पराभवानंतर सोशल मिडियावरून भाजपला प्रचंड टोलेबाजी; महाविकास आघाडीवर कौतुकाचा वर्षाव 

people criticizing BJP for losing graduate constituency election on social media
people criticizing BJP for losing graduate constituency election on social media

नागपूर ः पदवीधर निवडणुकीत प्रथमच अपयश पदरी पडलेल्या भाजपवर सोशल मिडियातून टोलेबाजी होत असल्याचे चित्र आहे. भाजपशी संबंध असलेल्यांनी या निवडणुकीतील चुकांकडेही लक्ष वेधले. त्याचवेळी महाविकास आघाडी, विशेषतः कॉंग्रेसच्या रणनितीवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होताना दिसून येत आहे. एवढेच नव्हे संदीप जोशी यांचे मॉडेलिंगचे बॅनरही सोशल मिडियावर चांगलेच झळकत आहे.

सोशल मिडिया संवादाचे आदान प्रदान करण्याचे प्रभावी माध्यम आहे. कुठल्याही घटनेनंतर सोशल मिडियावर तत्काळ प्रतिक्रियांचा पाऊस पडताना दिसून येत आहे. त्यात निवडणुकीसाठी तर उमेदवारही सोशल मिडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहे. पदवीधर निवडणुकीच्या धक्कादायक निकालही अधिकृतपणे जाहीर होण्यापूर्वीच सोशल मिडियातून लोकांपर्यंत पोहोचले. 

पदवीधर निवडणुकीत मागील ५८ वर्षांच्या काळात प्रथमच पराभव पत्करावा लागला. कॉंग्रेसच्या ऐतिहासिक विजयावर स्तुतीसुमनांचा वर्षाव होत आहे. त्याचवेळी वाईट दिवस आले की कुणीही टचकन बोलावं, अशी सोशल मिडियावर भाजपची स्थिती झाली आहे. भाजप विरोधकांनी तर प्रतिक्रियांचा पाऊसच पाडला. भाजपच्या एका कट्टर विरोधकाने हा पराभव गडकरींचा नसून फडणवीसांचा असल्याचे पोस्ट केले. 

भाजपमध्येच असलेल्या एका व्यक्तिने मागील निवडणुकीत बसपा रिंगणात होती. यावेळी बसपा नसल्याची पोस्ट टाकत भाजपच्या मागील विजयासाठी बसपाला श्रेय दिले. यातून एकप्रकारे भाजपला बसपाचा उमेदवार किती आवश्यक आहे, याकडेही लक्ष वेधले. अनेकांनी बॅलेट पेपर व ईव्हीएमचा फरक पोस्टमधून स्पष्ट केला. 

काहींनी तर तुकाराम मुंढे यांच्या बदलीमुळे संदीप जोशींचा पराभव झाल्याचे सांगून अकलेचे तारे तोडल्याचे दिसून येत आहे. भाजपविरोधकांनी चांगलेच तोंडसुख घेतले. त्याचवेळी भाजप व संदीप जोशी समर्थकांनी ही निवडणूक जातीवर झाल्याचे लांबलचक उतारे पोस्ट केले. अनेकांनी बहुजन समाज जागा झाल्याच्या पोस्ट केल्या आहेत. 

नुकताच संदीप जोशी यांचे मॉडेलिंगचे एक बॅनर चर्चेत आले होते. याचाही काहींनी उपयोग करीत सोशल मिडियावर ताशेरे ओढले. संदीप जोशी यांनी एका पोस्टद्वारे मतदारांचे आभार मानले. यावर अनेकांनी त्यांचा आत्मविश्वास दुणावणाऱ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी घेतलेल्या मेहनतीचे चीज झाल्याचेही अनेकांनी पोस्ट केले. काहींनी कॉंग्रेसचा विजय नशीबाने झाल्याचेही पोस्ट केले.

निवडणूकच सबकुछ

१ डिसेंबरला मतदानाच्या दिवसापासून सोशल मिडियावर पदवीधर निवडणुकीचीच चर्चा होती. सोशल मिडियात भाजप, कॉंग्रेसकडून विजयाचे दावे करण्यात आले. मतदानाच्या निकालापर्यंत राजकीय ताशेरे, टोलेबाजीनेच सोशल मिडियावर आघाडी घेतली होती. त्यामुळे कोरोना, व्हॅक्सीन, शेतकरी आंदोलनाही मागे पडल्याचे चित्र होते. एकूणच सोशल मिडियावर निवडणूकच सबकुछ होते.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com