पोलिस म्हणतात, सर्व काही "आलबेल'

नरखेड : येथील शासकीय कार्यालयाजवळ शहराच्या मुख्य भागात अशाप्रकारे ऑटोत बसून सट्टापट्टी फाडली जात आहे.
नरखेड : येथील शासकीय कार्यालयाजवळ शहराच्या मुख्य भागात अशाप्रकारे ऑटोत बसून सट्टापट्टी फाडली जात आहे.

जलालखेडा (जि.नागपूर) :  नरखेड तालुक्‍याची हद्द मध्य प्रदेश राज्याला तसेच अमरावती व वर्धा जिल्ह्याला लागून आहे. यामुळे या हद्दीत अवैध व्यवसाय करणे सध्या सुगीचे आहे. मोठ्या प्रमाणावर अवैध व्यवसाय नरखेड व जलालखेडा पोलिसांच्या हद्दीत सुरू असला तरी याकडे तालुक्‍यातील या सीमेलगत असलेल्या पोलिसाचे "सपशेल' दुर्लक्ष आहे. यामुळे जर कोणाला अवैध व्यवसाय करायचा असेल, तर त्याने नरखेड तालुक्‍यात यावे व पोलिसांशी संगनमत करून खुलेआम व्यवसाय करावा, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे हा तालुका म्हणजे गृहमंत्रयांचे गृहक्षेत्र आहे.

.
अवैध व्यावसायिकांना आधीच मिळते छाप्याची माहिती
नरखेड तालुक्‍यातून मोठ्या प्रमाणात अवैध दारूची व इतर साहित्यांची वाहतूक करण्यात येत आहे. त्याचबरोबर पोलिसांशी संगनमत करून अनेकांनी अवैध जुगार, मटका व दारूचे व्यवसाय थाटले आहेत. याच अवैध व्यवसायामुळे या आधी काहींना मारहाण करण्यात आली, तर काहींचा जीव गेला. तरी पोलिस स्वार्थापोटी अनेक कुटुंबे उद्‌ध्वस्त करायला निघाले आहेत. नरखेड तालुक्‍यात या अवैध व्यवसायांना चांगले दिवस आल्याचे दिसत असल्याने व मध्य प्रदेशातून या व्यावसायिकांना तेथील पोलिसांनी हद्दपार केल्यानंतर त्यांनी मोर्चा नरखेड तालुक्‍यातील हद्दीकडे वळविला आहे. इतकेच नव्हे, तर नरखेड येथे भरदिवसा शहरातील मुख्य भागात बिनधास्तपणे सट्ट्याची खुलेआम पट्टी फाडण्यात येत असताना स्थानिक पोलिसांना हे माहीत नाही, हे समजण्यापलीकडे आहे. याची सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांदेखील कल्पना आहे. पण, गावकऱ्यांच्या अनेक तक्रारीनंतरही खुलेआम सुरू आहे. जास्त ओरड झाली, तर थातूरमातूर छापा टाकण्यात येतो व याची आधी माहिती अवैध व्यावसायिकांना मिळून जाते. यामुळे काहीच सापडत नाही व पोलिस पुन्हा हद्दीत असे कोणतेच व्यवसाय सुरू नसल्याचे सांगते. कार्यवाही केल्याचा बनाव करीत सर्व "आलबेल' असल्याचे सांगतात. यात पोलिस मिळून आहेत म्हणूनच हे सर्व सुरू आहे, असा आता लोकांचा समज झाला आहे.

नरखेडात या!
अशा या व्यवसायामुळे गुन्ह्याचे प्रमाण वाढते. प्रसंगी एखाद्याचा जीवही जातो. पण, त्याचे काही घेणे-देणे नाही. त्यांना फक्त पाहिजे ते खिसा गरम. पोलिसांच्या आशीर्वादाने हे व्यवसाय करणारे आता पैशाने व पोलिस संबंधामुळे इतके शक्तिशाली झाले आहेत की, त्यांची राजकारणातही पकड निर्माण झाली आहे. यामुळे सामान्य माणूस त्यांची तक्रार करण्यास धजावत नाही. यामुळे आता नागरिक स्वतःच म्हणत आहेत की, अवैध व्यवसाय करायचा असेल, तर त्यांनी नरखेड तालुक्‍यात या!


पोलिसांकडून अवैध धंदे बंद करण्यात आले आहे. तरी काही जण चोरूनलपून सट्टापट्टीसारखे अवैध धंदे करीत असेल, तर त्यांच्याविरोधात कार्यवाही करण्यात येईल. तसेच निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद.

-मल्लिकार्जुन इंगळे
ठाणेदार
नरखेड येथील पोलिस ठाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com