दहा वर्षातील बाराशे मृत्युंना जबाबदार कोण?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

गेल्या 10 ते 12 वर्षांत नायलॉन मांजामुळे 1200 पेक्षा अधिक व्यक्तींचा, प्राणी आणि पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूंना जबाबदार कोण, असा संघटनेचा सवाल आहे. झाडांवर तसेच विजेच्या खांबावर वर्षानुवर्षे नायलॉन मांजा तसाच पडून राहतो. त्यामुळे पक्ष्यांसाठी तर ते नेहमीच घातक आहे.

नागपूर : मकरसंक्रांतीला मोठ्या प्रमाणात पगंत उडविण्यात येतात. त्यासाठी नायलॉन मांजाचा वापर केल्याने अनेकांना जीव गमवावा लागतो; तर अनेकजण जखमी होतात. त्यामुळे या मांजाच्या उत्पादनावरच बंदी घालण्याची मागणी किंग कोब्रा ऑर्गनायजेशन युथ फोर्सने केली आहे.
लोकांनी नायलॉन मांजाचा वापर करू नये, यासाठी संघटनेचे अध्यक्ष अरविंद रतुडी यांच्या नेतृत्वात शहरात ठिकठिकाणी जनजागरण करण्यात येत आहे. शाळा, महाविद्यालयांसह सार्वजनिक ठिकाणी जाऊन नायलॉन मांजावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मांजामुळे मृत्यू झाल्यास आर्थिक भरपाई द्यावी तसेच जखमी होणाऱ्या व्यक्तींसह पशुपक्षी जखमी झाल्यास त्यांच्यावर नि:शुल्क उपचार करावे, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून किंग कोब्राचा लढा सुरू आहे. त्यामुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर यापूर्वी अनेकदा हल्ले झाले आहेत.

सविस्तर वाचा - तरुणाईच्या मुखी एकच आवाज, काय पो चे

गेल्या 10 ते 12 वर्षांत नायलॉन मांजामुळे 1200 पेक्षा अधिक व्यक्तींचा, प्राणी आणि पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूंना जबाबदार कोण, असा संघटनेचा सवाल आहे. झाडांवर तसेच विजेच्या खांबावर वर्षानुवर्षे नायलॉन मांजा तसाच पडून राहतो. त्यामुळे पक्ष्यांसाठी तर ते नेहमीच घातक आहे. नायलॉन मांजा विक्री करणारे किंवा त्याचा वापर करणारे यांच्यावर सरकारने कारवाई करावी; पण लोकांनीही स्वत: पुढाकार घेऊन या मांजावर बहिष्कार घालण्याचे आवाहन किंग कोब्राने केले आहे.

संघटनेतर्फे नि:शुल्क उपचार
मांजामुळे कुणी व्यक्ती किंवा पशुपक्षी जखमी झाल्याचे आढळल्यास संघटनेतर्फे नि:शुल्क उपचार, रुग्णवाहिका, रक्त यांची व्यवस्था करण्यात आली आहे. 9049550854, 9503069860 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे रतुडी यांनी म्हटले आहे. या जनजागरण सभेत शेखर घटे, अमित कातुरे, स्वप्नील बोधाने, किशोर शेरेकर, सोहेल खान, सुनीता तोडासे आदी सहभागी झाले होते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pls. ban on naylon manja