आणखी २२ बोगस खेळाडू रडारवर;  तीन दिवसांत मागणार मूळ कागदपत्रे

players on radar in fake certificate case
players on radar in fake certificate case

नागपूर  : नागपुरातील बनावट क्रीडा प्रमाणपत्रांचा घोटाळा आता व्यापक रूप घेत आहे. या प्रकरणी नागपूर विभागातील आणखी २२ बोगस खेळाडू रडारवर असून, लवकरच त्यांच्यावर कठोर कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक जिंकल्याचे बनावट प्रमाणपत्र मिळवून अनेक बोगस खेळाडूंनी शासकीय नोकरी लाटल्याचे किंवा त्या प्रयत्नात असल्याचे धक्कादायक प्रकार राज्यातील विविध विभागांमध्ये उघडकीस आले होते. नागपूर विभागातही असे अनेक खेळाडू असल्याची माहिती पुढे आली.

त्यातील तिघांविरुद्ध प्रभारी उपसंचालक अविनाश पुंड यांनी मानकापूर पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातील संजय सावंत (रा. कामेरी, जि. सांगली) नावाच्या आरोपीस अटकही करण्यात आली. पवन पाटील (रा. नागपूर) आणि निखिल माळी ( रा. गोडुली, जि. सातारा) गुन्हा दाखल झालेले अन्य दोन आरोपी आहेत.

अधिक वाचा - रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी औषधे विकत घेऊ नका; आहारतज्ज्ञ डॉ. जयश्री पेंढारकर यांचा सल्ला

ट्रॅंपोलिन (जिम्नॅस्टिक्स) प्रकारातील आणखी २२ खेळाडूंवर संशयाची सुई आहे. या सर्व खेळाडूंचे प्रमाणपत्र बोगस असल्याचा संशय असल्याने त्या सर्वांचे प्रमाणपत्र रद्द करण्यासंदर्भात पत्र पाठविण्यात येणार असल्याचे पुंड यांनी सांगितले. या सर्वांना पत्र मिळाल्यानंतर तीन दिवसांत मूळ कागदपत्रे सादर करावयाची आहेत. त्यांचे प्रमाणपत्र बोगस आढळून आल्यास कारवाई होऊ शकते. त्यामुळे आता या खेळाडूंचेही धाबे दणाणले आहे. बोगस खेळाडूंविरुद्ध पोलिसात तक्रार झाल्यानंतर दैनिक 'सकाळ'ने नऊ सप्टेंबरच्या अंकात सर्वप्रथम वृत्त प्रकाशित केले होते.

पाच टक्के आरक्षणाचा फायदा घेण्याच्या उद्देशाने अनेक बोगस खेळाडूंनी बनावट प्रमाणपत्र मिळविले किंवा मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. राज्यातील विविध विभागांत असे प्रकार उघडकीस आल्यानंतर शासनाने त्यांच्याविरोधात कठोर पावले उचलणे सुरू केले. काही दिवसांपूर्वी पुणे येथील क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी आरोपींविरोधात फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. 

बनावट प्रमाणपत्रांच्या आधारावर जवळपास ४० बोगस खेळाडूंनी पोलीस विभागासह विविध शासकीय सेवेत नोकरी लाटल्याची माहिती असून, यामागे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे व कोट्यवधींचा व्यवहार झाल्याची चर्चा आहे. आतापर्यंत ट्रॅंपोलिन खेळात अडीचशेच्या वर बनावट प्रमाणपत्रधारक आढळून आले आहेत. इतरही खेळांमध्ये अशी फसवणूक करणारे बोगस खेळाडू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा सर्व बोगस खेळाडूंना हुडकून काढून, त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी क्रीडा वर्तूळातून होत आहे.

संपादन  : अतुल मांगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com