण्याची मागणी केली. विशेष म्हणजे यामध्ये उपमहापौर मनिषा धावडे यांच्याही मुलीला शुल्क न भरल्यामुळे बाहेर काढण्यात आले. 

कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले. विद्यार्थ्यांना कोरोनाचे संक्रमण होऊ नये यासाठी शाळा देखील बंद करण्यात आल्या. त्यानंतर ऑनलाइन शिक्षण सुरू करण्याची परवानगी सरकारने दिली. अनेक खासगी शाळांनी ऑनलाइन शिक्षण सुरू केले. या काळात एकाही विद्यार्थ्याकडून शुल्क वसुलीसाठी जबरदस्ती करून नये, अशा सूचना शासनाने दिल्या होत्या. मात्र, अनेक शाळांनी पालकांकडे शुल्कासाठी तगादा लावला. शुल्क नाहीतर ऑनलाइन शिक्षण नाही, अशी भूमिका शाळांनी घेतली होती. पालकांनी अनेकदा तक्रार केली. मात्र, त्याकडेच दुर्लक्ष करण्यात आले. विद्यार्थ्यांची गुरुवारपासून परीक्षा आहे. त्यातच शुल्क न भरल्याचे कारण देत विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाच्या ग्रूपमधून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे पालक चांगलेच संतप्त झाले असून आज त्यांनी शाळेसमोर आंदोलन केले. पालकांनी स्वामी नारायण शाळेचे संचालक प्रकाश कोठारी यांची भेट घेतली असता आज रात्री ८ वाजेपर्यंत ग्रूपमध्ये समावेश करण्यात आल्याचे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, ५० टक्के शुल्क कमी करण्याची मागणी असल्याचे पालक रोशन माथूरकर यांनी सांगितले.  

घरगुती कामात व्यस्त असल्यामुळे मुलीचे एका टर्मचे शुल्क भरू शकले नाही. त्यामुळे माझ्या मुलीला देखील ऑनलाइन शिक्षणाच्या ग्रूपमधून बाहेर काढण्यात आले. मात्र, आज पालकांसोबत शाळेच्या  मुख्याध्यापिका लक्ष्मी सिस्टा आणि कोठारी यांची भेट घेतली.
- मनिषा धावडे, उपमहापौर, नागपूर 

संपादन - भाग्यश्री राऊत
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com