मेट्रोव्हीजन स्कॅम: एसआयटीकडून तब्बल २.११ कोटी जप्त; आणखी दोन आरोपींना अटक 

अनिल कांबळे 
Saturday, 19 December 2020

डीसीपी हसन म्हणाले, मुख्य आरोपी देवेंद्र गजभिये याच्या चार बॅंक खात्यातून ४८.३४ लाख रूपये जप्त केले असून विजय गुरूनुलेच्या बायकोच्या खात्यातूनही ३.२८ लाख रूपये जप्त करण्यात आले.

नागपूर ः शेअर बाजारात गुंतवणुकीचा फंडा देऊन आर्थिक फायदा होण्याच्या नावावर हजारो गुंतवणुकदारांना कोट्यवधीने गंडा घालणाऱ्या मेट्रोव्हीजन स्कॅममध्ये पोलिसांनी २.११ कोटी रूपये जप्त केले. तसेच आणखी दोन आरोपींना अटक केली. विशेष तपास पथक (एसआयटी) करीत आहे. आतापर्यंत पोलिसांनी सव्वा दोन कोटींची रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. तसेच महागड्या पाज कारही जप्त केल्या आहेत, अशी माहिती एसआयटीचे प्रमुख आयपीएस नुरूल हसन यांनी आज पत्रपरिषदेत दिली.

डीसीपी हसन म्हणाले, मुख्य आरोपी देवेंद्र गजभिये याच्या चार बॅंक खात्यातून ४८.३४ लाख रूपये जप्त केले असून विजय गुरूनुलेच्या बायकोच्या खात्यातूनही ३.२८ लाख रूपये जप्त करण्यात आले. पोलिसांनी ८५ लाख रूपये किंमतीची संपत्तीसुद्धा जप्त केली आहे. वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे शहरानजीक असलेली विजय गुरूनुलेची १० एकर जमीन, सुनील श्रीखंडेची सौंसर येथील चार एकर जमीनही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. तसेच २६९ ग्रॅम सोन्‍याचे दागिण्यांसह १३.४५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

हेही वाचा - सालेकसातील शेतात आढळला मांजरीसारखा दिसणारा प्राणी; जवळ जाऊन बघितले असता अंगाचा उडाला थरकाप

गुरूनुलेच्या डस्टर, ह्युंडाई, नेक्सान, स्कोडा, शेओरलेट क्रूज अशा महागड्या कारही जप्त केल्या आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रतापनगर पोलिसांनी १२ आरोपींना अटक केली. पोलिसांनी सोनू श्रीखंडे याकडून ११.२२ लाख, ४८ लाख रुपये अमरावतीच्या बहिणीकडून, ७ लाख प्राथमिक शाळेचा शिक्षक तन्मय जाधव, १३ लाख अशोक दुपारे याच्याकडून, ६७. ७९ लाख रूपये श्रीखंडेच्या भावाकडून १२.८६ लाख गुरूनुलेच्या घरातून जप्त करण्यात आले आहेत. तसेच गुरूनुलेच्या अलिशान कार आणि शेतीचे कागदपत्र पोलिसांनी जप्त केले आहे. 

डीसीपी नुरूल हसन यांच्या नेतृत्वात प्रतापनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमराव खणदाळे, पीआय विद्या जाधव, पोलिस उपनिरीक्षक विशाल नांदगाये या प्रकरणाचा तपास करीत आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रतापनगर पोलिसांनी १२ आरोपींना अटक केली होती. नव्याने आणखी दोन आरोपींना अटक केली. तुळशीराम नामदेव जेंगठे (५७,रामपूर, आर्वी-जि. चंद्रपूर) आणि आलोक विनोद मेश्राम (२८, रा. गर्रा,ता.वाराशिवणी, जि. बालाघाट) अशी आरोपींची नावे आहे. सुमारे १२ आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

अधिक माहितीसाठी - लग्नाला यायचं बरं का! असं म्हणत दिलं लग्नाचं 'ओलं' निमंत्रण; पत्रिका बघून भलभल्यांना बसला धक्का

अनेक गुंतवणूकदारांंनी या स्कॅममध्ये गुंतवणूक करून लाखोंमध्ये अतिरीक्त पैसा कमावला आहे. स्कॅममधून कमावलेला पैसा हा सामान्य गुंतवणुकदारांचा आहे. त्यामुळे अतिरिक्त पैसे कमावलेल्या गुंतवणुकदारांनी प्रतापनगर पोलिस स्टेशनला जमा करावा. अन्यथा गुंतवणुकदारांवर गुन्हे दाखल करण्यात येईल, असे आवाहन डीसीपी नुरूल हसन यांनी केले.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police arrested two more men in metro vision scam