पतंग उडवतायं? सावधान! ऐन संक्रांतीच्या दिवशी घडू शकते जेलवारी; 'हा' नियम पाळाच 

अनिल कांबळे   
Wednesday, 13 January 2021

पोलिस थेट मैदानावर किंवा पतंग उडविण्याच्या ठिकाणी छापे घालणार आहेत. नायलॉन मांजा हातात दिसल्यास पोलिस ताब्यात घेतील आणि कारवाईचाही सामना करावा लागणार आहे.

नागपूर ः मकर संक्रांतीनिमित्त उपराजधानीत पतंगबाजांमध्ये ‘ओ काट...’ची स्पर्धा लागते. आकाश पतंगींमुळे रंगीबेरंगी होते. मात्र, आता जर तुम्ही नायलॉन मांजाने पतंग उडवीत असाल तर सावध व्हा. पोलिस थेट मैदानावर किंवा पतंग उडविण्याच्या ठिकाणी छापे घालणार आहेत. नायलॉन मांजा हातात दिसल्यास पोलिस ताब्यात घेतील आणि कारवाईचाही सामना करावा लागणार आहे.

आज मनपा आणि पोलिसांना संयुक्त कारवाई करीत जवळपास ४५ पतंगबाजांवर कारवाई केल्याने खळबळ उडाली. यामुळे मात्र, त्यांच्या मकरसंक्रांतीचा बेरंग झालेला आहे. मंगळवारी सायंकाळी जाततरोडी रोडवर प्रणय ठाकरे या २० वर्षीय युवकाचा पतंगाच्या नायलॉन मांजाने गळा कापून जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिस विभाग आणि मनपाच्या उपद्रव शोध पथकाला जाग आली. पोलिसांनी पतंग विक्रेत्यांच्या दुकानांवर छापामार कारवाई सुरू केली. त्यामुळे पतंग आणि मांजा विक्रेत्यांमध्ये धावपळ सुरू झाली. 

जाणून घ्या - बहिण भावाला बोलवायला गेली, खिडकीतून दृश्य बघताच मोठ्यानं किंचाळली

अनेकांनी नायलॉन मांजा दुकानातून इतरत्र हलविला. तर सेटींगबाज व्यापाऱ्यांना छापा मारण्यापूर्वीच माहिती मिळाल्याने त्यांनी व्यवस्था केली. काही विक्रेत्यांनी ब्लॅकमध्ये नायलॉन मांजा विक्री सुरू केली. अशा विक्रेत्यांवर पोलिस आणि मनपाचे दुर्लक्ष करत असल्यामुळे शहरात नायलॉन मांजा पतंगबाजांना उपलब्ध होत आहे. त्यामुळे मैदानावर अनेकांच्या हाती नायलॉन मांजा दिसत असून ते बिनधास्त पतंग उडवीत आहेत. त्यामुळे पोलिस आणि मनपाने थेट पतंगबाजांवर कारवाई करण्याचे सुरु केले आहे.

बंदी आहे तर मांजा येतो कुठून ?

जर नायलॉन मांजाला बंदी आहे तर हा मांजा येतो कुठून? असा प्रश्‍न आहे. मात्र, नायलॉन मांजाची विशेष मागणी असल्यामुळे मांजा दुकानात न ठेवता मांजा विक्रेते लपवून ठेवलेला मांजा आणून देतो. थोडीफार सेटिंग केली तर कारवाईसुद्धा टाळता येते. त्यामुळे दुकानदार अर्थपूर्ण संबंध ठेवून कारवाई टाळतात.

नक्की वाचा - घरात लक्ष्मी आली म्हणून बाप वाटत होता पेढे, पण एक फोन आला अन् सर्वच संपलं

नायलॉन मांजा विक्रीवर कायद्याने बंदी आहे. त्यामुळे विक्रेत्यांनी जर नायलॉन मांजा विकल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच कुणी जर नायलॉन मांजा वापरून पतंग उडवीत असेल तर अशा पतंगबाजांवरही कारवाई करण्यात येईल. नायलॉन मांजाने पतंग उडविणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
- अमितेश कुमार, 
पोलिस आयुक्त. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police will caught Nailon Manja users in Nagpur Breaking News