अहो, पोलिसदादा जरा दमानं घ्या की ! जिल्हा सीमाबंदी करता की श्‍वासबंदी, उपचारांसाठी गावात जाणे नाकारले, का...

वसंत डामरे
सोमवार, 25 मे 2020

शेतीचा हंगाम सुरू झाला आहे. बी-बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना जांब कांद्री हे मोठे गाव जवळ पडते. त्याचप्रमाणे आजारी व्यक्तींनासुद्धा उपचारासाठी येथीलच डॉक्‍टरांकडे नेणे सोयीचे होते. कांद्रीला शेतीविषयक औषधी विक्रेते, ठोक विक्रेते असल्यामुळे शेतकरी कांद्रीला जातात. पण, सीमाबंदी असल्यामुळे शेतकऱ्यांसह मानवी उपचार करणाऱ्यांनासुद्धा याचा फटका बसला आहे.

रामटेक (जि.नागपूर) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्यात. मात्र, दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेलगतच्या दुकान अथवा दवाखान्यात तरी जाण्याची परवानगी द्या, अशी मागणी तालुक्‍यातील शिवनी(भोंडकी), किरणापूर, भंडारबोडी येथील नागरिकांनी केली आहे. दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या पोलिस चौकीतील पोलिसांनी निदान कारण जाणून तरी आजारी व्यक्तीला दवाखान्यापर्यंत अथवा कृषी केंद्रापर्यंत जाण्याची परवानगी द्यावी, परंतू हाकेच्या अंतरावर असलेल्या दुस-या जिल्हयातील गावात महत्वाच्या कामानिमित्त जाणा-यांना पोलिसी खाक्‍याला सामोरे जावे लागत आहे. अहो, साधे दवाखान्यात किंव शेतीच्या कामासाठी जाणेही पोलिसांनी अवघड केले आहे !

हेही वाचा  : अरे जरा ऐका रे ! होमक्‍वारंटाइन केलेल्यांनी उडविली प्रशासनाची झोप, मग प्रशासनाने केला उपाय....

ही गावे पडतात सोयीची...
नागपूर व भंडारा जिल्ह्यांची सीमारेषा हिवरा या गावाजवळ आहे. येथून पुढे भंडारा जिल्हा सुरू होतो. रामटेक तालुक्‍यातील (नागपूर जिल्हा) शिवनी(भोंडकी), किरणापूर, सालईमेटा, भंडारबोडी ही गावे हिवरा या सीमावर्ती गावाजवळ आहेत. शिवनी भोंडकीपासून जांब कांद्री हे भंडारा जिल्ह्यातील गाव केवळ 7 किलोमीटर अंतरावर आहे. येथून रामटेक शहर हे तालुक्‍याचे ठिकाण 20 किलोमीटर दूर आहे. जांब कांद्री येथे कोरोना प्रादुर्भावापूर्वी या गावातील नागरिक वैद्यकीय उपचारासाठी तसेच रामटेकपेक्षा स्वस्त मिळणाऱ्या कृषीविषयक साहित्य (खते,औषधी) खरेदीसाठी जात होते. मात्र, कोरोना प्रादुर्भावानंतर हिवरा येथे पोलिस चौकी लावण्यात आली. आणि नागरिकांना जांब कांद्रीला जाण्यासाठी परवानगी नाकारण्यात येऊ लागली. आता शेतीचा हंगाम सुरू झाला आहे. बी-बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना जांब कांद्री हे मोठे गाव जवळ पडते. त्याचप्रमाणे आजारी व्यक्तींनासुद्धा उपचारासाठी येथीलच डॉक्‍टरांकडे नेणे सोयीचे होते. कांद्रीला शेतीविषयक औषधी विक्रेते, ठोक विक्रेते असल्यामुळे शेतकरी कांद्रीला जातात. पण, सीमाबंदी असल्यामुळे शेतकऱ्यांसह मानवी उपचार करणाऱ्यांनासुद्धा याचा फटका बसला आहे.

हेही वाचाः परवा प्रीतेश गेला, काल दत्तू...दोन्ही कामगारांच्या मृत्यूने कुटुंबीयांचे दुःख अनावर , मृत्यूचे कारण...

यांना बसला पोलिसी खाक्‍याचा फटका...
शिवनी भोंडकी येथील परमात्मा एक कृषी सेवा केंद्राचे मनोज वंजारी पत्नीसह दीड वर्षाच्या मुलास दवाखान्यात नेत होते. त्यांना चेक पोस्टवर थांबविण्यात आले. वंजारी यांनी पोलिसांना जाऊ देण्याची विनंती केली. पण, पोलिसांनी उलट लाठी मारण्यास सुरुवात केली. पत्नीच्या हातात असलेला मोबाईल फोडला तसेच पत्नीच्या हाताला इजा झाली. भंडारबोडी, शिवनी भोंडकी, किरणापूर, सालईमेटा येथील नागरिकांना सीमेपासून कांद्रीपर्यंत जाण्याची मुभा मिळावी जेणेकरून शेतीविषयक साधने खरेदी करता येतील. दोन दिवसाअगोदर बबन वैद्य ( 75) हे आजारी व्यक्ती नातवासोबत कांद्रीला जाण्यासाठी निघाले असता चेकपोस्टवरून त्यांना परत पाठविण्यात आले. कमीतकमी मानवीय दृष्टिकोनातून तरी आजारी व्यक्ती व शेतकरी यांना या सीमावर्ती भागात जाऊ द्यावे. वाटल्यास ते परत येईपर्यंत त्यांच्या वाहनांची कागदपत्रे अथवा ओळखपत्र चेकपोस्टवर ठेवून घ्यावे अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police arrears run on district boundaries