चाकू दाखवून मागायचा खंडणी; शेवटी नागरिकांनी केली हिंमत... 

शुक्रवार, 12 जून 2020

चंबडा ऊर्फ अक्षय रणजित (22) हा गुंड गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीत सक्रिय झाला आहे. शस्त्राच्या धाकावर लोकांना लुटण्यात तो तरबेज आहे.

नागपूर : उपराजधानीत लॉकडाउनमध्ये शिथिलता आली, तेव्हापासून गुन्ह्यांच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. हत्याकांडांची तरी मालिकाच सुरू आहे. कुख्यात गुन्हेगार पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. या घटनांवर आळा घालण्यात पोलिस अपयशी ठरत असल्याचे नागरिक बोलू लागले आहेत. 

चित्रपटातील खलनायकाप्रमाणे हातात चाकू घेऊन खंडणीची मागणी करणारा गुलशननगरातील रहिवासी चंबडा ऊर्फ अक्षय रणजित (22) हा गुंड गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीत सक्रिय झाला आहे. शस्त्राच्या धाकावर लोकांना लुटण्यात तो तरबेज आहे. गुन्हेगारी कृत्यांमुळे गुलशननगरात त्याची दहशत निर्माण होऊ लागली आहे. 

प्राप्त माहितीनुसार, चंबडा हा गुरुवारी सायंकाळी गुलशननगरातच राहणारा साथीदार फारूख (25) याला घेऊन कळमना हद्दीतील कपाले ले-आउट, मोठ्या विहिरीजवळील वसाहतीत गेला. हातातील चाकूचा धाक दाखवून तो रहिवाशांकडे खंडणीची मागणी करीत होता. याच वस्तीत कांताबाई शेंडे (53) या वास्तव्यास आहेत. पूर्वी त्या दारूविक्रीचा व्यवसाय करीत होत्या. चंबडा त्यांच्याकडे धडकला. 'दारूचा धंदा करायचा असेल तर दरमहा दोन हजार रुपये द्यावे लागतील', या शब्दात इशारा दिला. 

हेही वाचा : अस्वलीने शिकाऱ्यांना ठार मारून घेतला बदला

कांताबाईंच्या नकाराने संतापलेल्या चंबडाने पैसे न दिल्यास मारून टाकण्याची धमकी दिली. तो निघून जाताच नागरिकांनी हिंमत करीत कळमना पोलिसांना माहिती दिली. लागलीच पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. पहाटेच्या सुमारास पोलिसांनी त्याच्या मुसक्‍या आवळल्या.