फक्‍त मीच दोषी आहे ना... मग आत्मदहनाची परवानगी द्या

अनिल कांबळे
सोमवार, 27 जानेवारी 2020

गुन्हेगार केव्हा कोणती घटना घडवेल हे कुणालाही माहित नसते. तसेच प्रत्येक गुन्ह्यातील आरोपी लवकरच सापडेल हेही शक्‍य नाही. तपास करीत पोलिस आरोपींचा शोध घेत असतात. दागिने लुटणाऱ्यांचा तपास न केल्याने एका हवालदाराची मुख्यालयात बदली करण्यात आली. यामुळे चिडलेल्या हवालदाराने आत्मदहनाची परवानगी मागितली आहे. 

नागपूर : हुडकेश्‍वर हद्दीत एका महिलेला जखमी करून तीन लुटारूंनी दागिने पळवून नेले होते. या प्रकरणाचा तपास डीबी पथकाचे हवालदार संदीप गुंडलवार यांच्याकडे होता. मात्र, त्यांना चोरटे काही सापडले नाही. याचा ठपका ठेवत सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम यांनी 25 जानेवारी रोजी गुंडलवार यांची बदली केली. आरोपीला पकडता आले नसल्याचा ठपका ठेवत पोलिस मुख्यालयात बदली केल्याने हुडकेश्‍वरचे पोलिस हवालदार संदीप शरद गुंडलवार यांनी आत्मदहनाची परवानगी मागितली आहे. 

हवालदार संदीप गुंडलवार हे 1991 साली शहर पोलिस दलात भरती झाले. 23 जानेवारी रोजी हुडकेश्‍वर हद्दीत एका महिलेला जखमी करून अज्ञात तीन लुटारूंनी दागिने पळवून नेले. या प्रकरणाचा तपास डीबी पथकाचे हवालदार संदीप गुंडलवार यांच्याकडे होता.

सविस्तर वाचा - 'ते' सातजण दीड तासापासून ठेवत होते पाळत, मग...

घटनेच्या दिवशीपासून गुंडलवार हे आपल्या सहकाऱ्यांसह रात्रंदिवस लुटारूंचा मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत होते. तरीही सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम यांनी 25 जानेवारीला गुंडलवार यांच्यासह हुडकेश्‍वर ठाण्यातील दहा शिपायांच्या बदल्या केल्या आहेत. तेव्हापासून गुंडलवार हे तणावात आहेत. हा प्रकार त्यांनी आपल्या कुटुंबीयांनाही सांगितला आहे.

No photo description available.

 

बदलीवर उपस्थित केला प्रश्‍न

सोनसाखळी चोरांचा अटकाव करण्यासाठी शहर गुन्हे शाखेत एक पथक तैनात करण्यात आले आहे. या पथकावर खापर न फोडता हुडकेश्‍वर आणि सक्करदरा ठाण्यातील डीबी पथकावर फोडले आहे. एखादी घटना घडल्यास त्यास तपास पथकाचे कर्मचारी जबाबदार राहतात काय, असा प्रश्‍न गुंडलवार यांनी उपस्थित केला आहे. या घटनांसाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक, ड्युटी अधिकारी, संबंधित पोलिस चौकीचे बीट मार्शल, पॅट्रोलिंग चारचाकी वाहने यांची काहीच जबाबदारी नाही काय, असा प्रश्‍न त्यांनी केला आहे. 

जाणून घ्या - ...अन्‌ साखरपुड्याच्या दिवशीच निघाली अंतयात्रा

मुख्यमंत्र्यांनाही देणार पत्र

हवालदार संदीप गुंडलवार यांनी हुडकेश्‍वर पोलिस ठाण्यात लेखी अर्ज करून आत्मदहनाची परवानगी मागितली आहे. याच आशयाचे पत्र ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, परिमंडळ चारच्या पोलिस उपायुक्त निर्मलदेवी यांना देणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police constable ask for permission to commit suicide