उपराजधानीत पेट्रोल विक्रमी ९१ रुपये लिटर; केंद्राच्या करभाराने सर्वसामान्यांचा खिसा रिकामा

राजेश रामपूरकर
Tuesday, 8 December 2020

२००१ मध्ये केंद्र सरकारला केंद्रीय रस्ते निधीअंतर्गत त्यांच्या गंगाजळीत १९ हजार कोटी रुपये जमा होत होते. आता हा कर १८ रुपये झाल्याने केंद्रीय गंगाजळीत ३ लाख कोटीचा निधी गोळा होत आहे.

नागपूर : उपराजधानीत पेट्रोल आतापर्यंतचे सर्वांत महाग अर्थात तब्बल ९१ रुपये लिटर झाले आहे. मोदी सरकारने वाढविलेल्या करभारामुळे पेट्रोल-डिझेल दराचा भडका उडाला असून, सर्वसामान्यांच्या खिसा रिकामा होत आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०१८ मध्ये पेट्रोलचा दर जवळपास एवढाच झाला होता. मात्र, त्यावेळी कच्च्या तेलाच्या किमती सध्यापेक्षा सुमारे निम्मेच होत्या. त्यामुळे सध्याची भाववाढी ही करांमुळेच झाल्याचे स्पष्ट होते आहे.

अतिरिक्त महसूल गोळा करण्यासाठी केंद्र व राज्यांकडून पेट्रोल व डिझेलवर वेळोवेळी कर लावले जातात. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती नीचांकी पातळीवर आलेल्या असतानाही कोविड संकटाच्या काळात सरकारी तिजोरीत भर घालण्यासाठी हे कर कमी करण्यात आलेले नाहीत. पेट्रोल-डिझेलवर सेस लावला जोतो. त्याशिवाय अन्य करही आहेत.

अधिक वाचा - सुका मेव्यापेक्षा फायदेशीर गूळ-फुटाणे, फायदे वाचून व्हाल चकित

अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना सुरू केलेल्या केंद्रीय रस्ते सुविधा निधी एक रुपयांवरून १८ रुपये करण्यात आल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दराने दोन वर्षातील उच्चांक गाठला आहे. सोमवारी पेट्रोल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे २९ आणि २७ पैसे प्रति लिटर वाढ केल्याने शहरातील पेट्रोल दर सुमारे ९१ रुपये तर डिझेल ८१.१३ रुपये प्रति लिटर झाले आहे.

अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार केंद्रात आल्यानंतर २००१ मध्ये केंद्रीय रस्ते सुविधा निधी आकारण्यास सुरुवात झाली. त्यानंतर २००४ मध्ये मनमोहनसिंग यांचे सरकार केंद्रात आल्यानंतर त्या करात कोणतीही वाढ केली नाही आणि पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर नियंत्रण आणले होते. २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेवर येताच २०१६ मध्ये चार रुपये, २०१८ मध्ये सहा रुपये करण्यात आला. २०२० मध्ये कोरोनाच्या संकट काळात तो १८ रुपये करण्यात आला.

सविस्तर वाचा - अमरावतीतील बाळाचे मृत्यूप्रकरण : आईला तीन दिवसांची पोलिस कोठडी; नव्याने नोंदविले जाईल बयाण

एवढेच नव्हेतर आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या दरात विक्रमी घसरण झाली असतानाही सलग दोन महिने इंधनाचे दरात स्थिर ठेवले. जून महिन्यात मोदी सरकारने केंद्रीय रस्ते सुविधा निधीचे नामांकरण करुन केंद्रीय रस्ते व पायाभूत सुविधा निधी करीत त्या करात विक्रमी म्हणजे तब्बल १२ रुपयांची वाढ केली. तेव्हापासून पेट्रोल आणि डिझेलचे दर आंतरराष्ट्रीयस्तरावर कमी झाले तरी त्याचा लाभ ग्राहकांना मिळाला नाही. उलट पेट्रोल व डिझेलच्या भाववाढीचा आलेख सतत चढाच आहे.

२००१ मध्ये केंद्र सरकारला केंद्रीय रस्ते निधीअंतर्गत त्यांच्या गंगाजळीत १९ हजार कोटी रुपये जमा होत होते. आता हा कर १८ रुपये झाल्याने केंद्रीय गंगाजळीत ३ लाख कोटीचा निधी गोळा होत आहे. नागरिकांच्या करांवरच रस्त्ते तयार केले जात असताना ग्राहकांकडून पथकर वसूल केला जात आहे. सर्वसामान्य नागरिकांवर दुहेरी कर आकारण्यात येत असल्याने त्याचे खिसे हलके करण्याचे काम केले जात असल्याचे आरोप सर्वस्तरातून होत आहे.

जाणून घ्या - ऐकावे ते नवलच! खोदकाम बोरवेलचे अन् पाणी निघाले विहिरीतून

शहरातील पेट्रोल दर आणि कर

मुळ किंमत : २८ रुपये २६ पैसे 
उत्पादन शुल्क व केंद्रीय रस्ते व पायाभूत सुविधा निधी : ३२ रुपये ९८ पैसे 
व्हॅट @ महाराष्ट्र सरकार - १५ रुपये ९१ पैसे 
सेस महाराष्ट्र सरकार - १० रुपये १२ पैसे 
डिलर्स कमिशन - ३ रुपये ६४ पैसे 
एकूण - ९० रुपये ९१ पैसे 

डिझेल दर व कर

मुळ किंमत : २९ रुपये १४ पैसे 
उत्पादन शुल्क आणि केंद्रीय रस्ते व पायाभूत सुविधा निधी : ३१ रुपये ८३ पैसे 
व्हॅट @ महाराष्ट्र सरकार - १४ रुपये ६४ पैसे 
सेस महाराष्ट्र सरकार - ३ रुपये 
डिलर्स कमिशन - २ रुपये ५२ पैसे 
एकूण - ८१ रुपये १३ पैसे 

क्लिक करा - बापरे!; पहाटे साडेपाच वाजता शासकीय बालसुधारगृहात दोन अल्पवयीन मुलांनी केली आत्महत्या

शहरातील पेट्रोल व डिझेल पंप संख्या : ८१.१३ 
दररोज पेट्रोलची विक्री : ४ लाख ७५ हजार लिटर
डिझेल - ९५ हजार लिटर 
जिल्ह्यातील पेट्रोल व डिझेल पंप संख्या : २५०
पेट्रोलची विक्री : २ लाख ५० हजार लिटर
डिझेल : १२ लाख ५० हजार लिटर

तारीख पेट्रोल दर प्रति लिटर डिझेल (रुपये )
१ डिसेंबर ८९.५८ ७९.५९ 
२ डिसेंबर ८९.७३ ७९.८४ 
३ डिसेंबर ८९.८९ ८०.०४ 
४ डिसेंबर ९०.०९ ८०.२८
५ डिसेंबर ९०.३५ ८०.५५
६ डिसेंबर ९०.६२ ८०.८६
७ डिसेंबर ९०.९१ ८१.१३

ग्राहकांना दिलासा द्या
केंद्र सरकारने लादलेले कर कमी करून ग्राहकांना दिलासा द्यावा. आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रुड ऑईलचे दर कमी असताना भाववाढ होत असल्याने आश्चर्य वाटते. 
- अमित गुप्ता,
अध्यक्ष, विदर्भ पेट्रोल डिलर्स असोसिएश

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Petrol ninety one Rs in Nagpur city