नागपुरात पाल्यांच्या भवितव्यासाठी `ते` उतरले रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जून 2020

जून सुरू झाला की विद्यार्थ्यांसह, पालक, शिक्षक अशा सर्व संबंधितांना शाळा सुरू होण्याचे वेध लागते. मात्र, यंदा कोरोनामुळे प्रत्येकाचेच वेळापत्रक बदलून टाकले आहे.

नागपूर : जून सुरू झाला की विद्यार्थ्यांसह, पालक, शिक्षक अशा सर्व संबंधितांना शाळा सुरू होण्याचे वेध लागते. मात्र, यंदा कोरोनामुळे प्रत्येकाचेच वेळापत्रक बदलून टाकले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान होऊ नये यासाठी शाळांनी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय शोधून काढला व शुल्कासाठी तगादा लावणे सुरू केले तर हे सर्व अन्यायकारक आहे, असा सुर पालकांनी लावला आहे.

कोरोना व लॉकडाउनमुळे सध्या अनेकांची आर्थिक स्थिती बिघडली आहे. अशा वेळी भरमसाठ शुल्क जमा करणे आवाक्या बाहेरचे असल्याने शाळांनी शैक्षणिक शुल्कात सवलत द्यावी, ऑनलाइन शिक्षण बंद कराव्या या मागणीसाठी नागपुरात आंदोलन करण्यात आले.  शैक्षणिक शुल्कात 50 टक्के कपात करा आणि पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण बंद करा या मागणीसाठी राष्ट्रीय पालक-शिक्षक संघटनेद्वारे राष्ट्रीय संयोजक योगेश पाथरे यांच्या नेतृत्वात  शहरातील एका नामवंत शाळेसमोर आंदोलन करण्यात आले.

वाचा - नागपूरकरांनो  लॉकडाऊन 5.0 साठी तयार राहा... हे वागणं बरं नव्हं

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शहरात टाळेबंदी घोषित करण्यात आली. यामुळे बऱ्याच पालकांवर आर्थिक संकट कोसळले असून त्यांना शाळेचे शुल्क भरता येणे शक्‍य नाही. मात्र, शाळेकडून कुठलीही फी वाढ करण्यात आली नसली तरी, इतके शुल्क जमा करणे सध्या पालकांना शक्य नसल्याने शैक्षणिक शुल्कात पन्नास टक्के कपात करावी आणि शहरातील सीबीएसई शाळांना टाळेबंदीत ऑनलाइन वर्ग बंद करावे अशा मागण्यांसाठी राष्ट्रीय पालक-शिक्षक संघटनेद्वारे निवेदन सादर करण्यात आले होते. मात्र, यावर सीबीएसई शाळांनी कुठलीच कारवाई न केल्याने  संघटनेतर्फे सकाळी दहा वाजताच्या सुमारास राष्ट्रीय पालक-शिक्षक संघटनेने पालकांसोबत आंदोलनास सुरुवात केली. यावेळी पालकांनीही घोषणाबाजी करीत, परिसर दणाणून सोडला. यामुळे सीताबर्डी पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिस हेड कॉन्स्टेबल धोटे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, संघटनेद्वारे शाळा प्रशासनाशी चर्चा करण्याची मागणी केली. यावरून शाळेच्या प्रतिनिधीसोबत या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी स्वाक्षरी करण्यात आलेले निवेदन शाळा प्रशासनाला देण्यात आले.
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parents-Teachers Association demands cut 50 percent fee