नागपूरच्या प्रसिद्ध पोद्दारेश्वर राम मंदिरात शांतता, भक्तांनी दारावर टेकवले मस्तक

ram mandir
ram mandir

नागपूर : गेली चौपन्न वर्षे असंख्य रामभक्तांसाठी अयोध्यास्वरुप असलेल्या पोद्दारेश्वर राम मंदिरात  राम नवमीच्या दिवशी शांतता होती. अनेक दशकांपासून जेथे दिमाखात रामजन्मोत्सव साजरा झाला; त्याच वास्तूतील निरामय शांतता भाविक करुण अंतःकारणाने अनुभवत होते. पोद्दारेश्वर राम मंदिर परिसरात राहणार्या लोकांनी तर काळजावर दगड ठेवून यंदाची रामनवमी साजरी केली. अनेकांनी पाणावलेल्या डोळ्यांनी बंद महाद्वाराचेच दर्शन घेतले. सहवास तुझाच घडावा देवा, प्रसाद हा मज द्यावा हीच प्रत्येकाची भावना होती. 

संचारबंदीतील हे दिवस कधी कुणी कल्पनाही केली नसेल असेच ठरताहेत. रामनवमी आली की, रामभक्ताच्या रोमारोमात उत्साह संचारतो. रामनामाच्या जयघोषाने अख्खे शहर दुमदुमते. यंदा मात्र तसे दिसणार नव्हते. कारण लढाई कोरोनाविरुद्धची आहे. त्यामुळे त्यात विजयी होण्यासाठी तरी किमान प्रत्येकाने घरात बसूनच श्रीरामाच्या रूपाचे दर्शन घ्यावे असे, आवाहन पोद्दारेश्वर राम मंदिर ट्रस्टने केले होते. मात्र ही कल्पनाच अनेकांसाठी वेदनादायी ठरली. राम मंदिराचे दरवाजे बंद आहेत हे ज्ञात असतानाही दिवसभर असंख्य भक्ताची पावले मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे वळत होती. एकदातरी श्रीरामाच्या मूर्तींचे दर्शन व्हावे, असाच प्रत्येकाचा प्रयत्न होता. 

या उत्सवाशी शहरातील अनेक सामाजिक धार्मिक  संस्था जुळलेल्या आहेत. त्यांच्या भावनांचा अनादर होऊ नये व उत्सवातून होणाऱ्या आर्थिक उलाढालीमुळे अनेक गरिबांचे पोट भरल्या जाते. त्यांनाही याचा फटका बसू नये यासाठी हा उत्सव रद्द न करता पुढे ढकलण्याचा निर्णय श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समितीने घेतला.

काहींना मात्र संचारबंदीतही राम सेवा करण्याची संधी मिळाली. मंदिर परिसरात भव्य रांगोळी काढणारे असतील अथवा जन्मोत्सवासाठी हार फुलांची व्यवस्था करणाऱ्या फुलवाल्यांना काही अंशी हे भाग्य लाभले. पण पोद्दारेश्वर राम मंदिराच्या परिसरात ज्यांचे संपूर्ण आयुष्य रामभक्तीत गेले त्यांच्यासाठी यंदाची रामनवमी उदासवाणीच ठरली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com