पॅरोलवर सुटून बाहेर आलेल्या गुन्हेगारांपासून सावध राहावे ; पोलिस आयुक्‍त डॉ. उपाध्याय यांचे आवाहन

बुधवार, 10 जून 2020

लॉकडाऊनच्या काळात अनेक गुन्हेगार लपून बसले होते किंवा शहराबाहेर होते. आता नुकताच लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यामुळे ते गुन्हेगार शहरात लुटमार, वसुली, दमदाटी, चेनस्नॅचिंग, पैसे हिसकावणे असे गुन्हे घडण्याची शक्‍यता बळावली आहे.

 नागपूरः लॉकडाऊन आणि संचारबंदीदरम्यान अनेकांचे रोजगार हिरावल्या गेले तसेच अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे युवक मध्यवर्ती कारागृहातून पॅरोलवर सुटून बाहेर आले आहेत. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांकडून आर्थिक आणि शारीरिक नुकसानीचा धोका संभवतो. त्यामुळे सर्व नागरिकांनी सतर्क राहावे, पोलिस तुमच्या पाठीशी आहेत, असे आवाहन पोलिस आयुक्‍त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी केले.

नागपूर शहर पोलिस नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तप्तर आहेत. मात्र, पोलिसांना सहकार्य करण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा, जेणेकरून सुरक्षा व्यवस्था मजबूत होईल. लॉकडाऊनच्या काळात अनेक गुन्हेगार लपून बसले होते किंवा शहराबाहेर होते. आता नुकताच लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यामुळे ते गुन्हेगार शहरात लुटमार, वसुली, दमदाटी, चेनस्नॅचिंग, पैसे हिसकावणे असे गुन्हे घडण्याची शक्‍यता बळावली आहे. त्यामुळे नागरिकांनीही सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस आयुक्‍तांनी केले आहे.

वाचा- युवक-युवतींच्या गर्दीने फुलला फुटाळा तलाव

सध्या ऑपरेशन क्रॅक डाऊन - 2 सुरू असून शहरातील प्रत्येक गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येक गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर आहे. यासोबत लॉकडाऊनमधील शिथिलता लक्षात घेता रात्रीची गस्त वाढविण्यात आली आहे. चोरटे आणि घरफोडी करणाऱ्यांवर पोलिसांचा वॉच आहे. गुन्हे शाखा अलर्ट मोडवर असून शहरातील अवैध धंद्यांवर छापेमारी कारवाई सुरू आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागपूर पोलिस सज्ज असल्याचेही डॉ. उपाध्याय "सकाळ'शी बोलताना म्हणाले.

असे करा...
 पोलिसांचे हेल्पलाईन क्रमांक मोबाईलच्या स्क्रिनवर ठेवा. महिला आणि मुलींनी घराबाहेर पडताना सोबत मिरचीपूड ठेवा. आई-वडीलांना आपल्या लोकेशनची माहिती द्या. मित्र-मैत्रिणींबरोबर गप्पा मारत असताना वेळेचे भान ठेवा. रात्र होण्यापूर्वी घरी पोहचा. वाहन लॉक करूनच बाहेर पडा. कुणासाठी थेट दरवाजा न उघडता आवाज द्या किंवा खिडकीतून डोकावून पहा. सेल्समनला अजिबात घराच्या परिसरात प्रवेश देऊ नका. क्रेडिट-डेबीट कार्ड सांभाळून वापरा. कुणालाही पीन नंबर किंवा स्वतःचा मोबाईल क्रमांक देऊ नका. कमीत कमी रोख व्यवहार करा. मोठे व्यवहार एकट्याने करू नका. कारमध्ये महागड्या वस्तू ठेवू नका.

असे करू नका

महागड्या वस्तू वापरू नका. महागडे घड्याळ घालू नका. महिलांनी आणि पुरूषांनी सोन्याचे दागिने घालू नका. जास्त गर्दीत फिरू नका. बाजारात किंवा मार्केटमध्ये आपल्या वस्तूंकडे दुर्लक्ष करू नका. हातातील पिशव्या कुठेही ठेवू नका. वाहन चालविताना शॉर्टकट घेऊ नका. लवकर घरी पोहचण्याची घाई करू नका. आवश्‍यकतेपेक्षा जास्त कॅश बाळगू नका. सार्वजनिक ठिकाणी मोबाईलवर गुंतू नका.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: People should aware of culpript out from jail on parol; Nagpur C.P.